Wednesday, 23 March 2016

बलिदानाची तेजस्वीता

अब भी जिसका खून न खौला खून नही वो पानी है,.
जो देश के काम  आये वो बेकार जवानी है..।

२३ मार्च ही तारीख ३१ डिसेंबर,१४फेब्रुवारी किंवा ऑगस्ट मधला पहिला रविवार इतकी महत्वाची नक्कीच नाही. पण स्वतःस तरुण म्हणवणा-या प्रत्येक भारतीय नागरिकास हा दिवस निश्चितच राष्ट्रभक्तीची ज्योत नव्याने प्रज्वलित करणारा आहे. काय आहे २३ मार्च? काय घडलं होतं या दिवशी इतिहासात? वयाची केवळ २० वर्षे ओलांडलेले तीन तेजस्वी तरुण "भारतमाता की जय"," वन्दे मातरम्","इन्कलाब जिंदाबाद" अशा घोषणा देत आनंदाने फासावर चढले!!! कोण होते हे तरुण? हे तीन तरुण म्हणजे भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरु! यांनी मातृभूमीसाठी केलेल्या  बलिदानाची स्मृती कायम ठेवणारा हा "शहिद दिन"
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है
देखना है जोर कितना बाजूए कातील मे है।
आज हे अभिमानाने सांगाव वाटतं की तो असा काळ होता की गळ्यावर सुरी ठेवली तरी "भारतमाता की जय" म्हणणं सोडायला हेच काय कोणताही भारतीय तयार नव्हता! मूठभर इंग्रज मारुन मारुन किती लोकांना मारतील? स्वातंत्र्यलढा सुरु असताना प्रत्येक घरातून "भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरु" निर्माण होण्याची भाषा बोलली जात होती. शाळांमधून इतिहास हा स्वकियांचा शिकवला जावा यासाठी आंदोलने केली जात होती.
आजमात्र परिस्थिती उलट आहे.माझा आजचा दिवस हा या शहिदांना अर्पण म्हणून जाहीर केल्यानंतर आमची प्रसार माध्यमे जागी होऊन या शहिदांच्या बलिदानाची बातमी करुन स्वतःची ब्रेकिंग न्यूज रुपाने प्रसिद्ध करायला लागली आहेत. शाळेत विचारायची सोय नाही. आज काय आहे? असं विचारलं तर कुणी म्हणे "वॉटर डे",कुणी -" स्पॅरो डे" तर अजून कुणी कसले कसले घाणेर"डे" सांगितले. तेजस्विता,तपस्विता आणि तितिक्षा हे गुण ज्याच्या अंगी त्यास तरुण म्हणावं असं वाचलं होतं. आमच्या तरुणाईचं वाचन इतकं थोर की या ३ शब्दांचे अर्थ सुद्धा "गुगल सर्च" करावे लागतील. ज्यांच्या बलिदानाने हा दिवस भारतभूमीच्या इतिहासात सुवर्णाक्षरात नोंदवला गेला ते मात्र शेवटच्या क्षणापर्यंत वाचन करत होते. याची स्वतःला लाज वाटणं सोडा "त्यावेळी मोबाईल नव्हते" हे उपहासात्मक उत्तर मिळावं? याहून या देशाची शोकांतिका काय असावी?
जवानी अर्थातच तारुण्य हे आजकाल समाजात निर्लज्जपणे अर्धनग्न(?) वस्त्रात वावरणा-या स्त्रिपुरुषांपुरतं किंवा वॉटसअॅप किंवा फेसबूकवर येणा-या पूर्णनग्न व्हिडीओ क्लिप पुरतं मर्यादीत राहीलंय की काय असा प्रश्न समाजातील परिस्थिती पाहिल्यावर पडतो. वासना आणि पुढारकीच्या प्रचंड आहारी गेलेली तरुणाई परीक्षेत केंद्रात पर्यवेक्षकांना दमदाटी करुन सर्रास कॉपी करायला मागे पुढे पहात नाही. यावर कळस म्हणून या तरुणाईला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढायची भिस्त असणारे त्यांचे शिक्षकसुद्धा बेधडक फळ्यावर उत्तरं लिहून द्यायला मागेपुढे पहात नाहीत. हा "शैक्षणिक व्याभिचार" नव्हे काय? सगळीकडे हेच चालतं असं वर तोंड करुन सांगायला जराही लाज न वाटणा-यांकडे देशाचे भावी आधारस्तंभ घडवायला कसे सोपवावेत? तरुणाईच्या नावाने ओरडताना स्वातंत्र्यानंतरच्या पिढीने आपण आपल्या पुढच्या पिढीस स्वातंत्र्याची किंमत समजावून द्यायला कमी तर पडलो नाही ना? याची शहानिशा जरुर करावी. कारण आजचं समाजात स्वैराचाराचं आलेलं पीक हे आपणच काही काळापुर्वी पेरलेल्या संस्कारांच फलित आहे यात जराही शंका बाळगू नये.
आज देशात देशद्रोहाचे वारे वाहत आहेत. चित्रपटसृष्टीतील सगळी "खानावळ" ही आमचा आदर्श! कुणी देशद्रोह करुन अतिरेक्यांना शस्त्र साठवायला मदत केली तर कुणी मद्यधुंद होऊन फुटपाथवरची माणसं गाडी खाली चिरडली. आणि वर निर्लज्जपणाने "Being Humans" नावाचे कपडे प्रसिद्ध केले. जर हे आमचे आदर्श असतील तर सामूहिक बलात्कार वा "जे.एन्.यू." प्रकरणं होणं फारसं नवल नाही. बरेच पालक अनेक भ्रष्ट नेत्यांची पाठराखण करताना दिसतात आणि आपला पाल्य मात्र क्लासवन ऑफिसर करण्याची स्वप्ने पाहतात. किती विरोधाभास आहे? जे पेरलंय तेच उगवणारं! माणसाने अनैसर्गिक कृती स्वीकारल्या असल्या तरी निसर्गाने नाही! मनुष्यत्वाकडून पशुत्वाकडे होणारी वाटचाल कधी थांबेल हे देव जाणे!
पण या शहिद दिनाच्या निमित्ताने "स्वामी विवेकानंद,भगत सिंग, सुखदेव,राजगुरु" हे काही शतकातील देशहितदक्ष तारुण्य तर "छत्रपती शिवाजी महाराज,बाजीप्रभू देशपांडे,धर्मवीर संभाजी,बाजीराव पेशवे,महाराणा प्रताप,पृथ्वीराज चौहान" ही तारुण्याची धगधगती मूर्तीमंत उदाहरणं होती. देशकार्याच्या प्रचंड यज्ञकुंडात यांनी स्वेच्छेने आपल्या पूर्णाहूती दिल्या ज्यांना शतकानुशतके हे विश्व आचरणीय स्मरणात ठेवेल! हनुमंथाप्पा,विजयकुमार,डॉ.ए.पी.जे.अब्दूलकलाम,डॉ.विजय भटकर,डॉ.अनिल काकोडकर अशी एक ना अनेक नावे सांगता येतील, आणि चित्रपटसृष्टी सोडवत नसेलच तर नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे आणि अक्षयकुमार ही देखील नावं सांगता येतील. पण भ्रष्ट, घोटाळेबाज,गटे आणि शेतक-यांचे कैवारी म्हणवणारे हे राजकिय गट असू शकतील पण भावी पिढीसाठी आदर्श मात्र नक्कीच होऊ शकणार नाहीत. शिक्षणव्यवस्था ही राजकारणापेक्षा श्रेष्ठ आणि राजकारणापासून दूर ठेवली तर हा तरुण भारत तरुन जाईल. अन्यथा स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात वेदमंत्रांच्या इतकं पवित्र्य असणारे "भारतमाता की जय,वंदे मातरम्।" हे मंत्र उच्चारायला किती जणांना लाज वाटेल हे काळ आणि आपले आदर्शच ठरवतील!
आजचा योग हा अभूतपूर्व आहे. होळी आणि शहिद दिन एकाच दिवशी आला आहे. आज या देशाला,धर्माला आणि संस्कृतीला लांछन असणा-या सर्व प्रथा आणि खोटे आदर्श होळीच्या अग्नित जाळून आपल्या मनाला आलेले मालिन्य दूर करण्याचा संकल्प करुया!
भारतमाता की जय !!!

No comments:

Post a Comment