Monday, 9 May 2016

"त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोSसि।


मनुष्य उत्क्रांतीच्या काळातील निर्वस्त्र अवस्थेपासून ते आजच्या विवस्त्र अवस्थेपर्यंतच्या प्रवासास दिलेले सुशोभित असे नाव म्हणजे प्रगती होय! हे अनेकांच्या पचनी पडणार नाही याची पूरेपूर कल्पना आहे. तरीही सत्य हे सूर्यासारखं लख्ख तेजस्वी असतं! कितीही पतंगांनी त्यावर उड्या मारण्याचा प्रयत्न केला तरी तेजाला काडीमात्र फरक पडत नाही उलट पतंगांची वाढणारी संख्या ही प्रतिपश्चंद्रलेखेव वृद्धिंगत होणा-या तेजाचं प्रतिक असतं. साधारण मनुष्य टोळी करुन रहायला लागल्यापासून त्याच्या प्रगतीस सुरुवात झाली असं म्हणतात! बौद्धिक विकास आणि भौतिक प्रवास अशा दोन प्रकारात हा प्रवास होता. ऋषीमुनींच्या अवस्थेपर्यंत पोहोचलेला मनुष्य हा बौद्धिक विकासाची सर्वोत्तम पातळी म्हणता येईल,ज्यात त्याला स्वतःचे ,विश्वाचे आणि विश्वात होऊन गेलेल्या व भविष्यात होऊ घातलेल्या घटनांचे ज्ञान झाले होते. आपले आर्षग्रंथ याची साक्ष देण्यास समर्थ आहेत.
त्याचबरोबर जिथे  ऋषीमुनींनी बौद्धिक सौंदर्याची परिसीमा गाठली होती तिथेच राजे लोकांनी उच्चात्युच्च वस्त्रांची परंपरा कायम केली होती, एकेकाळी नखशिखांत भरजरी वस्त्रात नटलेली स्त्री ही सौंदर्याचा मानदंड मानली जात होती. पण आजची परिस्थिती विरुद्ध आहे. जितकी अंगावर वस्त्रे कमी तितके सौंदर्य आणि श्रीमंती अधिक!
आता थोडं विकसित/आधुनिक/हायप्रोफाईल  मानवाबद्दल ! काही महिन्यांपूर्वीचा प्रसंग आहे. काही कामानिमित्त एस.टी महामंडळाच्या कृपाछत्राखाली प्रवास करण्याचा योग आला. सवयी प्रमाणे काही अध्यात्मिक पुस्तक काढून वाचावयास सुरुवात केली होती. शेजारीच बसलेले सद्गृहस्थ हे बराचवेळ न्याहाळत होते. दरम्यान काही फोनसुद्धा येऊन गेले. फोनवर बोलताना "देवाची कृपा" वगैरे भगवंताबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे शब्द ओघानेच बाहेर पडत होते. फोन बंद झाल्यावर न राहवून त्या सद्गृहस्थाने मला माझा व्यवसाय विचारला ! मी शिक्षक असल्याचे सांगितल्यावर त्याला अधिकच चेव आला. आणि तुम्ही शिक्षक असून इतके अशिक्षित आणि मागासलेले कसे काय? माझ्या श्रद्धेला अशिक्षितपणा म्हणणारा महाज्ञानी आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी मी त्याला परिचय विचारला व त्यातून ती व्यक्ती डॉक्टर असल्याचे कळले.पण याच्याशी सरळ वाद घालणं म्हणजे मूर्खपणा झाला असता.कारण या विज्ञानवादी लोकांना पुरावा लागतो. मी देवाला प्रार्थना केली-"देवा ! याला पुरावा दाखवायची संधी दे!" आणि थोड्याच वेळात गाडी एका ढाब्यावर थांबली. तेव्हा हे सद्गृहस्थ उतरले आणि एक धूम्रशलाकेचे(सिगारेट) पाकिट घेऊन गाडी जवळ येऊन धूम्रपानास सुरुवात केली . ही संधी सोडली असती तर रात्री झोप नसती लागली. मी तात्काळ खाली उतरलो . एस.टी. मधून पुरेसे लोक पहात असल्याची खात्री करुन मी त्याला प्रश्न विचारला-"आपण सुशिक्षित आहात! तर माझ्या शंकेचे निरसन कराल? त्याने आनंदाने सहमती दर्शविली! म्हटलं तुमच्या हातात जे सिगारेटचे पाकिट आहे त्यावर एक सूचना लिहीली आहे ती वाचून दाखवाल का? आता मात्र शिक्षकाला डिवचल्याचे परिणाम काय असतात याचा आत्मसाक्षात्कार त्याला झाला. ते काहीच बोलेनात हे पाहून मी ती सूचना मोठ्याने वाचली- CIGARETTE SMOKING  IS INJURIES TO YOUR HEALTH " अर्थातच सिगारेट पिणे हे तुमच्या आरोग्यास अपायकारक आहे" मी म्हणालो मी तुमच्या इतका सुशिक्षित नाही पण सिगारेट पिणे हे आरोग्यास अपायकारक आहे म्हणून ती पिण्याचा मूर्खपण कधीच केला नाही आणि करणार नाही. तेच दारुचं ! सिगारेट आणि मद्यपान ही जर प्रतिष्ठेची आणि सुशिक्षितपणीची प्रतिकं असतील तर अशी प्रतिष्ठा आणि सुशिक्षितपणा नसलेलाच बरा!
प्रस्तावना इतकी लांबवण्याचं कारण हे की मनुष्य ४ पुस्तकं शिकतो आणि आपल्याली बरंच काही प्राप्त झाल्याचा आव आणतो! हा कसला अहंकार आहे? ज्ञानामुळे विनय येतो,चारित्र्य येते,विवेक येतो,समदृष्टी येते,निरपेक्षता येते, आपपरभाव नष्ट होतो, समाधानी वृत्ती येते, परदोष त्यागून सद्गुणग्राहता येते. हो!असेल! पण मुळात ज्ञान म्हणजे काय? याची अगदी साधी सोपी व्याख्या करता येईल-"जे अनुभवातून प्राप्त झाल्याने जे जे असत्य व अज्ञान म्हणून असेल त्याचा  समूळ नाश होतो ते ज्ञान होय! अगदी व्यवहारातील उदाहरण द्यायचं झालं तर  -" साखर गोड आहे हे नुसतं कुणी तरी सांगण ही झाली माहिती आणि आपण प्रत्यक्ष तिची चव घेऊन खात्री करुन घेणं हे झालं ज्ञान! "
आता ज्ञान आणि विज्ञान यात फरक तो काय? ज्ञान म्हणजे काय ते कळालं! विज्ञान म्हणजे ज्ञानाबद्दल विशेष माहिती! थोडक्यात जे मूळातच अस्तित्वात आहे,(उपनिषदात त्यास "ऋत" अशी संज्ञा आहे,ज्याचात कधीच बदल होत नाही ते) त्याच्याबद्दल विशेष माहिती म्हणजे विज्ञान! उदाहरणार्थ -
१)झाडावरुन पडलेलं सफरचंद पाहिलं आणि न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला म्हणे! हा शोध लागला म्हणजे नेमकं काय झालं? तर गुरुत्वाकर्षण हे आधीपासूनच अस्तित्वात आहे हे झालं ज्ञान ! पण झाडावरुन फळ गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीवर पडतं हे झालं विशेष ज्ञान!
२)पाण्याचे रासायनिक सूत्र- H2O अर्थातच हायड्रोजनचे २ अणू आणि ऑक्सीजनचा १ अणू  असे आहे. हे सूत्र कळण्याआधी पाणी नव्हते का? तर होतेच! पण ते कशापासून तयार झाले हे "विज्ञान" सांगते!
अर्थात् जे अंधारात आहे ते प्रकाशात आणण्याचे काम विज्ञान करते. इथे मला कुठेही विज्ञानास कमी लेखायचे नाही.सूर्यापासून निघालेला किरण जसा सूर्याचाच भाग असतो तद्वत विज्ञान हा ज्ञानाचा भाग आहे. सूर्य मावळतो म्हणजे तो आपल्या दृष्टीच्या पलिकडे जातो, त्याचे किरण आपल्यापर्यत पोहोचत नाहीत याचा अर्थ सूर्याचे अस्तित्वंच नाही असा होत नाही. तद्वत या विश्वात अनेक कोडी आहेत जी विज्ञानास अनुत्तरीत आहेत. आज ना उद्या सुटतील. पण जोपर्यंत ती सुटत नाहीत तोपर्यंत ती थोताड म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही.
याबाबतीत पाश्चात्य वैज्ञानिकांना खरोखर मानलं पाहिजे!
१) ज्ञान भाषा संस्कृत अनेक प्रगत देशात सक्तीची होतेय! (आपल्याकडे त्यास अजूनही भगवेकरण म्हणून विरोध होतो) जी भाषा ख्रिश्चन राष्ट्रात सक्तीची होऊ शकते ती तिच्या मातृभूमीत का नाही?
२) भारतीय ग्रंथातील हजारो वर्षांपूर्वीचे ग्रहता-यांचे मोजमाप काहा पाश्चात्य अवकाश संशोधन संस्थांनी पडताळून पाहिले आणि सत्यता पटल्यावर मान्य करुन ते ग्रंथ अभ्यासक्रमात शिकवू लागले!
३)आयुर्वेदावर प्रचंड अध्ययन पाश्चात्य देशात सुरु आहे, हळदी आणि कडूनिंबाचे पेटंट घेण्यापर्यंत मजल गेली होती.
४)ज्योतिषशास्त्र हे असंच विनाकारण बदनाम झालेलं शास्त्र! भारतात मोबाईल वापरास नवीन नवीन सुरुवात झाली होती. तेव्हा त्यातील काडीचंही ज्ञान कुणाला नव्हतं! तेव्हा मोबाईल रिपेअरींगचा कोर्स केलेल्यांनी त्यावेळी तुफान लुट केली. तसंच काहीसं या शास्त्राचं आहे. तुम्ही योग्य व्यक्तीकडे गेलात तर ठीक नाहीतर तुमची फसवणूक पक्की! आणि दूर्दैवाने अशा व्यक्ती खरंच दूर्मिळ आहेत! म्हणून तर महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध पंचांगकर्त्याकडे खुद्द "नासा"ने पंचांग निर्मितीची अर्थात् कोणत्याही वैज्ञानिक साधनांचा आधार न घेता केवळ तोंडी आकडेमोडीवर दरवर्षी सातत्याने इतके अचूक पंचाग बनविण्याच्या युक्तीची मागणी केली. त्यांनी ती दिली नाही हे वेगळे सांगावयास नको.
आपल्याकडे उथळ पाण्याचा खळखळाट फार वाढला आहे, तुम्ही इंजिनिअर असाल,डॉक्टर असाल! शिक्षक असाल! पण तुमच़्या बुद्धीला मर्यादा आहेत! तुमच्या माहितीला मर्यादा आहेत! आपण जेवढं शिकलो त्यापुढे त्या विषयात ज्ञान नाहीच असं होणं शक्य नाही. थोडक्यात आपण सर्वज्ञ नाहीत. यावर जरुर चिंतन व्हावे!
विज्ञानास कमी लेखणे हा या लेखाचा उद्देश नव्हे तर ज्ञानाचे श्रेष्ठत्व आणि अस्तित्व पटवून देणे हा आहे! विज्ञानसुद्धा काय करतं जिथे त्याला मर्यादा पडतात तिथे ते " देवकण" (GOD PRACTICAL) नाव देऊन मोकळं होतं !
हेच वास्तव आहे!
©"श्रीरामकृष्ण"चरणरज
9763776339
कृपया सदर लेखात वा लेखकाच्या नावात वा क्रमांकात कोणताही बदल करु नये ही नम्र विनंती!!

1 comment: