Sunday, 28 February 2016

श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व

||श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||

सध्याचे युग हे “माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे” युग म्हणून ओळखले जाते. दररोज त्याकरिता अद्ययावत साधने विकसित होत आहेत. ही मनुष्याच्या बौद्धिक विकासाची उच्चावस्था म्हणावयास हरकत नाही? पण ही माहिती ज्ञानाविना अर्धवट आहे? हे कदाचित काळाच्या विरोधात विधान असू शकेल किंवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या विरोधातही असेल कदाचित पण “भौतिक विकास आणि सुखसोयी मिळवण्याच्या प्रयत्नात मनुष्याने भौतिक प्रगती तर केली पण तो स्वतःचे मनःस्वास्थ्य मात्र गमावून बसला. याला कारण एकच “ज्ञानाचा अभाव”
“फेसबुक,WhatsApp,हाईक,आणि अजून कित्येक संवाद साधणारी साधने ही जर प्रगतीची चिह्ने असतील तर “श्रीकृष्णार्जुन संवाद “ अर्थातच “श्रीमद्भगवद्गीता” हा या भारतातील नव्हे तर पूर्ण पृथ्वीतलावरील सर्वोच्च संवाद मानवा लागेल.” ज्ञान आणि माहिती यातील नेमका फरक न कळलेली आमची अखिल भारतीय जनता ही ज्ञानाची अखंड परंपरा सोडून माहितीच्या मागे लागली आहे. भारत हा केवळ भूभाग नसून तो या समस्त जगताचा देव्हारा आहे. ती ज्ञानाची अखंड कामधेनु आहे,ही देवभूमी,आर्यभूमी आहे. “भा” म्हणजे तेज आणि “रत” म्हणजे रमतेला! अर्थात “जो तेजोपासनेत रमलेला आहे तो भारत”
पण आजची परिस्थिती या उलट आहे. “तेज” म्हणजे काय? हेच मुळात माहित नाही. कारण भासमान आणि अस्तित्व हीन अंधाराच्या सान्निध्यात निरर्थक विषयांवर निष्फळ चर्चा केल्यावर ब्राह्ममुहूर्ताचा तेजोवलय कसा काय दृष्टीस पडणार? सूर्योदयापूर्वी स्नान ही आता कालबाह्य गोष्ट होतेय? मग उपासनेचा विषय येतच नाही. फेसबुक आणि WhatsApp सारख्या माध्यमांवर आलेले देवी देवतांचे संदेश वा चित्रे एकमेकांना न वाचताच पाठवून हायटेक उपासना करणारी पिढी मनोरुग्ण होणार नाही कशावरून?
सध्या हक्क आणि कर्तव्य यावरून अत्यंत विषारी “राजकारण” जोर धरतंय. त्यात “संविधानाला” ओढलं जातंय. पण हजारो वर्षांपूर्वी केवळ “कर्मयोगाच्या” निष्ठेवर आधारलेले जे संविधान सांगितले गेले त्याकडे आज पूर्ण दुर्लक्ष झालेलं दिसतंय. हा विषय “अवघड” म्हणून शिक्का मारून तो केवळ म्हातारपणी विरंगुळा म्हणून वाचायचा ग्रंथ अशी अवहेलना केली म्हणजे आपण “आधुनिक” झालो असा काहींनी समज करून घेतलेला दिसतो. एक साधं सूत्र आहे “ज्याने त्याने त्याचे कर्तव्य म्हणजेच त्याला नेमून दिलेले काम चोख बजावले तर कोणाच्याही हक्कांवर गदा येण्याचा प्रसंगच उद्भवत नाही. आपण आपले हक्क मागताना कर्तव्य किती पार पाडली हे पहायचे सोयीस्कर टाळतो. आणि इतरांनी आपले हक्क हिरावून घेतले की अकांड तांडव करतो.
या जगात कितीही वेगवान मार्ग विकसित झाले तरी मनुष्याला भोगाच्या अथवा त्यागाच्या मार्गाची निवड करावीच लागते. ज्ञानाचा मार्ग हा त्यागाकडे तर “निराधार” माहितीचा आणि शारीरिक संवेदनांना संतुष्ट करण्याचा मार्ग हा भोगाकडे घेऊन जातो. सध्या “कलीचा” प्रभाव प्रचंड वाढल्याने मनुष्यातील “मनुष्यत्व” लुप्त होत चालले आहे. पैसा,प्रसिद्धी आणि वासना या त्रिसूत्रीवर समाज चालताना दिसून येतो. यामुळेच “पैसा” भ्रष्टाचार, जनप्रक्षोभक विधाने ही “प्रसिद्धी” तर बलात्कार आणि अंगप्रदर्शन ही “वासनेला प्रोत्साहन देताना दिसतात. यात “मिडिया” किंवा “संपर्क माध्यमांचा” काय दोष? ती बिचारी निर्जीव आहेत विवेकहीन आहेत,पराधीन आहेत पण त्यांना संचालित करणारा मनुष्य तर “विवेकी” आहे? आजन्म “ब्रह्मचारी” राहून “हिंदू धर्माची” ध्वजा जगभर दिमाखात मिरवणाऱ्या आणि “वसुधैव कुटुंबकम” ही उक्ती सार्थ करणारे “स्वामी विवेकानंद” याच मातीतले हे सांगितले तर कदाचित कुणाला तरी खरं वाटेल?
“गीता” ही स्वधर्माचा उपदेश करते.ती मोहपाशातून सोडवते,मनुष्याला सक्रीय बनवते,विवेकी बनवते. गीता हा भारतीयांचा आत्मा आहे. त्यात कोणताच वाद नाही? त्यात कुठलेच मत मांडलेले नाही आणि कुणाच्या मतांचे खंडनही केलेले नाही. तो एक संवाद आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी न कधी तो एकदा का होईना अर्जुन होतोच. कर्तव्य आणि भावना यांच्या जाळ्यात तो सापडतोच. मग पुढे काय? हा प्रश्न त्याला पडल्याशिवाय राहत नाही. जीवनातील “योग्य” सद्गुरूंची भेट आयुष्यातील “विसंवादाकडून” सुसंवादाकडे आणते. तोच त्याचा निर्णायक क्षण असतो.
दुर्बलांचे आणि अज्ञानी लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांचे रक्त पिणारी गोचीडे ही सरकारी कार्यालयापासून “अध्यात्मिक” ठिकाणांपर्यंत असंख्य दिसतील. तरीही आपण या परिस्थितीत आजीबात डगमगता कामा नये. आपली आपल्या कार्यावरील निष्ठा ढळता कामा नये. या सृष्टीचा एक नियम आहे “जो जे पेरतो तेच उगवते” म्हणजे बाभळीचे बी पेरले तर भविष्यात बाभळीची झाडे तर आंब्याच्या कोयी पेरल्या तर आंबे उगवणारच! मनुष्य अनैसर्गिक वागला तरी निसर्ग त्याचा धर्म सोडीत नाही. कितीही कार्बन डायऑकसाइड वाढला तरी झाडे ही ओक्सिजनच मुक्त करतात. या भूतलावर केवळ मनुष्यच आपले कर्तव्य विसरलेला दिसतो. अन्यथा ग्लोबल वॉर्मिंग ची कृत्रिम समस्या मनुष्य कर्तव्यापासून दूर पळाल्याचा पुरावा घेऊन त्याच्या समोर उभी ठाकली नसती. आपली मानसिकता इतक्या नीच थराला गेलीय की आपल्याच हव्यासामुळे निर्माण झालेला दुष्काळ दूर करण्याचे प्रयत्न सोडून त्याचे राजकारण करून गेलेली सत्ता मिळवण्याकडे आपला कल आहे.
आजची “गीता जयंती” ही खरोखरच अंतर्मुख करायला लावणारी आहे. सभोवतालची परिस्थिती ही कुणा राजकीय पक्षामुळे वा अतिरेकी संघटनेमुळे निर्माण झालेली नसून ती आपणच केलेल्या कर्तव्यातील कसुरीने निर्माण झालेली आहे. त्याला कोणताही व्यक्ती समूह अथवा कोणताही एकटा धर्म जबाबदार नाही. तर सर्वच धर्मातील लोकांनी “मनुष्यधर्म” सोडल्याने निर्माण झालेली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. “मनुष्यधर्म” अंगीकारायला हा सुयोग्य मुहूर्त आहे आणि गीता उत्तम मनुष्यधर्माचे मार्गदर्शन करते. आजच्या “गीता जयंतीच्या” प्रसंगी “गीताव्रती” होण्याचा संकल्प करूया. आता हा संकल्प कोणाच्या तरी “मन की बात” होण्याची वाट पाहू नका.
"श्री गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा"
||श्रीगुरुदेवदत्त||
-“श्रीरामकृष्ण”चरणरज
९७६३७७६३३९

No comments:

Post a Comment