Wednesday, 23 March 2016

बलिदानाची तेजस्वीता

अब भी जिसका खून न खौला खून नही वो पानी है,.
जो देश के काम  आये वो बेकार जवानी है..।

२३ मार्च ही तारीख ३१ डिसेंबर,१४फेब्रुवारी किंवा ऑगस्ट मधला पहिला रविवार इतकी महत्वाची नक्कीच नाही. पण स्वतःस तरुण म्हणवणा-या प्रत्येक भारतीय नागरिकास हा दिवस निश्चितच राष्ट्रभक्तीची ज्योत नव्याने प्रज्वलित करणारा आहे. काय आहे २३ मार्च? काय घडलं होतं या दिवशी इतिहासात? वयाची केवळ २० वर्षे ओलांडलेले तीन तेजस्वी तरुण "भारतमाता की जय"," वन्दे मातरम्","इन्कलाब जिंदाबाद" अशा घोषणा देत आनंदाने फासावर चढले!!! कोण होते हे तरुण? हे तीन तरुण म्हणजे भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरु! यांनी मातृभूमीसाठी केलेल्या  बलिदानाची स्मृती कायम ठेवणारा हा "शहिद दिन"
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है
देखना है जोर कितना बाजूए कातील मे है।
आज हे अभिमानाने सांगाव वाटतं की तो असा काळ होता की गळ्यावर सुरी ठेवली तरी "भारतमाता की जय" म्हणणं सोडायला हेच काय कोणताही भारतीय तयार नव्हता! मूठभर इंग्रज मारुन मारुन किती लोकांना मारतील? स्वातंत्र्यलढा सुरु असताना प्रत्येक घरातून "भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरु" निर्माण होण्याची भाषा बोलली जात होती. शाळांमधून इतिहास हा स्वकियांचा शिकवला जावा यासाठी आंदोलने केली जात होती.
आजमात्र परिस्थिती उलट आहे.माझा आजचा दिवस हा या शहिदांना अर्पण म्हणून जाहीर केल्यानंतर आमची प्रसार माध्यमे जागी होऊन या शहिदांच्या बलिदानाची बातमी करुन स्वतःची ब्रेकिंग न्यूज रुपाने प्रसिद्ध करायला लागली आहेत. शाळेत विचारायची सोय नाही. आज काय आहे? असं विचारलं तर कुणी म्हणे "वॉटर डे",कुणी -" स्पॅरो डे" तर अजून कुणी कसले कसले घाणेर"डे" सांगितले. तेजस्विता,तपस्विता आणि तितिक्षा हे गुण ज्याच्या अंगी त्यास तरुण म्हणावं असं वाचलं होतं. आमच्या तरुणाईचं वाचन इतकं थोर की या ३ शब्दांचे अर्थ सुद्धा "गुगल सर्च" करावे लागतील. ज्यांच्या बलिदानाने हा दिवस भारतभूमीच्या इतिहासात सुवर्णाक्षरात नोंदवला गेला ते मात्र शेवटच्या क्षणापर्यंत वाचन करत होते. याची स्वतःला लाज वाटणं सोडा "त्यावेळी मोबाईल नव्हते" हे उपहासात्मक उत्तर मिळावं? याहून या देशाची शोकांतिका काय असावी?
जवानी अर्थातच तारुण्य हे आजकाल समाजात निर्लज्जपणे अर्धनग्न(?) वस्त्रात वावरणा-या स्त्रिपुरुषांपुरतं किंवा वॉटसअॅप किंवा फेसबूकवर येणा-या पूर्णनग्न व्हिडीओ क्लिप पुरतं मर्यादीत राहीलंय की काय असा प्रश्न समाजातील परिस्थिती पाहिल्यावर पडतो. वासना आणि पुढारकीच्या प्रचंड आहारी गेलेली तरुणाई परीक्षेत केंद्रात पर्यवेक्षकांना दमदाटी करुन सर्रास कॉपी करायला मागे पुढे पहात नाही. यावर कळस म्हणून या तरुणाईला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढायची भिस्त असणारे त्यांचे शिक्षकसुद्धा बेधडक फळ्यावर उत्तरं लिहून द्यायला मागेपुढे पहात नाहीत. हा "शैक्षणिक व्याभिचार" नव्हे काय? सगळीकडे हेच चालतं असं वर तोंड करुन सांगायला जराही लाज न वाटणा-यांकडे देशाचे भावी आधारस्तंभ घडवायला कसे सोपवावेत? तरुणाईच्या नावाने ओरडताना स्वातंत्र्यानंतरच्या पिढीने आपण आपल्या पुढच्या पिढीस स्वातंत्र्याची किंमत समजावून द्यायला कमी तर पडलो नाही ना? याची शहानिशा जरुर करावी. कारण आजचं समाजात स्वैराचाराचं आलेलं पीक हे आपणच काही काळापुर्वी पेरलेल्या संस्कारांच फलित आहे यात जराही शंका बाळगू नये.
आज देशात देशद्रोहाचे वारे वाहत आहेत. चित्रपटसृष्टीतील सगळी "खानावळ" ही आमचा आदर्श! कुणी देशद्रोह करुन अतिरेक्यांना शस्त्र साठवायला मदत केली तर कुणी मद्यधुंद होऊन फुटपाथवरची माणसं गाडी खाली चिरडली. आणि वर निर्लज्जपणाने "Being Humans" नावाचे कपडे प्रसिद्ध केले. जर हे आमचे आदर्श असतील तर सामूहिक बलात्कार वा "जे.एन्.यू." प्रकरणं होणं फारसं नवल नाही. बरेच पालक अनेक भ्रष्ट नेत्यांची पाठराखण करताना दिसतात आणि आपला पाल्य मात्र क्लासवन ऑफिसर करण्याची स्वप्ने पाहतात. किती विरोधाभास आहे? जे पेरलंय तेच उगवणारं! माणसाने अनैसर्गिक कृती स्वीकारल्या असल्या तरी निसर्गाने नाही! मनुष्यत्वाकडून पशुत्वाकडे होणारी वाटचाल कधी थांबेल हे देव जाणे!
पण या शहिद दिनाच्या निमित्ताने "स्वामी विवेकानंद,भगत सिंग, सुखदेव,राजगुरु" हे काही शतकातील देशहितदक्ष तारुण्य तर "छत्रपती शिवाजी महाराज,बाजीप्रभू देशपांडे,धर्मवीर संभाजी,बाजीराव पेशवे,महाराणा प्रताप,पृथ्वीराज चौहान" ही तारुण्याची धगधगती मूर्तीमंत उदाहरणं होती. देशकार्याच्या प्रचंड यज्ञकुंडात यांनी स्वेच्छेने आपल्या पूर्णाहूती दिल्या ज्यांना शतकानुशतके हे विश्व आचरणीय स्मरणात ठेवेल! हनुमंथाप्पा,विजयकुमार,डॉ.ए.पी.जे.अब्दूलकलाम,डॉ.विजय भटकर,डॉ.अनिल काकोडकर अशी एक ना अनेक नावे सांगता येतील, आणि चित्रपटसृष्टी सोडवत नसेलच तर नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे आणि अक्षयकुमार ही देखील नावं सांगता येतील. पण भ्रष्ट, घोटाळेबाज,गटे आणि शेतक-यांचे कैवारी म्हणवणारे हे राजकिय गट असू शकतील पण भावी पिढीसाठी आदर्श मात्र नक्कीच होऊ शकणार नाहीत. शिक्षणव्यवस्था ही राजकारणापेक्षा श्रेष्ठ आणि राजकारणापासून दूर ठेवली तर हा तरुण भारत तरुन जाईल. अन्यथा स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात वेदमंत्रांच्या इतकं पवित्र्य असणारे "भारतमाता की जय,वंदे मातरम्।" हे मंत्र उच्चारायला किती जणांना लाज वाटेल हे काळ आणि आपले आदर्शच ठरवतील!
आजचा योग हा अभूतपूर्व आहे. होळी आणि शहिद दिन एकाच दिवशी आला आहे. आज या देशाला,धर्माला आणि संस्कृतीला लांछन असणा-या सर्व प्रथा आणि खोटे आदर्श होळीच्या अग्नित जाळून आपल्या मनाला आलेले मालिन्य दूर करण्याचा संकल्प करुया!
भारतमाता की जय !!!

Thursday, 10 March 2016

वर्धापन दिन श्रीगुरुदेवांचा !!!

।।श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः।।
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।अ-४,श्लोक७।।
अर्थातच जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा धर्माचे अभ्युत्थान घडवून आणण्यासाठी मी स्वतःला प्रकट करेन!
हे गीता वचन सर्वश्रुत आहे! कलीयुगात धर्माच्या नावाने जी
संभ्रमाची वादळ उठली आहेत ती मती गुंग करुन टाकणारी आहेत! कोणत्याही सामान्य माणसाला खरं काय? आणि खोटं काय? या विवंचनेत टाकणारी आजची परिस्थिती आहे! धर्म म्हणजे काय? तो कसा आचरावा? आपले व्यावहारिक जीवन सांभाळून त्याची अध्यात्माशी सांगड कशी घालावी? खरा धर्म कोणता? असे एक ना अनेक प्रश्न मनुष्याच्या बुद्धीला छळताना दिसतात. मग यांची उत्तरे तो मिळेल त्या माध्यमातून शोधू लागतो. ह्या गोंधळात तो जी मनःशांती शोधत असतो ती मात्र त्याला कुठेच मिळताना दिसत नाही. माणसाची अध्यात्मिक प्रगती होण्यासाठी त्याला योग्य मार्गदर्शक हवा असतो! आपली संस्कृती ही ज्ञानावर आणि ज्ञानोपासनेवर आधारलेली आहे. आणि ज्ञान मिळवण्याचे एकच ठिकाण आहे ते म्हणजे गुरुस्वरुप!
परमेश्वर हा कार्यकारणास्तव अवतार घेतो आणि तो जेव्हा सामान्य जनांना शिकवण्याच्या आणि उद्धाराच्या हेतूने येतो तेव्हा तो गुरुस्वरुपात येतो. आपल्या संस्कृतीला हजारो वर्षांची गुरुपरंपरा लाभली आहे! याच गुरुपरंपरेतील एक विभूतीमत्त्व धर्मरक्षणासाठी आणि सामान्य जनांना आधार देण्यासाठी फाल्गुन शुद्ध तृतीया शके १८५५ रोजी या भूतलावर गुरुस्वरुपात परमपूज्य श्रीरामकृष्ण क्षीरसागर हे व्यावहारिक नाव धारण करुन अवतरले!
वयाच्या अवघ्या सातव्या ईश्वरी दर्शन झालेले आणि वयाच्या दहाव्या वर्षी ६०० वर्षांपूर्वी श्रीशैल्य येथे गुप्त झालेल्या परमपूज्य श्रीनृसिंह सरस्वती स्वामी यांनी साक्षात मानव रुपात दर्शन देऊन अनुग्रहीत केलेले हे गुरुस्वरुप आजही चैतन्यरुपाने अहमदनगर येथील वेदांतनगरात श्रीदत्तात्रेय निवासात विराजमान आहे! परमपूज्य गुरुदेवांवर जेव्हा परमपूज्य श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांनी अनुग्रह केला तेव्हा त्यांच्याकडे जे कार्य आले ते म्हणजे धर्म सांभाळणे,धर्म समजावून सांगणे आणि वेदांत विचारांवर आधारित धर्माची स्थापना करणे! आपली संस्कृती ही वेदांवर आधारित आहे. पृथ्वी आणि वेद हे एकाचवेळी निर्माण झालेले आहेत! वेदांचा उच्चार चालला तर पृथ्वीवर सर्व जीवांचे पोषण होते,निसर्गातील प्रदूषण कमी होते,पर्जन्यवृष्टी वेळेवर होते, अन्नधान्य मुबलक प्रमाणात पिकते!! एकूणच सृष्टीचा समतोल साधला जातो! या करिता वेदांचे रक्षण आणि त्यांचे संवर्धन ही सद्यस्थितीत काळाची गरज आहे! परमपूज्य गुरुदेवांनी या करिता "वेदांत" ही भव्य वास्तु त्याकरिता उभारली असून चारही वेदांचे मोफत शिक्षण(कोणत्याही सरकारी अनुदाना शिवाय) देण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. ईश्वरीशक्ती एकदा प्रकट झाली की तिच्या छायेत येणा-या सर्वांचे ती कल्याणच करते असे गुरुमार्गदर्शन आहे! अशाच सहिष्णू विचारांमुळे परमपूज्य गुरुदेवांचे सर्वच जातीतील आणि धर्मातील भक्त आहेत! परमेश्वर हा सर्वत्र एकच आहे व तो केवळ शुद्ध भावनेने अनुभवता येतो अशी गुरुदेवांची शिकवण असल्याने त्यांचा खरा भक्त जातीभेदाच्या वा धर्मभेदाची कुंपणे स्वतःच्या व्यावहारिक जीवनात पाळत नाही.
परमपूज्य गुरुदेवांच्या मार्गदर्शनात संदिग्धता नाही,तर्ककर्कशता नाही,मोठमोठे ग्रांथिक संदर्भ नाहीत! "धर्म" म्हणजे चांगले विचार धारण करणे आणि ते प्रत्यक्ष आचरणात आणणे." सद्यस्थितीत धर्माची इतकी सोपी व्याख्या केवळ गुरुचरणीच अनुभवास येऊ शकते! सामान्य जनांची मनाची अवस्था ओळखून सोप्या आणि सहज भाषेत ईश्वराचे स्वरुप परमपूज्य गुरुदेवांनी नेहमीच वर्णन केले. यामुळे त्यांचा कोणताही भक्त भगवंताबद्दल भीती न बाळगता भक्तीयुक्त अंतःकरणाने भगवंताला शरण जाऊन कृपा अनुभवू लागतो!
परमपूज्य गुरुदेवांच्या अविश्रांत आणि खडतर तपश्चर्येच्या प्रभावाने श्रीदत्तात्रेय निवासात "चिंतामणी पादूकांच्या रुपाने" त्यांच्या परमगुरुंनी श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांनी निवास केलेला आहे. याची प्रचिती म्हणून या क्षेत्रात दर्शनाला येणारा प्रत्येक जण चिंतामुक्त जीवन अनुभवतो. प्रपंच करणा-यांना प्रपंच कर्तव्य भावनेने करा,वर्णाश्रम धर्म पाळा अशी शिकवण मिळाल्याने येणारा प्रत्येक भक्त हा कलीच्या गोंधळात सुद्धा उत्तम प्रकारचे मानसिक समाधान मिळवतो! भक्तांनी विचारलेल्या प्रापंचिक प्रश्नांचे तसेच दैनंदिन जीवनात कळत नकळत होणा-या चूकांवरील अचूक मार्गदर्शन परमपूज्य गुरुदेवांनी नेहमीच सहज सोप्या भाषेत आपल्या सत्संगाचा लाभ घेणा-या प्रत्येकालाच केले. हे मार्गदर्शन काही भक्तांनी लिहून घेतले आणि यातूनच गुरुवाणी,अमृत कलश,धर्मदर्शन आणि सद्गुरु संवाद यांसारख्या ग्रंथसंपदेने गुरु मुखातील निघालेल्या ज्ञानपुष्पांचा आकार धारण केला. गुरुमुखातून निघालेल्या वाणीला वेदवाणीचा अधिकार आहे! तिच्यात तिचे तंतोतंत पालन करणा-याचा उद्धार करण्याचे सामर्थ्य आहे.
सर्वसामान्यपणे "मंत्र दिला म्हणून गुरु,दिक्षा दिली म्हणजे गुरु अशी प्राथमिक कल्पना प्रत्येकाची असते. पण गुरु ही व्यक्ती नसून ते एक तत्त्व आहे. ते आज आहे उद्या नाही अशी नश्वर गोष्ट नाही. ते केवळ स्मरणाने सुद्धा संतुष्ट होतात. तुम्ही कुठेही असा ! आपल्या मनात शुद्ध अंतःकरणाने जरी त्यांची गुरु म्हणून प्रतिष्ठापना केली तरी त्या क्षणापासून ही तुम्हाला अनुभव द्यायला प्रारंभ करते" ह्या अशा विश्वासपूर्ण मार्गदर्शनामुळे साधक कोणत्याही प्रतिकूल प्रसंगाला धैर्याने सामोरा जाण्यास सक्षम होतो! धर्माचरण करु लागल्याने विवेक ओघानेच येतो आणि एक सुजाण नागरिक बनतो. अर्थातच अध्यात्माद्वारे देवभक्ती आणि देशभक्ती करु लागल्याने वेगळे समाजकार्य करण्याची आवश्यकता परमपूज्य गुरुदेवांना कधीही भासली नाही! गुरुदेव सांगत की-
"मनुष्याचे मन अंतःकरण सद्धर्मनिष्ठ होणे,तसा सतत प्रयत्न करणे,स्वतःच्या प्रयत्नाने ते इतरांच्या अनुभवाला आणून देणे हे खरे समाजकार्य आहे."
"धर्म सांभाळणा-यांना धर्म सांभाळायला मदत करणे हे देखील धर्म सांभाळल्या सारखेच आहे."
"सर्वांमधे सामावून सर्वांना सामावून घेणे म्हणजे सहिष्णूता"
“तुमचा प्रपंच तुमच्या प्रारब्धाने होतो, पण अध्यात्मिक प्रगती मात्र तुमच्या कृतीने होते. त्यासाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक आहे.” ते सांगत कि, “मी तुमचा अध्यात्मगुरु आहे. कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसून कुरमुरे मागू नका तर पूर्व सुकृताने मिळालेल्या संधीचा फायदा घ्या व आत्मोन्नती साधा”
"संकटकाळी आपद्ग्रस्तांना मदत करणे हे पुण्य नसून ते कर्तव्य आहे मदत केली नाही तर ते पाप ठरते"
अशा मार्गदर्शनामुळे भक्त चमत्काराच्या नादी न लागता स्वतःची अध्यात्मिक पात्रता वाढवण्याकडे लक्ष देतो.
गावोगावी स्थापन केलेली सत्संग मंडळे ही सभासदाला अध्यात्मिक प्रगती बरोबरच आपण एका मोठ्या कुटुंबाचे सदस्य असल्याची भावना दृढ करतात.
भगवंतांनी या भूमीवर चिंतनीय श्रीकृष्ण आणि अनुकरणीय श्रीराम म्हणून नरदेहात जन्म घेतला. धर्म रक्षणासाठी पुन्हा पुन्हा अवतार धारण केला. याच वचनपूर्तीसाठी कलीयुगात "श्रीरामकृष्ण" या रुपात तो पुनश्च याच म्हणजे फाल्गुन शुद्ध तृतीयेला अवतरला. जीवनात सद्गुरुंचा लाभ होणे हे परीसस्पर्श होण्यासारखे आहे. हे चिंतामणी आपल्या आत्मज्योतीच्या स्वरुपात आजही श्रीदत्तात्रेय निवासात विराजमान आहेत. परमपूज्य गुरुदेवांच्या संकल्पनेतून साकार झालेले व भक्तांकरवीच धर्मभिक्षेतून उभे राहीलेले भगवान श्री दत्तात्रेयांचे त्रिभूवन सुंदर मंदिर सर्वांसाठी मोठे आधारस्थान आहे. श्री दत्तात्रेय निवासातील चिंतामणी पादूका,गुरुदेवांना नीलवर्णकांतीने पूर्णत्त्व आलेले अधिष्ठान व कल्पवृक्ष या ईश्वरी अस्तित्त्वाच्या चिह्नांमुळे श्रीगुरुंचे चरित्र आणि आदिनाथांपासून सुरु झालेली श्रीगुरुपरंपरा
आजमितीपर्यंत अव्याहत सुरु असल्याची साक्ष आहे. हा कल्पवृक्ष सर्वांना आधार देण्यासाठी अखंड उभा आहे. याच्या सावलीत येणा-याला तो कृपाछाया देईलच यात शंका नाही.
"साखर गोड आहे हे सांगता येतं पण तिची गोडी ज्याची  त्यानेच अनुभवायची असते"
।।श्रीरामकृष्णार्पणमस्तु।।
-"श्रीरामकृष्ण"चरणरज
9763776339

Sunday, 6 March 2016

महिषासुराच्या उदात्तीकरणाचा वध

नमस्ते सिद्ध-सेनानि, आर्ये मन्दर-वासिनी,
कुमारी कालि कापालि, कपिले कृष्ण-पिंगले।।
महाभारताच्या युद्धाच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्णांच्या आदेशावरुन अर्जुनाने दुर्गेची स्तुती केली होती. या स्तुतीला प्रसन्न होऊन आदिमाया दुर्गा प्रकट झाली आणि कुरुक्षेत्रात कालीच्या रुपाने दुष्टांचा संहार करु लागली. अर्थातच जेव्हा जेव्हा दुष्ट प्रवृत्तीचा नाश करणे क्रमप्राप्त झाले तेव्हा या आदिमायेने आपली माया प्रकट केली आहे.
नवरात्र तर नाही आणि या दुर्गेचे अवेळी आवाहन करायचे प्रयोजन काय? तर त्याचं कारण सरळ आहे. महिषासुराची प्रजा पुन्हा एकदा जागृत होतेय! राजकारण हा भारताचा फार पुरातन विषय! याचे अनेक धडे भारतानेच या जगाला दिले.तसेच राजकारण हे सत्तेकरिता नसुन जनसामान्यांच्या कल्याणाकरिता केले जावे अशी शिकवण भारतीय राजनीतीने जगाला दिली. याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! महाराष्ट्राची कुलस्वामिनी,रक्षणकर्ती महामाया आई तुळजाभवानी हे सुद्धा दुर्गेचेच रुप! हिच्याच कृपेने एकेकाळी महाराजांनी अफजलखानासारखा रेडा मारला आणि दहशतवाद कसा संपवायचा याचं आदर्श उदाहरण घालून दिलं! ही दुर्गा म्हणजेच अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत श्री खंडेराय यांची अर्धांगिनी!
पण काही तथाकथित राजकारणी आणि समाजकंटक आमच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्यासाठी महिषासुराचं उदात्तीकरण करु पहात आहेत! आणि या वर कळस म्हणून की काय? दुर्गेची अत्यंत अश्लिल शब्दात विटंबना करित आहेत! त्यासाठी यांनी थेट विद्यापीठं जी या भारतातली आद्य ज्ञानमंदिरं आहेत त्यांना आपल्या राजकारणाचे अड्डे बनवले आहेत!
कुणाला पटो अगर न पटो पण शिक्षण आणि राजकारण या दोन्ही गोष्टी एक होता कामा नये! शिक्षणाची मंदिरे असणारी विद्यापीठे ही राजकारणरुपी वेश्यावस्ती होता कामा नये! काही सत्तेची लालसा असणारी मंडळी सत्तेसाठी इतक्या खालच्या थराला जातील याची कधी कल्पना केली नव्हती!
"अफजल हम शरमिंदा है तेरे कातील जिंदा है।"
भारत तेरे टुकडे होंगे ईन्शा अल्ला ईन्शा अल्ला!
अफजल तेरे खुन से इन्कलाब आएगा ।
कितने अफजल मारोगे हर घर से अफजल निकलेगा ।" ही भारताची पैदास नक्कीच नाही! आता शोध हाच लागायचा बाकी आहे की अफजल गुरु ह्याच्या घरी गेला होता की ह्यांच्या आया अफजलच्या घरी!(कुपुत्रो जायेत् क्वचिदपि कुमाता न भवति । श्रीमद्आद्यशंकराचार्यांची माफी मागून) पण दुर्गा आणि भारतमाता ह्या आम्हाला मातेसमानच ! त्यांचा अपमान हा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही! आमची सहिष्णूता आम्हाला परस्त्रीचा सन्मानच करायला शिकवते! भारतात स्त्रीला दुर्गेचेच रुप मानतात तिची पूजा देखील करतात! पण मर्यादा सोडणारी शूर्पणखा! यज्ञादि विधीत अडथळा आणणारी त्राटिका तसेच पुतना यांना यमसदनी देखील पाठवले आहे! द्रौपदीच्या अब्रूवर टाकलेल्या हाताची किंमत १८ दिवसात ४० लाखांहून अधिक लोकांच्या आहूतींनी मोजावी लागलीय! हे प्रसंग विसरु नका! या भूमीत मर्यादा सांभाळणा-याची नेहमीच पूजा होते तर मर्यादा सोडणा-याचा सर्वनाश!
आता थोडं महिषासुराविषयी बोलू! जे एन् यु मधे म्हणे महिषासुराचं प्रमोशन सुरु केलंय! कदाचित तो त्याचा वंश असेल! असो! युक्तीवाद किती बिनबुडाचा करावा? महिषासुर म्हणे एक न्यायी राजा होता! तो रेड्यावर बसायचा याचा अर्थ तो गवळी(यादव) होता ! त्याला समकालिन उदाहरण दिलं ते ऐकून तर मती गुंग होऊन गेली़ म्हणे लालू प्रसाद यादवांना निवडणूक जिंकल्यावर म्हशीवर बसवून मिरवणूक काढतात! म्हणजे तो त्या काळात मागासवर्गीय होता असं यांना सुचवायचंय! आणि त्याचं राज्य बळकावण्यासाठी दुर्गेने त्याचा अन्यायाने वध केला!
आता थोडा महाभारताचा संदर्भ घेऊ़ . भगवान श्रीकृष्ण हे देखील यादव कुळातले! कंस हा देखील यादव कुळातलाच! तसेच शिशुपाल हा देखील यादव कुळातला! श्रुतीश्रवा ही कृष्णाची आत्या आणि तिचा हा मुलगा! यांचा वध स्वतः भगवंतांनीच केला. कुंती ही देखील कृष्णाची आत्या! म्हणजे पांडव हे भगवान श्रीकृष्णाचे आतेभाऊ! भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा चंद्रवंशातील तर श्रीरामांचा सूर्यवंशातील!
चंद्रवंश हा भारतातील सर्वांत मोठा राजवंश आहे. सर्वांत यशस्वी राजवंश म्हणूनही याच्याकडेच अंगुलीनिर्देश करावा लागतो. ज्याच्या नावावरून या देशाला भारत हे नाव पडले तो राजा भरत याच वंशातील आहे. महाभारतातील युद्धाला कारणीभूत असलेले कौरव-पांडव याच राजवंशातील आहेत. इतकेच नव्हे, तर भारती युद्धात सहभागी झालेले बहुतांश राजेही याच वंशातील आहेत. ययाति-देवयानी, दुष्यंत-शकुंतला, पुरूरवा-उर्वशी अशा महानायक-नायिकांच्या जोड्या या चंद्रवंशाने भारताला दिल्या. कंस, जरासंध, दुर्योधन, शिशूपाल ही मोठी खलनायक मंडळीही याच वंशाने दिली. परशुरामाशी वैर घेणारे हैहय कुळातील राजे हे चंद्रवंशीच आहेत. नहुष हा चंद्रवंशातील पहिला ऐहिक पुरूष म्हणायला हवा. इंद्राची पत्नी शचि हिची इच्छा धरल्यामुळे नहुषाच्या नशिबी बदनामी आली. तथापि, तो अत्यंत पराक्रमी होता. त्याला ६ मुले होती. राजा ययाति हा त्याचा क्रमांक दोनचा मुलगा. वि. स. खांडेकरांनी आपल्या "ययाति" या कादंबरीत याचेच चरित्र वर्णिले आहे.
भगवान श्रीकृष्ण ही चंद्रवंशातील सर्वांत महान व्यक्तिरेखा होय. श्रीकृष्णाला यादव, वाष्र्णेय, माधव अशा उपाध्या महाभारत आणि इतर ग्रंथांत लावलेल्या दिसून येतात. या सर्व उपाध्या श्रीकृष्णाच्या वांशिक परंपरा स्पष्ट करतात. यदूवंशातील हैहय कुळात पुढे वीतिहोत्र राजा झाला. वीतिहोत्र याचा पुत्र मधु. मधुने मोठा पराक्रम गाजविला. त्याच्या नावावरून या वंशाला पुढे माधव हे नाव पडले. म्हणून श्रीकृष्णाला माधव म्हटले जाते. राजा मधुला १०० मुले होती. त्याच्या थोरल्या मुलाचे नाव होते वृष्णि. वृष्णिच्या नावावरून या वंशाला वाष्र्णेय असे संबोधले जाते. भगवान श्रीकृष्ण हा वृष्णिचा १४ वा वंशज ठरतो.
एखाद्या राजाला जेव्हा अनेक कर्तत्ववान मुले असतात, तेव्हा तो वंश विभागला जातो. वंशावळ स्पष्ट व्हावी, यासाठी प्रत्येक मुलाच्या नावे वंशावळ दिली जाते. ज्या वंशात जास्त राजकीय घडामोडी घडतात, तो वंश जास्त चर्चेत राहतो. मान्यता पावतो. त्यादृष्टीने चंद्रवंशाच्या दोन मुख्य शाखा ठरतात. पहिली शाखा ययातिचा थोरला मुलगा यदू याच्यापासून तर दुसरी शाखा ययातिचा धाकटा मुलगा पुरू याच्यापासून सुरू होते. भारताचा संपूर्ण पुराणेतिहास या दोघांच्या वंशाचा इतिहास आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. यदू हा शुक्राचार्याची कन्या देवयानी हिचा पूत्र होता. पुरू हा असूर कन्या शरमिष्ठा हिचा पूत्र होता. पुरूच्या वंशात कौरव-पांडव जन्मले. यदूच्या वंशात भगवान श्रीकृष्ण जन्मले. चंद्रवंशात यदूची शाखा  सर्वांत मोठी आहे. यदूच्या वंशजांना यादव म्हटले जाते. यदूचे वंशज म्हणून यादव. यादववंश हा भारताच्या अनेक भागांत पसरलेला आहे. संपूर्ण उत्तर भारत, बंगाल, ओरिसा आणि महाराष्ट्र एवढ्या मोठ्या भूभागावर आजही यादव वंश आढळतो. महाराष्ट्रातील देवगिरीचे राजघराणे यादव वंशी होते. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई यादववंशीच होत. सिंदखेडच्या जाधव घराण्यात जिजाऊंचा जन्म झाला. जाधवराव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज समजले जातात. यादव राजे आपल्याला श्रीकृष्णाचे वंशज समजत. जिजाऊंचे पती शहाजीराजे मात्र सूर्यवंशातील आहेत. (यादव वंशाच्या अधिक माहिती साठी श्रीमद्भागवत ग्रंथाचे वाचन करावे)
आता यात कोण कोणाचे शत्रु आहेत? कोण कोणावर अन्याय करत आहेत? कोण मागासवर्गीय आहेत? कोण उच्चवर्णीय आहेत? आपलं काय चुकतं ?तर आपण लोकांच ऐकून विश्वास ठेवतो! आता भगवान श्रीकृष्ण हे यादव वंशातील असून अर्जुनाला त्यांनी दुर्गेची आराधना करायला सांगितली! आता राहता राहीला प्रश्न सत्ता स्थापून मूळवासियांना हाकलून लावायचा तर हे पाप भगवंतांनी कदापि केलेलं नाही ! रामावतारात रावणाचा वध केला "बिभीषणाला" (त्यांच्यातलाच चांगला राक्षस)राज्याभिषेक केला आणि लक्ष्मणाला सांगितले की-"लंका जरी सोन्याची असली तरी मला ती आवडत नाही कारण माता आणि मातृभूमी ही स्वर्गाहून देखील श्रेष्ठ असते! "(वाल्मिकी रामायण)तात्पर्य राज्य बळकावले नाही व न्यायाने राज्य करायला सांगून परत तिकडे कधीच फिरकले नाहीत! भगवान श्रीकृष्ण अवतारात देखील तेच! कंसाला मारलं राज्य घेतलं नाही,जरासंध,शिशुपाल इतकंच काय नरकासुराला देखील मारल्यावर त्याच्या मुलाला राज्यावर बसवलं! कुठे कुणाला हाकलंलय? नरसिंह अवतारात हिरण्यकश्यपूचा त्याच्याच इच्छेनुसार वध केला! भक्त प्रह्लादाला उत्कट भक्तीचं उदाहरण म्हणून जगन्मान्य केलं! याला सहिष्णूताच म्हणतात! उच्चनीच भाव जर भगवंतांच्या ठायी असता तर संत कान्होपात्रांना जवळ केलं नसतं!
एका हिंदी गीताच्या काही ओळी मुद्दाम नमूद कराव्या वाटतात-
"एहसास थोडा तो जगाएं अपने दिलों में हम
क्या नाम है अपना जहाँ में, खड़े हैं कहाँ पे हम
है हमें जाना कहाँ , चले हैं कहाँ पे हम
हमसे पूछे है यह मातरे वतन |"
ह्या भूमीला अविवेकाचा आणि विश्वासघाताचा शाप आहे की काय असं वाटल्यावाचून रहात नाही! ही वाटचाल विनाशाकडेच चालू आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी अशी अवस्था सर्वत्र दिसून येतेय! गेल्या ८ महिन्यापूर्वी हजारो वर्ष भारताला माहित देखील नसलेला शब्द इतका थैमान घालत असेल तर चूक आमच्या अविवेकी वागण्याची आहे. शेवटी कलीयुग आहे! जिथं चांगलं चाललंय तिथं वाईट करायचं वरदान कलीला आहे! तो लिंग आणि जिव्हा याचा ताबा घेतो! आणि एकदा तावडीत सापडला की मग त्याचा कोण होतो हे वेगळं सांगायला नको!
।।भारतमाता की जय ।।