Sunday, 28 February 2016

हिंदू धर्म आणि सहिष्णूता

हिंदू धर्म आणि सहिष्णूता
सध्या हिंदू धर्मावर टीका करा,त्यांच्या परंपरांविरुद्ध वातावरण तयार करा आणि प्रसिद्धी मिळवा असं समीकरणच जणू राजकारण्यांनी आणि राजकारण्यांनी पुरस्कृत वृत्तवाहिन्यांनी केलेलं दिसतंय! वास्तविक पाहता यांची कोणाचीही या गोष्टीवर बोलायची लायकी नाही ज्ञानाचा व यांचा दूरदूरपर्यंत काही संबंध असलेला दिसत नाही. "सहिष्णूता" या शब्दाचं हव्या त्या प्रसंगी हव्या त्या अर्थाने मार्केटिंग करुन गुजराण करणा-या तमाम राजकारण्यांना,सिनेकलावंताना आणि बिनबुडाच्या बातम्या दाखवणा-या वृत्तवाहिन्यांना कदाचित याचा अर्थ समजलेला नाही किंवा समजून घ्यायचा आणि समजून सांगायचा नाहीये!
"सहिष्णूता" म्हणजे हिंदू धर्मातील षंढत्वाला खतपाणी घालणारी सहनशीलता असा जर कुणी घेत असेल तर कृपया तशी चेष्टा करु नये. ही गोष्ट देखील नाकारता येत नाही की आमच्यातलेच काही कपाळकरंटे लोक फितूर होऊन या मूठभर हिंदू द्वेष्टया लोकांच्या कारवायांना खतपाणी घालत आहेत! सहिष्णूता या शब्दाचा अर्थ सर्वसमावेशकता! सर्वांना (इथे ज्ञानेश्वरांच्या भााषेत सांगायचं तर जीवमात्र! पृथ्वीवर अस्तित्वात प्रत्येक जीव! केवळ ठरावीक व्यक्ती समूह नव्हे) सामावून घेऊन मार्गक्रमण करणे होय! हिंदू धर्मातील तत्वे ही मूळातच पराकोटीची सहिष्णू आहेत!
त्यामुळे त्यांचे रक्षण करणे हे प्रत्येक हिंदूचे आद्यकर्तव्य! सहिष्णूतेने जगता यावे या करिता केलेली हिंसा देखील आम्ही "अहिंसाच" मानतो.संत तुकोबारायांनी म्हणूनच सांगीतलंय-"भले तो देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी" त्यामुळे या धर्मावर आक्रमण करणा-यांना त्यांची जागा दाखवणे हे धर्मरक्षण मानले जाते हिंसा नव्हे! अहिंसा हा आम्ही सर्वश्रेष्ठ धर्म मानलेला आहे आणि त्याचे पालन करणा-यांच्या रक्षणार्थ हिंसा ही सुद्धा अहिंसाच म्हणवली जाते!
आता थोडा राजसत्तेचा विचार करुया ! राजसत्ता ही नेहमीच धर्मसत्तेपुढे शरणागत होत आली आहे! रावण हा तत्कालीन प्रचंड सामर्थ्यवान सत्ताधीश होता पण प्रभू श्रीरामांकडून त्याची सत्ता संपुष्टात आली! कौरव पांडवांचे तेच! एकाहून एक रथी महारथी असून,राजसत्ता व प्रचंड सैन्य असून विजयश्री पांडवांच्या नव्हे तर धर्माच्या पक्षात आली! सत्ता संपत्ती व शस्त्र ह्या क्षणात नष्ट होणा-या गोष्टी आहेत! सत्ताधीश हे जास्तीत जास्त दर ५ वर्षांनी बदलत राहतात,भगवंत मात्र अनादी कालापासून तसाच आहे! रावण आणि कौरव हे अस्थिर राजसत्तेचे तर श्रीराम आणि श्रीकृष्ण हे धर्मसत्तेचे प्रतिक आहेत! मानवी कायद्याच्या कचाट्यातून सुटलेल्या अपराध्यांचा मृत्यू हा कधीच सुखद झालेला नाही आणि होणारही नाही हे जरा बारकाईने अभ्यासल्यास दिसून येईल! इथे घडलेल्या अपराधांची नोंद भगवंत स्वतः ठेवून योग्य वेळी शासन हे होतच असते!
प्रश्न राहतो तो आमच्यातल्याच काही कपाळकरंट्या लोकांचा ! ते कधी नव्हते? फार पूर्वापार हा समृद्ध संस्कृतीला लागलेला कलंक आहे! या देशाचा इतिहास नीट अभ्यासला तर ही फंदफितूरीची परंपरा पूर्वापार अव्याहतपणे आजतागायत सुरु असल्याचे दिसून येते! याचाच अर्थ या लोकांना ठरावीक जात नाही,धर्म नाही वा संस्कार नाहीत! या बाबतीत आपल्याला अपवादाने सर्वधर्मसमभाव अनुभवायला मिळतो! पाश्चात्य भोगवादाची चटक लागलेल्या आमच्याच लोकांना धर्माच्या मर्यादा नकोश्या वाटू लागल्या आहेत! त्यामुळेच आज धूम्रपान आणि मद्यपान ह्या गोष्टींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त झालेली दिसते! श्रीमद्भागवतात "यादवांचा" नाश मद्यपानाने केला हे सर्वज्ञात असून ही आमचा समाज याकडे मोठ्याप्रमाणात आकर्षिलेला दिसतो,तीच व्यथा मांसाहाराची ! समाजाची सात्विकता जपण्याची जबाबदारी घेऊन जन्माला आलेल्यांनीच या गोष्टींचे सेवन सुरु केल्याने तोच आदर्श त्यांचे अनुकरण करणा-यांनी घेतलाय! या शिवाय अाणखी एक कळीचा मुद्दा म्हणजे स्त्री-पुरुष समानता ! इतर पंथांच्या तुलनेत हजारो पटींनी आदर व समानतेचे स्थान हिंदू धर्माने स्त्रीयांना दिले आहे! त्यांचे श्रेष्ठत्व स्वीकारलेले आहे ! अन्यथा पुरुष प्रधान संस्कृती म्हणवणा-या जगविख्यात संस्कृतीत ज्ञानग्रहणाची सुरुवात "मातृदेवो भव ।" या उपदेशाने झाली नसती! भारतीय संस्कृतीने दिलेला मान जपणं हे प्रत्येकाचंच कर्तव्य आहे! परकीय आक्रमणांमुळे खंडित झालेली स्त्री शिक्षणाची परंपरा पुन्हा सुरु करण्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी जो त्रास सहन केला त्याचं एका काळात चिज झाल्यासारखं वाटलं खरं , पण आता स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नव्हे ! मोठ्या शहरांमधील महाविद्यालये आणि शाळांमधील उपहारगृहांमधे सर्रास धूम्रपान करणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी पाहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांना यातना होत नसतील कश्यावरुन? इतकंच काय तर स्वतः समर्थ रामदास आणि संत ज्ञानेश्वर देखील आश्चर्यचकित होतील असं आपलं स्वैराचारी आचरण आहे! मग इतरांना दोष का द्यावा?
शेवटी आपल्या सर्वांचा (यात सर्व जाती धर्म आणि पंथ आले) कृतघ्नपणा निसर्गाशी सुरु आहे! त्याने तो किती दिवस सहन करावा? धर्म आणि मानव या ही पेक्षा जो अाद्य कायदा आहे तो निसर्गाचा! त्याचे कायदे आपण सर्वप्रकारे मोडले आहेत! त्याच्या शिक्षा भविष्यात समोर दिसतायंत त्याकडे पाहिजे तितकं लक्ष आजिबात नाही! आपण निसर्गाची ना नैतिकता सांभाळली ना भौतिक सुबत्ता ! भारतासारख्या सुसंस्कृत(?) देशात मध्यंतरी समलिंगी विवाहाच्या कायद्यास मान्यता मिळावी आणि चारचौघात इतरांच्या भावना चाळवणारी "किस ऑफ लव" सारख्या गोष्टींना स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्वमान्यता मिळावी म्हणून आंदोलने आणि जनजागृती अभियाने चालवली गेली ही कोणत्या कोटीची वैचारिक दिवाळखोरी म्हणावी? निसर्गाचा कल हा समतोल राखण्याकडेच आहे ! यावर विश्वास ठेवावा! यातच जीवमात्रांचे भले आहे! अन्यथा सर्वनाश अटळ आहे!
अध्यात्म हा राजकारण वा मिडीयाचा विषय नाही यात त्यांनी पडू नये यातच त्यांचे भले आहे ! यात त्यांनी लक्ष घालणे म्हणजे "विनाशकाले विपरित बुद्धि ।" होय!

No comments:

Post a Comment