Sunday, 28 February 2016

प्रेमप्रदर्शन सप्ताहाच्या निमित्ताने!❤❤❤

रहिमन धागा प्रेम का, मत तोड़ो चटकाय।
टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गाँठ परि जाय॥
प्रेम या अडीच अक्षरांच्या शब्दाने पूर्ण विश्व व्यापलंय! या जगातील
ईश्वरी शक्तीसुद्धा याच स्वरुपात भरुन राहीलेली दिसते."भक्ती" ही
प्रेमाची परमोच्च अवस्था! हे प्रेम कसं असतं? संत ज्ञानेश्वरांच्या
शब्दात सांगायचं झालं तर "शब्देवीण संवादू दुजेवीण अनुवादु"
प्रेमामध्ये आणि भक्तीमध्ये अद्वैतावस्था उत्पन्न होते.तिथे कोणत्याही
बाह्य साधनांची आवश्कताच नसते नव्हे तर एकमेकांची अंतःकरणे
सोडून इतर गोष्टी इथे अर्थशून्य ठरतात.
प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द
सुद्धा तोकडे पडतात,ज्ञानेश्वर सांगतात -प्रेम व्यक्त करण्याची गरजच
नाही,प्रेमाचं पावित्र्य त्या दर्जाचं असेल तर आपण शब्द उच्चारायच्याही
आधी आपल्या अंतःकरणातील भावनांचा निनाद प्रिय व्यक्तीच्या
अंतःकरणात उमटलेला असतो! शब्दात व्यक्त करायची गरजच
उरत नाही.शब्दांची मर्यादा आणि अर्थशून्यता ही स्पष्ट दिसून येते!
व शब्दाद्वारे संवादाची कोणतीच गरज इथे उरत नाही!
संत ज्ञानेश्वरांनी प्रेमाची एक विश्वव्यापक व्याख्या सर्वपरीचित करुन
दिली.संत मीराबाईंनी तर या जगाचीही गरज नसल्याचं दाखवून
दिलं! फक्त भगवंत आणि आपण आहोत ही पूर्वावस्था तर भगवंत
आणि मी एकच आहोत ही परमोच्च अवस्था या भारतभूमीतच अनुभवाला
येते!
हे सर्व सांगायचा उद्देश एकच की "प्रेम" व्यक्त करायला कोणत्याही
साधनाची आवश्यकता नसते! ते व्यक्त करायचा कोणताही खास दिवस
नसतो. कारण स्वतःच्या आईबद्दल प्रेमाची भावना नेमक्या कोणत्या
दिवशी आपल्या मनात जागृत झाली हे जगातील कोणतीही व्यक्ती सांगू
शकणार नाही.आता राहता राहीला प्रश्न हे दिवस साजरे करणा-यांचा!
तर ज्यांना खरं प्रेम कळलंच नाही त्यांचे हे भरकटलेले चाळे करण्याचे
हे दिवस! सध्याचा काळ हा भोगवाद आणि किळसवाणी इंद्रियाधीनता
प्रेमाच्या नावाने खपवण्याचा काळ आहे. चित्रपट आणि मालिका तसेच
काही चिंधी प्रकाशनाची पुस्तके हा असला देशद्रोही व्यापार करतात!
स्वतःची संस्कृती विकून कसलं आलंय प्रेम? मोबाईल कंपन्या आणि
गिफ्टचे विक्रिते हे खरे दलाल! यांना स्वतःची पोटे भरता यावीत
म्हणून चालावलेले हे बिनभांडवली धंदे!
काही बोटावर मोजण्याइतके चित्रपट आणि त्यांचे निर्माते यांची
जाहीर माफी मागून इथे सांगावं वाटतं की -"दादासाहेब फाळकेंनी"
आजच्या या वासनाकांडाला जन्मदेणा-या चित्रपटसृष्टीसाठी
आयुष्य वेचलं नव्हतं! माझ्या देशाची संस्कृती ही सर्वदूर ज्ञात व्हावी
या उद्देशाने जन्माला घातलेली ही प्रतिसृष्टी आज खरंच भारतीय
संस्कृतीचं प्रदर्शन करतेय? आम्ही आमच्या भावी पिढीला प्रेम हे
देशावरसुद्धा करता येतं हे सांगायला विसरलो तर नाही ना?
डॉ.अब्दूल कलाम हे आजचं भारतमातेवर निःस्पृह प्रेम करणारं
उदाहरण म्हणून का दाखवू शकत नाही? "जिऊंगा तो तेरे लिए
और मरुंगा तो भी तेरेच लिए" हा सर्वज्ञात लफडेबाजांचा घिसापीटा
डायलॉग हा " तुजसाठी मरण ते जनन तुजवीण जनन ते मरण!" या
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मातृभूमीच्या विरहात रडणा-या हृदयातून
तर चोरला नसेल ना?
भगतसिंग,सुखदेव,राजगुरु असे कित्येक तरुण होते ज्यांना आपल्या
वयात देशप्रेम जास्ती महत्वाचं वाटलं! ते काही अवतारी नव्हते,त्यांनाही
त्याच भावना होत्या ज्या आज आपल्या उफाळून येतायंत! पण कोणत्या
गोष्टीला किती महत्व कधी द्यायचं हे त्यांना कळलं! संस्कृतीला धक्का
लावणा-या स्वतःच्याच अधिका-यावर गोळी झाडून हसत फासावर
चढणारा मंगल पांडे आम्हाला माहित नाही का? याचं उत्तर खेदानं नाही
असं सांगावं लागतं! मुलांच्या बरोबरीनेच मद्यपान आणि धूम्रपान करणा-या
मुलींना पाहून ह्यांच्या पोटी कोणी राष्ट्रभक्त जन्माला येईल अशी अपेक्षा
करणं म्हणजे स्वतःच्या मूर्खपणाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासारखं
आहे! एन्जॉयमेंट म्हणजे रेव्हपार्टी! एन्जॉयमेंट म्हणजे थर्टीफस्ट! या ना
त्या कारणाने नैतिकतेच्या भिंती तोडून केवळ इंद्रियसुख मिळवणे म्हणजे
प्रेम! हीच व्याख्या सर्वमान्य होताना दिसत आहे.
पारंपारिक वेशभूषा हा ही आता एक दिवस म्हणून साजरा केला जातो!
या इतकी शोकांतिका ती कोणती? आणि अशा गोष्टींना विरोध करणं म्हणजे
बुरसटलेली विचारसरणी! मागासलेपणा असली लेबलं लावायला सुद्धा कुणी
मागेपुढे पाहत नाही! काहीही झालं कुणी कितीही निंदा नालस्ती करो,मागासलेला
वा बुरसटलेल्या विचारांचा म्हणो जे सत्य आहे ते त्रिकालाबाधित आहे!
विस्तवावर पाय पडला तर मला माहित नव्हतं तो पोळतो ते! असं म्हणून
विस्तव पोळायचा रहात नाही! तो संपर्कात आलेला भाग भाजूनच काढतो!
असो ज्ञानेश्वरांच्या प्रेमाची व्याख्या कळायला ही लायकी लागते,मीरेचं
प्रेम कळायला पावित्र्य लागतं! या अस्मानी ऐरावती ऐश्वर्याची शान
जंगली रानडूकरांना का़य कळणारं?
इत्येव अलम् । -अमेय दीपक कानडे 9763776339

No comments:

Post a Comment