Friday, 29 April 2016

स्त्री-पुरुष समानता? किती वास्तव!!!

स्त्री-पुरुष समानता? किती वास्तव!!!

स्त्री-पुरुष समानता यावर कितीही आरडाओरड केली तरी ती सर्वथा अशक्य आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि ही विषमता निसर्गानेच प्रदान केलेली आहे. समाजात सर्वात मोठी जी अंधश्रद्धा आहे ती ही की भारतीय संस्कृतीत स्त्रीयांना मानाचे स्थान नाही !
तैत्तिरीय उपनिषदात गुरुकुलात अध्ययनासाठी आलेल्या शिष्याला गुरु उपदेश करत असत- सत्यं वद।(खरे बोलावे),धर्मं चर।(धर्माचरण करावे), सत्यापासून विचलित होऊ नये,धर्मापासून विचलित होऊ नये, स्वाध्यायापासून परावृत्त होऊ नये असा उपदेश केल्यावर दुस-या श्लोकात -
देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् ।(देव आणि पितृकार्य म्हणजे श्राद्धकर्म इ. पासून परावृत्त होऊ नये) मातृदेवो भव । (मातेला देवतुल्य मानावे)पितृदेवो भव ।(वडिलांना देवतुल्य मानावे) आचार्यदेवो भव । (आचार्य अर्थातच गुरुंना देवतुल्य मानावे) अतिथिदेवो भव । (अतिथी देवतुल्य मानावा)......
(तैत्तिरीय उपनिषद्, शिक्षावल्ली, अनुवाक ११, मंत्र २)
वेदांवर पुरुष प्रधानतेचा आरोप केला जातो. पण इथे मात्र सुरुवातच मातृपूजनाने आहे. वेदांमधील व मनुस्मृतीतील काही ठराविक श्लोकांचा संदर्भ घेऊन त्याचा मागचा पुढचा संदर्भ जाणून न घेता आरोप करणं सोप्पं आहे. पण वैदिक संस्कृती इतकं मानाचं आणि देवतुल्य स्थान इतर कोणत्याही संस्कृतीत शोधून सापडणार नाही याची शाश्वती मी देतो.

समाजात स्त्रियांना मानाचे स्थान नसते, तर स्त्रीदाक्षिण्य हा शब्दच अस्तित्वात नसता. पूर्वीच्या काळी स्त्रिया सुशिक्षित नव्हत्या. त्यांना शिकण्याचे स्वातंत्र्य होते. तसेच ते गायन, वादन, कला, व्यवसाय इत्यादींच्या बाबतीतही होते. इतकेच नव्हे तर युद्धकलेतही त्या निपुण असत. वक्तृत्व व विद्वत्ता यासाठी अनेक स्त्रिया प्रसिद्ध होत्या. मध्ययुगात (इ. स.६००-१२००) तर इंद्रलेखा, शीला, सुभद्रा अशा अनेक स्त्रिया कवयित्री होऊन गेल्या. गणितासारख्या विषयातही स्त्रियांना गती असे. भास्कराचार्यांनी आपल्या मुलीला गणित विषय शिकवण्याविषयी लिहिले आहे. काही स्त्रिया वैद्यकिय पेशा पत्करीत.

आठव्या शतकात ‘रूसा’ नावाच्या हिंदू स्त्रीवैद्याने स्त्रीरोगांवर पुस्तक लिहिले. ते इतके उपयुक्त होते की, त्याचे अरबी भाषेत भाषांतर करण्यात आले. इ.स. तिसर्‍या शतकापर्यंत अविवाहित राहून मुली शिकत असत. पुरूषांप्रमाणे त्यांना स्वतंत्र बौद्धिक व आत्मिक जीवन होते. या जीवनाला आवश्यक असे शिक्षण त्यांना मुलांच्या बरोबरीने मिळत असे. मुलींचे उपनयनही होत असे (पुढे मात्र हे बंद झाले). उपनयनानंतर मुली वैदिक स्तोत्रे, व नित्यनैमित्तिक लागणारी सूत्रे मुखोद्गत करीत. वेदांतील कित्येक सूत्रे स्त्रियांनी लिहिलेली आहेत. सूर्या, जुहू, वाक्, इंद्राणी, श्रद्धा, शचि, समिराज्ञी, रोमशा, लोपामुद्रा, शश्‍वती इत्यादी अनेक स्त्रियांची सूक्ते ऋग्वेदात आहेत. उपनिषदांमध्येही गार्गी, सुलभा, मैत्रेयी, सुवर्चसा, अरूंधती, इत्यादी विद्वान स्त्रिया आढळतात.

या शिवाय थोडं पुढे जाऊन सातवाहन काळातील महाराणी नागणिका नागवर्धायनी ही महाराष्ट्राची पहिली महाराणी होती. ही महाराज सातकरणीची पत्नी होती. तिचा दरारा इतका होता की त्या वेळच्या चलनातील नाण्यांवर सर्वप्रथम तिचे नाव व त्यानंतर राजाचे नाव कोरले गेले होते. नागणिकाने दोन अश्वमेध यज्ञ केले होते. त्या काळातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ती प्रसिद्ध होती. महाराणी गौतमी बलश्री ही सातवाहन साम्राज्याची आणखी एक बलाढय़ आणि आदर्श महाराणी होती. सातवाहनांच्या तब्बल तीन पिढय़ांचा राज्यकारभार तिने पाहिला व एक उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून तिने सातवाहनांना राज्यकारभारात मदत केली. वैभवात आणि संकटात कसे वागावे? हे गौतमी बलश्रीकडून शिकावे. या दोन महाराण्यांमुळे इतिहास घडला. शक, हूण आणि कनिष्काचा पराभव झाला.

अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात भारतातील स्त्रियांवर अनाचार होत होते. सुमारे 400 वर्षे आक्रमकांनी हैदोस घातला होता. अशा वेळी महाराष्ट्रात मराठा साम्राज्याचा उदय झाला. जिजाऊंनी शिवबांना घडविले. यातच जिजाऊंचे मोठेपण आणि आदर्श व्यक्तिमत्त्व दडले आहे. यावेळी धर्मवीर संभाजींच्या पत्नी राणी येसूबाई यांचे नाव विसरुन चालणार नाही. त्या संभाजी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.

तीक्ष्ण बुद्धीची व सदाचारी मुलगी ही कुळाला भूषणच होय, ही विचारसरणी त्या काळी होती, व आजही आहे. पुढे समाजाची बदलती मानसिकता, पाठशाळा व इतर साधनसुविधांचा अभाव, तसेच मोंगल आक्रमणानंतर घरातील मुलींनाच नव्हे तर, विवाहित स्त्रियांनाही घराबाहेर पडणे कठिण झाले. तरीही धर्म-नीती-अनीती, तत्त्वज्ञान, प्राचीन संस्कृती यांचे ज्ञान स्त्रियांना होते. निरक्षर असूनही स्त्रियांनी हिंदू संस्कृतीचे रक्षण केले. याचे श्रेय पुराण, श्रवण, धर्मपालन, संतकवींच्या वचनाचे पठण यासच जाते, असे अनेक विद्वानांचे मत आहे. आजही भारतीय संस्कृती या स्त्रियांनीच टिकवून ठेवली आहे. या सगळ्यांचा विचार करता व पूर्वीच्या काळातील स्त्री व आजच्या पुरोगामी काळातील स्त्री यांची तुलना करता, आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य व हक्क यांचा अतिरेक होऊन कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाली असल्याचे, कौटुंबिक स्वास्थ बिघडल्याचे दिसून येते. आणि हे कोणीही अमान्य करु शकत नाही.

लग्नाच्या निमित्ताने उपवर कन्यांचे बायाडेटा पहायचे सद्भाग्य लाभले. फार धक्कादायक अपेक्षा़ होत्या. आणि अत्यंत निर्लज्जपणे त्या स्पष्ट शब्दात मांडल्या होत्या. पैसा हाताशी आला की पोरांची बुद्धी फिरते, शहरातली संस्कृती अंगात भिनल्याने पोरांना आपल्या गावाकडच्या आईबापाला शहरात आणायची लाज वाटते वगैरे खुळचट कल्पनांची बुद्धीला लागलेली जळमट क्षणात जळून राख झाली. काही अपेक्षा़ मुद्दाम नोंदवतोय-
१)लग्नानंतर वेगळं राहणा-यांनीच संपर्क करावा.
२)आई-वडील चालतील पण फोटोत!
३)बहिणीची लग्नाची जबाबदारी असलेल्यांनी संपर्क करु नये.
४) अपंग आई-वडील असल्यास संपर्क करु नये.
ह्यातलं काहीही मनाचं नाही. वाचलेले बायाडेटा आहेत. बराच काळ सांभाळून ठेवले होते. लग्न झाल्यावर त्यांची योग्य विल्हेवाट लावली.
पुणे-मुंबई सारख्या सुधारीत शहरांच समजू शकतो पण नगर सारख्या शहरात कापड बाजारातून सहज फिरत असताना दोन महाविद्यालयीन तरुणींचे कानावर पडलेला संवाद- "अगं तो लग्नाचा हट्ट करतोय मी त्याला सांगितलं की आपण " लिव्ह इन" मधे कम्फरटेबल आहोत कशाला लग्न करायचं?" त्यावर मैत्रीणीने मैत्रीपूर्ण सल्ला दिला-" हो़! अगदी बरोबरंय तुझं! बावळट आहे का तो?"
या संवादातून आणि वरील अपेक्षा़ंमधून मला फक्त वास्तव सांगायचं आहे. कुणालाही दोष द्यायचा नाहीये. मद्यपान आणि धूम्रपानात सुद्धा स्त्री-पुरुष समानता आलेली आहे. एकेकाळी प्रेयसीने सांगितलंय म्हणून दारु सोडणा-या प्रेमवीरांचं रुपांतर प्रेयसी सोबतंच प्यायला बसण्यात झाल्याचं दर्शन सर्रास घडतं! सिगारेट शेअर करणं ही सर्वसामान्य झालेली बाब! ह्या गोष्टी न करणारा माणूस यांच्या लेखी बुरसटलेला आणि गावंढऴ! कोणत्या बळावर आपण संस्कृती आणि चारित्र्याच्या गप्पा मारतो? "फॉर अ चेंज" म्हणून महिन्याला प्रियकर बदलणा-या कित्येक स्त्रीया समाजात आहेत. हे भयाण वास्तव आहे. मग कोणत्या बळावर आपण धार्मिक स्थळात गाभा-यात प्रवेशाची मागणी स्त्री-पुरुषांनी करावी? मनाचे पावित्र्य काय असते हे संत कान्होपात्रांकडे पाहून कळते!
अध्यात्म हा राजकारणाचा विषय होऊ शकत नाही आणि तो करु ही नये! राजकारण हे माणसाशी खेळता येतं निसर्गाशी नव्हे!!! माया,ममता,मार्दवता,
प्रेम,मातृत्व,सौंदर्य हे सर्व निसर्गातील कोमल सद्गुण निसर्गाने स्त्रीयांना देऊन पुरुषांवर अन्याय केलाय असं पुरुषांनी का म्हणू नये? सुंदर पुरुष कर्तृत्ववान नसेल तर त्याच्या सौंदर्याला काडीची किंमत देत नाही. तसेच मार्दवता जरी जास्त असेल तर वेगळीच शंका घेतली जाते. आणि सर्वात महत्वाचं नवीन जीव जन्माला घालून तो वाढविण्याचा जबरदस्त विश्वास निसर्गाने स्त्रीयांवरच दाखवलाय! अर्थातच कणखरपणा,ऱाग, क्रूरता हे पाशवी गुण पुरुषांकडे आहेत ते स्त्रीयांच्या कोमलतेला जपण्यासाठी! आणि स्त्री मग ती आई असो बहिण असो वा अाजी वा अजून कोणी! यांच्या मुळेच पुरुषाचा पुरुषोत्तम होतो. अन्यथा तो निसर्गत: केवळ नरच असतो.
आता थोडं अध्यात्मासंदर्भात! स्त्रीयांचं शरीर हे मुळातच कोमल असतं! त्यामुळे कोणत्याही तीक्ष्ण गोष्टी ते सहन करु शकत नाही! मंदिरांचा विचार केला तर अवकाशातील ग्रहता-यांचा आणि त्यातून निघणा-या लहरींचा परिणाम मानवी शरीरावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे होतो हे अभ्यासून आपल्या ऋषीमुनींनी खगोलविज्ञान आणि स्थापत्यशास्त्र यांचा अभ्यास करुन विशिष्ट आकारात मंदिरे बनवून घेतली. तिथे वेदोच्चार किंवा मंत्रोच्चाराद्वारे प्रचंड शक्तीचा स्त्रोत निर्माण केला. ही शक्ती लहरींच्या स्वरुपात तिथे साठून राहते. काही ठिकाणी ह्या लहरी अतितीव्र असतात ज्या स्त्रीयांच्या कोमलतेला बाधक असतात! ज्यामुळे तिच्या शरीरावर प्रतिकूल परिणाम होऊ होतो. खास करुन गर्भाशयावर! या कारणांमुळे काही ठराविक ठिकाणी स्त्रीयांना प्रवेशाचे निर्बंध असतात! वेदोच्चारांच आणि मंत्रांच तेच! यांची निर्मिती खास विशिष्ट पद्धतीच्या उच्चाराने केलेली आहे. ज्यामुळे मंत्रयुक्त शब्दांच्या उच्चाराने विशिष्ट प्रकारची कंपने निर्माण होतात! हे  "कंपन मापन" यंत्राद्वारे सिद्ध करता येते! (हे खास विज्ञानवादी अंधश्रद्धाळू आणि पाश्चात्य पिशाच्चानी पछाडलेल्या बाधितांसाठी) हे उच्चार करताना शरीरात प्रचंड उष्णता निर्माण होते. योग्य आहार,आचरण,शूचीर्भूतता  व व्यायाम न केल्यास वेदाध्ययन करणा-या पुरुषाला सुद्धा याचे प्रतिकूल परिणाम भोगावे लागतात.
स्त्रीयांनी जर याचा उच्चार केला तर हळू हळू आवाज घोगरा होणे मग पुढे दाढी-मिशा येणे असे जनुकिय बदल सुरु होतात! यात त्यांचे सर्व कोमल गुण निघून जातात! ह्याला कोणता कायदा मान्यता देत असेल तरीही हे निसर्गाच्या कायद्याविरुद्ध आहे! म्हणजे हे निसर्ग चक्राच्या विरुद्ध आहे.
निसर्ग निर्मित कायदे मोडले की निसर्ग काय शासन करतो याची आपणांस पूर्ण कल्पना आहे!
तात्पर्य हेच की निसर्गाने स्त्री-पुरुषांना दिलेल्या अत्यंत वैविध्यपूर्ण शारिरीक आणि मान्य विषमतेला एकमेकांच्या सामंजस्यामुळेच पूर्णत्व प्राप्त होत असते. म्हणून पत्नीला अर्धांगिनी असे म्हणतात. विधूरास (ज्याची पत्नी मृत आहे अशी व्यक्ती) यज्ञकर्मास आजही बसता येत नाही! हे वेदांनी स्त्रीयांना दिलेले पूर्णत्व नव्हे काय?
इतकं विवेचन करुनही प्रत्यक्षात किती स्वीकार होईल देव जाणे! पण सत्य सांगणं हे कर्तव्य आहे! नाही सांगितलं तर ते पाप ठरतं असं गुरुमार्गदर्शन आहे.
यावर चिंतन जरुर व्हावे व या समाजातून मद्यपान ,धूम्रपान आणि
१)दोन स्त्रीयांचा आपसातील द्वेष
२)विवाह बाह्य संबंध
३)प्रेमाचे त्रिकोण या त्रिसूत्रींवर आधारलेल्या सासू-सूनांच्या मालिका यांना हद्दपार करता आले तर अनेक विवेकाच्या गोष्टी स्त्री-पुरुषांना सूचतील! माता ह्या केवळ मादा न राहता राजमाता जिजाऊ होतील,पुत्र हे राजपुत्र आणि पती हे छत्रपती होतील!असा आशावाद बाळगायला हरकत नाही! समाजाचे सत्व जपायची जबाबदारी स्त्रीयांवर तर त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी पुरुषांवर आहे,हे दोघांचेही कर्तव्य आहे. आणि कर्तव्य विन्मूख होऊ नये असे गीतेचे आणि सर्वच वेदोपनिषदांचे सार आहे.
©-"श्रीरामकृष्ण"चरणरज
9763776339
टीप- सदर लेखाच्या कोणत्याही मजकूरात अथवा नावात आणि क्रमांकात कोणताही बदल करु नये.