Monday, 9 May 2016

"त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोSसि।


मनुष्य उत्क्रांतीच्या काळातील निर्वस्त्र अवस्थेपासून ते आजच्या विवस्त्र अवस्थेपर्यंतच्या प्रवासास दिलेले सुशोभित असे नाव म्हणजे प्रगती होय! हे अनेकांच्या पचनी पडणार नाही याची पूरेपूर कल्पना आहे. तरीही सत्य हे सूर्यासारखं लख्ख तेजस्वी असतं! कितीही पतंगांनी त्यावर उड्या मारण्याचा प्रयत्न केला तरी तेजाला काडीमात्र फरक पडत नाही उलट पतंगांची वाढणारी संख्या ही प्रतिपश्चंद्रलेखेव वृद्धिंगत होणा-या तेजाचं प्रतिक असतं. साधारण मनुष्य टोळी करुन रहायला लागल्यापासून त्याच्या प्रगतीस सुरुवात झाली असं म्हणतात! बौद्धिक विकास आणि भौतिक प्रवास अशा दोन प्रकारात हा प्रवास होता. ऋषीमुनींच्या अवस्थेपर्यंत पोहोचलेला मनुष्य हा बौद्धिक विकासाची सर्वोत्तम पातळी म्हणता येईल,ज्यात त्याला स्वतःचे ,विश्वाचे आणि विश्वात होऊन गेलेल्या व भविष्यात होऊ घातलेल्या घटनांचे ज्ञान झाले होते. आपले आर्षग्रंथ याची साक्ष देण्यास समर्थ आहेत.
त्याचबरोबर जिथे  ऋषीमुनींनी बौद्धिक सौंदर्याची परिसीमा गाठली होती तिथेच राजे लोकांनी उच्चात्युच्च वस्त्रांची परंपरा कायम केली होती, एकेकाळी नखशिखांत भरजरी वस्त्रात नटलेली स्त्री ही सौंदर्याचा मानदंड मानली जात होती. पण आजची परिस्थिती विरुद्ध आहे. जितकी अंगावर वस्त्रे कमी तितके सौंदर्य आणि श्रीमंती अधिक!
आता थोडं विकसित/आधुनिक/हायप्रोफाईल  मानवाबद्दल ! काही महिन्यांपूर्वीचा प्रसंग आहे. काही कामानिमित्त एस.टी महामंडळाच्या कृपाछत्राखाली प्रवास करण्याचा योग आला. सवयी प्रमाणे काही अध्यात्मिक पुस्तक काढून वाचावयास सुरुवात केली होती. शेजारीच बसलेले सद्गृहस्थ हे बराचवेळ न्याहाळत होते. दरम्यान काही फोनसुद्धा येऊन गेले. फोनवर बोलताना "देवाची कृपा" वगैरे भगवंताबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे शब्द ओघानेच बाहेर पडत होते. फोन बंद झाल्यावर न राहवून त्या सद्गृहस्थाने मला माझा व्यवसाय विचारला ! मी शिक्षक असल्याचे सांगितल्यावर त्याला अधिकच चेव आला. आणि तुम्ही शिक्षक असून इतके अशिक्षित आणि मागासलेले कसे काय? माझ्या श्रद्धेला अशिक्षितपणा म्हणणारा महाज्ञानी आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी मी त्याला परिचय विचारला व त्यातून ती व्यक्ती डॉक्टर असल्याचे कळले.पण याच्याशी सरळ वाद घालणं म्हणजे मूर्खपणा झाला असता.कारण या विज्ञानवादी लोकांना पुरावा लागतो. मी देवाला प्रार्थना केली-"देवा ! याला पुरावा दाखवायची संधी दे!" आणि थोड्याच वेळात गाडी एका ढाब्यावर थांबली. तेव्हा हे सद्गृहस्थ उतरले आणि एक धूम्रशलाकेचे(सिगारेट) पाकिट घेऊन गाडी जवळ येऊन धूम्रपानास सुरुवात केली . ही संधी सोडली असती तर रात्री झोप नसती लागली. मी तात्काळ खाली उतरलो . एस.टी. मधून पुरेसे लोक पहात असल्याची खात्री करुन मी त्याला प्रश्न विचारला-"आपण सुशिक्षित आहात! तर माझ्या शंकेचे निरसन कराल? त्याने आनंदाने सहमती दर्शविली! म्हटलं तुमच्या हातात जे सिगारेटचे पाकिट आहे त्यावर एक सूचना लिहीली आहे ती वाचून दाखवाल का? आता मात्र शिक्षकाला डिवचल्याचे परिणाम काय असतात याचा आत्मसाक्षात्कार त्याला झाला. ते काहीच बोलेनात हे पाहून मी ती सूचना मोठ्याने वाचली- CIGARETTE SMOKING  IS INJURIES TO YOUR HEALTH " अर्थातच सिगारेट पिणे हे तुमच्या आरोग्यास अपायकारक आहे" मी म्हणालो मी तुमच्या इतका सुशिक्षित नाही पण सिगारेट पिणे हे आरोग्यास अपायकारक आहे म्हणून ती पिण्याचा मूर्खपण कधीच केला नाही आणि करणार नाही. तेच दारुचं ! सिगारेट आणि मद्यपान ही जर प्रतिष्ठेची आणि सुशिक्षितपणीची प्रतिकं असतील तर अशी प्रतिष्ठा आणि सुशिक्षितपणा नसलेलाच बरा!
प्रस्तावना इतकी लांबवण्याचं कारण हे की मनुष्य ४ पुस्तकं शिकतो आणि आपल्याली बरंच काही प्राप्त झाल्याचा आव आणतो! हा कसला अहंकार आहे? ज्ञानामुळे विनय येतो,चारित्र्य येते,विवेक येतो,समदृष्टी येते,निरपेक्षता येते, आपपरभाव नष्ट होतो, समाधानी वृत्ती येते, परदोष त्यागून सद्गुणग्राहता येते. हो!असेल! पण मुळात ज्ञान म्हणजे काय? याची अगदी साधी सोपी व्याख्या करता येईल-"जे अनुभवातून प्राप्त झाल्याने जे जे असत्य व अज्ञान म्हणून असेल त्याचा  समूळ नाश होतो ते ज्ञान होय! अगदी व्यवहारातील उदाहरण द्यायचं झालं तर  -" साखर गोड आहे हे नुसतं कुणी तरी सांगण ही झाली माहिती आणि आपण प्रत्यक्ष तिची चव घेऊन खात्री करुन घेणं हे झालं ज्ञान! "
आता ज्ञान आणि विज्ञान यात फरक तो काय? ज्ञान म्हणजे काय ते कळालं! विज्ञान म्हणजे ज्ञानाबद्दल विशेष माहिती! थोडक्यात जे मूळातच अस्तित्वात आहे,(उपनिषदात त्यास "ऋत" अशी संज्ञा आहे,ज्याचात कधीच बदल होत नाही ते) त्याच्याबद्दल विशेष माहिती म्हणजे विज्ञान! उदाहरणार्थ -
१)झाडावरुन पडलेलं सफरचंद पाहिलं आणि न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला म्हणे! हा शोध लागला म्हणजे नेमकं काय झालं? तर गुरुत्वाकर्षण हे आधीपासूनच अस्तित्वात आहे हे झालं ज्ञान ! पण झाडावरुन फळ गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीवर पडतं हे झालं विशेष ज्ञान!
२)पाण्याचे रासायनिक सूत्र- H2O अर्थातच हायड्रोजनचे २ अणू आणि ऑक्सीजनचा १ अणू  असे आहे. हे सूत्र कळण्याआधी पाणी नव्हते का? तर होतेच! पण ते कशापासून तयार झाले हे "विज्ञान" सांगते!
अर्थात् जे अंधारात आहे ते प्रकाशात आणण्याचे काम विज्ञान करते. इथे मला कुठेही विज्ञानास कमी लेखायचे नाही.सूर्यापासून निघालेला किरण जसा सूर्याचाच भाग असतो तद्वत विज्ञान हा ज्ञानाचा भाग आहे. सूर्य मावळतो म्हणजे तो आपल्या दृष्टीच्या पलिकडे जातो, त्याचे किरण आपल्यापर्यत पोहोचत नाहीत याचा अर्थ सूर्याचे अस्तित्वंच नाही असा होत नाही. तद्वत या विश्वात अनेक कोडी आहेत जी विज्ञानास अनुत्तरीत आहेत. आज ना उद्या सुटतील. पण जोपर्यंत ती सुटत नाहीत तोपर्यंत ती थोताड म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही.
याबाबतीत पाश्चात्य वैज्ञानिकांना खरोखर मानलं पाहिजे!
१) ज्ञान भाषा संस्कृत अनेक प्रगत देशात सक्तीची होतेय! (आपल्याकडे त्यास अजूनही भगवेकरण म्हणून विरोध होतो) जी भाषा ख्रिश्चन राष्ट्रात सक्तीची होऊ शकते ती तिच्या मातृभूमीत का नाही?
२) भारतीय ग्रंथातील हजारो वर्षांपूर्वीचे ग्रहता-यांचे मोजमाप काहा पाश्चात्य अवकाश संशोधन संस्थांनी पडताळून पाहिले आणि सत्यता पटल्यावर मान्य करुन ते ग्रंथ अभ्यासक्रमात शिकवू लागले!
३)आयुर्वेदावर प्रचंड अध्ययन पाश्चात्य देशात सुरु आहे, हळदी आणि कडूनिंबाचे पेटंट घेण्यापर्यंत मजल गेली होती.
४)ज्योतिषशास्त्र हे असंच विनाकारण बदनाम झालेलं शास्त्र! भारतात मोबाईल वापरास नवीन नवीन सुरुवात झाली होती. तेव्हा त्यातील काडीचंही ज्ञान कुणाला नव्हतं! तेव्हा मोबाईल रिपेअरींगचा कोर्स केलेल्यांनी त्यावेळी तुफान लुट केली. तसंच काहीसं या शास्त्राचं आहे. तुम्ही योग्य व्यक्तीकडे गेलात तर ठीक नाहीतर तुमची फसवणूक पक्की! आणि दूर्दैवाने अशा व्यक्ती खरंच दूर्मिळ आहेत! म्हणून तर महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध पंचांगकर्त्याकडे खुद्द "नासा"ने पंचांग निर्मितीची अर्थात् कोणत्याही वैज्ञानिक साधनांचा आधार न घेता केवळ तोंडी आकडेमोडीवर दरवर्षी सातत्याने इतके अचूक पंचाग बनविण्याच्या युक्तीची मागणी केली. त्यांनी ती दिली नाही हे वेगळे सांगावयास नको.
आपल्याकडे उथळ पाण्याचा खळखळाट फार वाढला आहे, तुम्ही इंजिनिअर असाल,डॉक्टर असाल! शिक्षक असाल! पण तुमच़्या बुद्धीला मर्यादा आहेत! तुमच्या माहितीला मर्यादा आहेत! आपण जेवढं शिकलो त्यापुढे त्या विषयात ज्ञान नाहीच असं होणं शक्य नाही. थोडक्यात आपण सर्वज्ञ नाहीत. यावर जरुर चिंतन व्हावे!
विज्ञानास कमी लेखणे हा या लेखाचा उद्देश नव्हे तर ज्ञानाचे श्रेष्ठत्व आणि अस्तित्व पटवून देणे हा आहे! विज्ञानसुद्धा काय करतं जिथे त्याला मर्यादा पडतात तिथे ते " देवकण" (GOD PRACTICAL) नाव देऊन मोकळं होतं !
हेच वास्तव आहे!
©"श्रीरामकृष्ण"चरणरज
9763776339
कृपया सदर लेखात वा लेखकाच्या नावात वा क्रमांकात कोणताही बदल करु नये ही नम्र विनंती!!

Friday, 6 May 2016

आमचा आदर्श घोटाळा!!!

शीर्षक वाचून हा राजकिय लेख असेल असा समज झाला असेल तर तो आधीच काढून टाका. पण आमच्या युगायुगांच्या आदर्शांबाबत झालेलं राजकारण मात्र विसरता येणारं नाही. प्रसंग अगदी साधा ! संध्याकाळची वेळ म्हणून सहज गेटमधे लहान मुलांचे चाललेले बाललीलायुक्त खेळ पाहत उभा होतो. शेजारीच खेळणारा एक मुलगा मला पाहून माझ्याकडे आला आणि मला सहज बाळबोधपणे विचारलं-
"x#%" (चित्रपटावर आक्षेप नाही पण सध्याच्या बहूचर्चित चित्रपटाचे नाव घेतले तर अनेकांची पोटे दुखतील आणि मूळ विषय भरकटेल म्हणून मुद्दाम नामोल्लेख टाळला आहे) चित्रपट पाहिला का? " त्यावर माझा त्याला प्रतिप्रश्न होता-"१मे ला शाळेत गेला होतास का?" यावर त्याचं निरागस उत्तर होतं-" १मे ला शाळेत काय असतं?" मला माझं उत्तर मिळालं ! अतिशयोक्ती नाही पण ह्यावर्षी शासनाने शाळेचा निकाल ५ मे ला वितरण करावयास सांगितला आणि परिणाम १ मे वर झाला. त्यानिमित्ताने हे देखील कळलं की १ मे ला गर्दी ही केवळ निकाल घेण्यासाठी असते, राष्ट्रध्वजाला वंदन करण्यासाठी नव्हे. यामुळेच जवळपास सर्वच शाळांमधे बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी राष्ट्रध्वजाला वंदन करण्यासाठी उपस्थित होते.
वरील प्रसंग सांगायचा उद्देश हा की नको त्या गोष्टींना अवास्तव महत्वं प्राप्त होऊन "आदर्शांबाबत" प्रचंड घोटाळा निर्माण झाला आहे.

१)चित्रपट व चित्रपटाचे नायक नायिका- भारतीय संस्कृती,कला आणि साहित्य यांचे उदात्तचित्रण करुन ते जगभरात अभिमानाने मिरवण्यासाठी झटणा-या परंतु संख्येने बोटावर मोजण्याइतक्या असलेल्या निर्माते,दिग्दर्शक,संवाद लेखक,संगीतकार आणि अभिनेत्यांची जाहीर माफी मागून असं जाहीर सांगायला आजिबात जीभ चाचरणार नाही की-" सद्यस्थितीतील चित्रपट हे च्यूईंगम सारखे आहेत .ते कधीतरी मनोरंजन  म्हणून चघळावेत आणि चित्रपटगृहाबाहेर त्याची गोडी संपलेली असते तिकीटासोबत तिथेच फेकून द्यावेत.चर्चा करु नये ! माझ्या दृष्टीने हीच त्यांची लायकी! वासना चाळवणारी दृष्ये,समाजात विरोधाचे आणि जातीय वाद निर्माण करणारे आणि अनुकरणप्रिय तरुणपीढी समोर नको ते "आदर्श" निर्माण करणे हे जर उद्देश असतील तर "महाराष्ट्र दिन" हा महाराष्ट्र "दीन"च राहील. या अभिनेत्यांचे काय आदर्श घ्यायचे? त्यांना ना धड चारित्र्य! ना समाजाबद्दल सहानुभूती!! ना सरकारी कर भरण्याचे भान! ना रहदारीचे नियम!!! ना देशभक्ती!! ना संस्कृतीची जाण!!! काय घ्यायचं यांच्या कडून? स्पेशल इफेक्ट वापरुन न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचे नियम धाब्यावर बसवून चार दृश्ये दाखवली अर्थहीन परंतु वासना चाळवणारी दृश्ये भरुन गरमागरम दृश्ये दाखवली की यांचे चित्रपट  गेले १०० करोडच्या पुढे! हा विरोधाभास म्हणावा की शोकांतिका? जे न्यूज चॅनल दिवसभर दुष्काळाच्या निधीसाठी तडफडणारे शेतकरी आणि त्यांच्या करुण कहाण्या दाखवतात!!कोट्यावधी रुपयांचे घोटाळे करणारे वा शेतक-यांचे कैवारी म्हणवणारे राजकारणी नेते खिशातला एक रुपया न सोडता शब्दांच्या आणि आश्वासनांचा पाऊस पाडताना थकत नाहीत . तेच न्यूज चॅनल वाले " चित्रपट विश्लेषण" दाखवताना किती चित्रपटांनी १००,२००,३०० करोडचा बिझनेस केला हे दाखवायला आजिबात लाजत नाहीत. हा पैसा आला कुठून? हा इतका पैसा सामान्य जनता चित्रपटांना एका आठवड्यात देऊ शकते तर दुष्काळास मदत करायची ठरवली तर एप्रिल आणि मे महिन्यात ती सर्वच प्रकारची संकटे अलगद दूर करु शकत नाही काय? बरं हे चित्रपट निर्माते पण इतके भिकार की अद्यापपर्यंत कोणी दुष्काळास मदत जाहीर केल्याचे ऐकिवात नाही! मग यांचे चित्रपट आम्ही का पहावेत? चित्रपटांची चोरी होऊ नये म्हणून जेवढं जपता तेवढं संस्कार आणि संस्कृती नासू नये म्हणून कधी प्रयत्न करणारं?

२) डेलीसोप मालिका- सासू-सुनांचे भांडण, प्रेमाचे त्रिकोण,विवाहबाह्य संबंध आणि आता नवीन आलेला फंडा म्हणजे लग्न झालेल्या पुरुषाला त्याच्या बायकोपासून तोडून त्याच्याशी लग्न करण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी म्हणजे काय ते कुंकवाचे भाग्य!! सुज्ञ आणि संमजस काही लोक सोडले तर दुपारी घरकाम उरकल्यावर रिकाम्या डोक्यात काही तरी खूळघालून देण्यात पटाईत असलेल्या मालिका जेव्हा आपली भावी प्रॉपर्टी पहात असेल तेव्हा त्यांच्यावर नकळत काय संस्कार होत असतील याचा विचार करा! शाळांमधे वाढणारी प्रेमप्रकरणे आणि आत्महत्या याला कारण या मालिका आणि चित्रपट आहेत. अभ्यासाचे ओझे,परीक्षेचा तणाव, शिक्षकांचा जाच वगैरे ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. शिक्षक शिक्षा करतात म्हणून बोबलणा-यांनी स्वतः लहानपणी खाल्लेला मार आणि त्यामुळे जीवनाला लागलेली शिस्त आणि वळण आठवावेत! तितकं पुरेसं आहे!

३) खरे हिरो- "ऐ मेरे वतन के लोगों जरा आँख मे भरलो पानी जो शहीद हूए है उनकी जरा याद करो कुर्बानी" १५ ऑगस्ट, २६ जानेवारी ह्या दिवशी रेडीओ आणि शाळेत लाऊडस्पिकरवर वाजवायचं आणि फार तर त्या दिवसापूर्ती मोबाईलवर रिंगटोन म्हणून ठेवायचं हे गीत ! अशीच कदाचित याची ओळख! पण वास्तवात हेच खरे हिरो आहेत! जात,धर्म,वंश,सण,वार,उत्सव यापैकी कशाचीच पर्वा न करता डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमेचे रक्षण करणारा सैनिक आमच्या दृष्टीने हिरो का नाही??? चित्रपटांत जे काल्पनिक दाखवतात तेच वास्तवात हे करुन दाखवतात! एका चित्रपटातील डायलॉग(चित्रपटाचीच भाषा कळते म्हणून) मुद्दाम सांगवा वाटतो- "अगर तुम वहाँ(सीमारेषेवर युद्धाच्या वेळी) होते तो तुम्हारी गांड फट कर तुम्हारे हात मे आ जाती।" हे भीषण वास्तव आहे! ह्याला म्हणतात जिगर! वाघाचं काळीज वगैरे जे काही म्हणतात ते हेच! नाहीतर आठवडाभर बर्फाखाली  जिवंत राहण्याची इच्छाशक्ती आपल्यापैकी कुणाकडे असेल असं वाटत नाही. दूर पहाडांवर गोळ्यालागून जखम सडली, जखमेत आळ्या झाल्या तरी लढायची जिद्द कायम ठेवण्याचं सामर्थ्य कोणत्या बॉलीवूडच्या शेंबड्या हिरोत असेल असं वाटत नाही !!! म्हणून तो डायलॉग खास त्यांच्यासाठीच! जरा कल्पना करा की , घरातून निरोप घेऊन गेलेला मुलगा,भाऊ,पती,वडील परत जिवंत घरात येतील याची शाश्वती नाही. शहीद झालेच तर अंत्यदर्शन सुद्धा होईल की नाही याची शाश्वती नाही! आणि अशा माणसाशी विवाह करण्याचा निर्णय घेणं ह्याला म्हणतात खरं प्रेम आणि ह्या प्रेमासाठी "वाघिणीचंच काळीज" लागतं ! हे प्रेम इंग्रजी किंवा मराठी वा कोणत्याही भाषेत न सांगता कळतं! बापाच्या जीवावर गाड्या उडवणा-यांनी,दारु,सिगारेट वर पैसा उधळणा-यांनी सैन्यात जायची इच्छा फक्त घरी बोलून दाखवावी़!!!!वास्तव लगेच कळेल!

४)मातृभाषेची लाज- इंग्रजांच राज्य १५० वर्ष !!! इस्लामी सत्तेचं ५०० हून अधिक वर्ष!!!! इंग्रजी भाषा केवळ ११ देशात संपर्क भाषा म्हणून वापर! गणित चूकल्यासारखं वाटतंय! ह्याचा वरवरचा विचार जरी केला तरी उर्दू किंवा तत्सम भाषेचा आणि संस्कृतीचा आमच्यावर जास्त प्रभाव असायला हवा! पण केवळ १५० वर्ष राज्य केलेला इंग्रज व इंग्रजी भाषा तसेच आंग्ल/पाश्चात्य संस्कृती आमच्यावर इतकी प्रभाव पाडून आहे की आम्हास मातृभाषेचा विसर पडलाय! परराष्ट्रात जायचं म्हणून त्या त्या देशाची जर्मन,फ्रेंच,जपानी इ. भाषा जीवाच्या आकांताने आत्मसात करणारा भारतीय मनुष्य अनेक वेळा दृष्टीपथास येतोच मात्र भारतात यायचे म्हणून हिंदी शिकणारा मनुष्य विरळाच! जगातील इतर कोणत्याही भाषेच्या तुलनेत प्रचंड शब्दसाठा असणा-या भाषा आमच्या युगायुगांच्या परपरांच्या साक्षीदार असताना परभाषेतून अध्ययनाचे भीकेचे डोहाळे सर्वप्रथम कोणास कसे लागले हा वेगळा अभ्यासाचा विषय आहे.
वॉटसअप वर "संस्कृत" च्या एकाग्रुप मधे संस्कृत हा माझा आवडीचा विषय आहे असं इंग्रजीत सांगून दोन महाराष्ट्रीय व्यक्तीमधे चाललेला संवाद हा अशा प्रकारे सुरु होता की - मी शुद्ध मराठीत संवाद साधत होतो आणि पलिकडे संस्कृतप्रेमी असलेली परंतु इंग्रजी शाळेची मुख्याध्यापक असणारी व्यक्ती इंग्रजीतून संवाद साधत होती!! दोन मराठी माणसं मराठीत बोलू शकतं नाहीत का?

५)देशभक्त- या देशात असे काही लोक आहेत जे आता "भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरु" यांनाच अतिरेकी ठरवून ते अभ्यासक्रमात शिकवू पाहत आहेत!! ही घोडचूक होतेच कशी? परकीय इतिहास शालेय अभ्यासक्रमात शिकवायला भारतीय स्वातंत्र्याचा आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास संपला की काय? की असहिष्णूतेच्या नावाने तो शिकवायचा बंद करताय? कट्टर देशभक्ती आणि धर्मग्रंथांचा अभ्यास हा प्रत्येक जातीधर्माला सहिष्णूतेच्या मार्गावर घेऊन जाईल! आपण आज एकत्र राहत नाहीये! या आधी हजारो वर्षांपासून आपल्या देशात अनेक संस्कृती एकत्र नांदत आहेत मग आजच असं काय झालं? कित्येक गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत मुस्लिम बंधू भगिनी आनंदाने सामील झालेले अनुभवले आहेत तर ईदच्या दिवशी आजची त्यांची मिष्टान्ने खायला आवर्जून जाणा-यांना असहिष्णूता काय असते हे माहित नाही! भाजी विकत घेताना,दूकानातून धान्य घेताना हे कोणत्या जातीच्या वा धर्माच्या व्यक्तीने पिकवले आहे असे विचारलेली व्यक्ती पाहण्यात नाही! दवाखान्यात सेवा करणारी नर्स आणि मरण यातना कमी करणारा डॉक्टर यांच्याबाबतीत ही शंका येत नाही!
सहज वैयक्तिक पातळीवर प्रयोग म्हणून फेसबूक,टीव्ही आणि मोबाईल एक आठवडा बंद ठेवा आपल्या सारखा सुखी माणूस जगात नाही असं जाणवेल! तसंच आपण आपल्या मातृभूमीचं काही तरी देणं लागतो हे भान आपोआप येईल . मग आपली भावी पीढी म्हणजेच आपली प्रॉपर्टीने कोणता आदर्श ठेवावा याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही!
।।जनहितार्थ जाहीर।।
टीप- पटलं तर घ्या!
- ©अमेय दीपक कानडे ,9763776339
कृपया सदर लेखात वा लेखकाच्या नावात वा क्रमांकात कोणताही बदल करु नये ही नम्र विनंती!!