Monday, 29 February 2016

|| श्री रामदास नवमी ||

||श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||
देव मस्तकी धरावा | अवघा हलकल्लोळ करावा ||
मुलुख बुडवावा की बडवावा | स्वराज्याकारणे ||
“स्वराज्य” आणि “स्वैरराज्य” यांच्या सीमारेषेवर उभे राहून आज जर “श्री दास नवमीकडे” पाहिलं तर पहिलं लक्ष वेधावं वाटतं ते “देव मस्तकी धरावा” याकडे! याचं कारणं ही तसंच आहे. समाजाची चाल पाहिली तर ती देव मस्तकी नव्हे तर पायदळी तुडवण्याची आहे असं खेदानं म्हणावं लागतं. मुळात देव ही संकल्पना आधी स्पष्ट करून घेऊ. मला समर्थ रामदासांइतकी प्रतिभा नाही परंतु देव आणि देश आणि या एकाच नाण्याच्या दोन बाजू. धर्म ही त्याची कडा जी देशाला आणि देवाला एकसंध ठेवते. देश टिकला तर देव आणि धर्म ! आणि धर्म असेल तर देश! समर्थांचं देखील हेच समीकरण असावं असं वाटतं.
धर्म हा मनुष्याच्या स्वैराचाराला मर्यादा घालतो,स्वैराचाराला मर्यादा आल्याने मनुष्य “विवेकी” बनतो, विवेकी मनुष्य कर्तव्य बुद्धीने कार्य करतो आणि कर्तव्य बुद्धीने केलेले प्रत्येक विधायक कार्य हे देशाच्या आणि समाजाच्या कल्याणासाठीच असते,म्हणून समाजात धर्माचे अधिष्ठान अत्यंत महत्वाचे आहे. म्हणूनच समर्थ सांगतात-
सामर्थ्य आहे चळवळीचे | जो जो करील तयाचे ||
परंतु तेथे भगवंताचे | अधिष्ठान पाहिजे ||
भारताचे माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांनी एके ठिकाणी वर्णन केले आहे-“भारत सिर्फ जमीन का टूकडा नाही है,यह जीता जागता राष्ट्रपुरुष है| इसकी नदियाहमारे लिये गंगा हैं और यहां का कंकड कंकड शंकर है | ये वंदन की भूमी है,ये अभिनंदन की भूमी है| मरने के बाद भी इन नदियो मे बेहती हमारी अस्थियोको कोई कान लगाकर सुन सके तो एकही आवाज आये गी “भारत माता की जय” समार्थांचीच रेष पुढे ओढलेली इथे दिसते. या ही पुढे जाऊन या देशासाठी आणि धर्मासाठी आपले जीवन समर्पित करणारा प्रत्येक क्रांतिकारी,प्रत्येक देशभक्त,समाजाचे सत्व भक्तीने जागृत ठेवणारा प्रत्येक संत आमच्या करिता देवच आहे. आमच्या समाजात त्यांचे अधिष्ठान अर्थात त्यांचे विचार हे डोक्यावर घेतले पाहिजेत.
पण आमचे दुर्दैव हेच की आज आमच्या “सु(?)शिक्षित समाजाने पाश्चात्य विचार आणि संस्कृती डोक्यावर धारण केली आहेत, सिनेकलावंत  हेच आमचे आदर्श! देव,देश आणि धर्माचे विचार प्रसारित करणारे यांच्या दृष्टीने मागासलेले आणि बुरसटलेल्या विचारांचे ! पण हा विवेक नव्हे! ही स्वैराचाराला खतपाणी घालणारी काटेरी निवडुंगाची झाडं या मातीतली नाहीत. या मातीत जन्मावं या मातीसाठीच जगावं आणि या मातीसाठीच जगता जगता याच मातीत मिसळून जावं पुन्हा एकदा याचं मातीसाठी जन्म घेण्यासाठी! आज समाजात अधिष्ठान राजकारण्यांचे! संस्कार हे व्याभिचारी जनांचे! आणि अनुकरण हे समाजविघातक देश व धर्म विरोधकांचे ! भगवंताचे अधिष्ठान जे मनामनात होते ते आता खरचं कुठेय?
राष्ट्र हे कुणा एका व्यक्तीमुळे किवा ठराविक व्यक्तीसमूहामुळे चालत नाही,हा जगन्नाथाचा रथ आहे. सर्वांनी मिळून ओढला तरच तो ओढला जाईल. देशद्रोही तितुके कुत्ते | मारोनी घालावे परते | आपण देशद्रोही वक्तव्य/कृती करणाऱ्यांना आणि त्यांच्या या कृतीचे समर्थन करणाऱ्यांना त्यांची जागा ही वेळीच दाखवून दिली पाहिजे. देव हा आमचा आत्मा तर देश हे आमचे शरीर आहे. आमच्या आत्म्याला दिलेले क्लेश हे शरीर सोसतं तर शरीरावर होणारा आघात हा आत्म्यावर होणारा आघात आहे. द्वेष हा अनादी कालपासून सुरूच आहे. पण आजची परिस्थिती ही सहनशीलतेची परिसीमा पाहणारी आहे. आमच्या देव देवतांची भर दिवसा विटंबना होते,आमच्या परंपरावर हल्ले होतात,मंदिराचे पावित्र्य नष्ट करण्याचे सुडाचे राजकारण होते,सरेआम देशविरोधी घोषणाबाजी होते आणि तरीही आमचे रक्त पेटून उठत नाही?
धर्माकरता मरावे | मरोनी अवघ्यासी मारावे |
मारता मारता घ्यावे | राज्य आपुले || सर्व प्रथम विस्कळीत झालेला आपला समाज हा एकत्रित बांधला पाहिजे आणि त्या करिता भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या करिता समर्थ रामदास श्रीरामांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवतात. श्रीराम हे मर्यादापुरुषोत्तम होते,ते कुशल राज्यकर्ते होते,दैवी गुणसंपन्न अलौकिक पुत्र होते, आदर्श शिष्योत्तम होते! आदर्श पती,मित्र आणि सर्वार्थाने अनुकरणीय होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज ! ह्यांच्या व्यक्तिमत्वातील एकजरी गुण आम्ही उचलला तर आमच्या जीवनाचे सोने होऊन जाईल. पण आमची कर्मदरिद्री प्रजा मात्र
घरी कामधेनु पुढे ताक मागे | हरीबोध सांडूनी विवाद लागे | अशी वाया जाताना दिसते. अर्थात घरी आदर्श व्यक्तींची पंगत रुपी कामधेनु(इच्छिलेले देणारी स्वर्गीय गाय) असताना आम्हाला बुद्धी मात्र तिच्याकडे ताक(निरर्थक गोष्टी) मागण्याची होतेय,हरी म्हणजेच परमेश्वराचे स्वरूप समजावून घेण्याऐवजी त्याच्या स्वरूपाविषयी वाद घालण्यातच आम्हाला रस आहे. जो काळ देव देश आणि धर्म यासाठी हलकल्लोळ माजवण्याचा आहे त्याकाळात आम्ही दूरदर्शनवरच्या निरर्थक मालिका पाहतो? बीभत्स वासनेची उत्पादने प्रेमाच्या नावाने विकली जात असताना आपण ते निमूट सहन करतो? आज पेरली जाणारी ही वासनेची आणि देव/देश/धर्म द्रोहाची बीजे भविष्यात छत्रपती शिवाजी महाराज,संत ज्ञानेश्वर,धर्मवीर संभाजी,भगतसिंग,सुखदेव,राजगुरू,सावरकर,आंबेडकर,बोस अशी नररत्नांची खाण जन्माला घालू शकेल काय?
समर्थांचं लिखाण पाहिलं तर त्यांनी प्रपंच आणि परमार्थ यातील एकही विषय सोडलेला नाही. “शास्त्राच्या रक्षणासाठी शस्त्र हाती धरावेच लागते हा संदेश दिला. ज्ञानोपासना सुखकर होण्यासाठी बलोपासना अत्यावश्यक आहे. यज्ञात बळी हा नेहमी बोकडाचा दिला जातो वाघ-सिंहाचा नव्हे.”दैवो दुर्बलघातक: |” दैव हे नेहमी दुबळ्याचाच घात करते. म्हणून सर्वांनी सामर्थ्यवान असावे या करिता गावोगावी फिरून मारुती मंदिरे आणि व्यायामशाळा स्थापन केल्या.
याचा सारांश काढायचा ठरला तर सामर्थ्यवान प्रजा,देव-देश-धर्माभिमानी नागरिक आणि भगवंताचे अधिष्ठान असेल तसेच  राजकारणी नव्हे तर देव मस्तकी धरला असेल तर मग प्रत्येकाची स्थिती
समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे |
जयाची लीळा वर्णिती लोक तीन्ही
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी || अशी झाल्याशिवाय राहणार नाही.
माघ कृ ९ ला “श्री रामदास नवमी” आहे समर्थांचा प्रत्येक शब्द हा प्रेरित करणारा आहे. या निमित्ताने जर त्यांच्या कोणत्याही ग्रंथ संपदेच्या अध्ययनास प्रारंभ हा आपल्या सर्वागीण उन्नतीचा “श्रीगणेशा” ठरू शकतो. आणि भारतमातेचे गतवैभव पुनश्च तिला प्राप्त करून देऊन विश्वाचा ज्ञानसूर्य म्हणून भारताला जनमान्यता मिळवून देऊ शकतो.

||जय जय रघुवीर समर्थ ||

Sunday, 28 February 2016

हिंदू धर्म आणि सहिष्णूता

हिंदू धर्म आणि सहिष्णूता
सध्या हिंदू धर्मावर टीका करा,त्यांच्या परंपरांविरुद्ध वातावरण तयार करा आणि प्रसिद्धी मिळवा असं समीकरणच जणू राजकारण्यांनी आणि राजकारण्यांनी पुरस्कृत वृत्तवाहिन्यांनी केलेलं दिसतंय! वास्तविक पाहता यांची कोणाचीही या गोष्टीवर बोलायची लायकी नाही ज्ञानाचा व यांचा दूरदूरपर्यंत काही संबंध असलेला दिसत नाही. "सहिष्णूता" या शब्दाचं हव्या त्या प्रसंगी हव्या त्या अर्थाने मार्केटिंग करुन गुजराण करणा-या तमाम राजकारण्यांना,सिनेकलावंताना आणि बिनबुडाच्या बातम्या दाखवणा-या वृत्तवाहिन्यांना कदाचित याचा अर्थ समजलेला नाही किंवा समजून घ्यायचा आणि समजून सांगायचा नाहीये!
"सहिष्णूता" म्हणजे हिंदू धर्मातील षंढत्वाला खतपाणी घालणारी सहनशीलता असा जर कुणी घेत असेल तर कृपया तशी चेष्टा करु नये. ही गोष्ट देखील नाकारता येत नाही की आमच्यातलेच काही कपाळकरंटे लोक फितूर होऊन या मूठभर हिंदू द्वेष्टया लोकांच्या कारवायांना खतपाणी घालत आहेत! सहिष्णूता या शब्दाचा अर्थ सर्वसमावेशकता! सर्वांना (इथे ज्ञानेश्वरांच्या भााषेत सांगायचं तर जीवमात्र! पृथ्वीवर अस्तित्वात प्रत्येक जीव! केवळ ठरावीक व्यक्ती समूह नव्हे) सामावून घेऊन मार्गक्रमण करणे होय! हिंदू धर्मातील तत्वे ही मूळातच पराकोटीची सहिष्णू आहेत!
त्यामुळे त्यांचे रक्षण करणे हे प्रत्येक हिंदूचे आद्यकर्तव्य! सहिष्णूतेने जगता यावे या करिता केलेली हिंसा देखील आम्ही "अहिंसाच" मानतो.संत तुकोबारायांनी म्हणूनच सांगीतलंय-"भले तो देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी" त्यामुळे या धर्मावर आक्रमण करणा-यांना त्यांची जागा दाखवणे हे धर्मरक्षण मानले जाते हिंसा नव्हे! अहिंसा हा आम्ही सर्वश्रेष्ठ धर्म मानलेला आहे आणि त्याचे पालन करणा-यांच्या रक्षणार्थ हिंसा ही सुद्धा अहिंसाच म्हणवली जाते!
आता थोडा राजसत्तेचा विचार करुया ! राजसत्ता ही नेहमीच धर्मसत्तेपुढे शरणागत होत आली आहे! रावण हा तत्कालीन प्रचंड सामर्थ्यवान सत्ताधीश होता पण प्रभू श्रीरामांकडून त्याची सत्ता संपुष्टात आली! कौरव पांडवांचे तेच! एकाहून एक रथी महारथी असून,राजसत्ता व प्रचंड सैन्य असून विजयश्री पांडवांच्या नव्हे तर धर्माच्या पक्षात आली! सत्ता संपत्ती व शस्त्र ह्या क्षणात नष्ट होणा-या गोष्टी आहेत! सत्ताधीश हे जास्तीत जास्त दर ५ वर्षांनी बदलत राहतात,भगवंत मात्र अनादी कालापासून तसाच आहे! रावण आणि कौरव हे अस्थिर राजसत्तेचे तर श्रीराम आणि श्रीकृष्ण हे धर्मसत्तेचे प्रतिक आहेत! मानवी कायद्याच्या कचाट्यातून सुटलेल्या अपराध्यांचा मृत्यू हा कधीच सुखद झालेला नाही आणि होणारही नाही हे जरा बारकाईने अभ्यासल्यास दिसून येईल! इथे घडलेल्या अपराधांची नोंद भगवंत स्वतः ठेवून योग्य वेळी शासन हे होतच असते!
प्रश्न राहतो तो आमच्यातल्याच काही कपाळकरंट्या लोकांचा ! ते कधी नव्हते? फार पूर्वापार हा समृद्ध संस्कृतीला लागलेला कलंक आहे! या देशाचा इतिहास नीट अभ्यासला तर ही फंदफितूरीची परंपरा पूर्वापार अव्याहतपणे आजतागायत सुरु असल्याचे दिसून येते! याचाच अर्थ या लोकांना ठरावीक जात नाही,धर्म नाही वा संस्कार नाहीत! या बाबतीत आपल्याला अपवादाने सर्वधर्मसमभाव अनुभवायला मिळतो! पाश्चात्य भोगवादाची चटक लागलेल्या आमच्याच लोकांना धर्माच्या मर्यादा नकोश्या वाटू लागल्या आहेत! त्यामुळेच आज धूम्रपान आणि मद्यपान ह्या गोष्टींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त झालेली दिसते! श्रीमद्भागवतात "यादवांचा" नाश मद्यपानाने केला हे सर्वज्ञात असून ही आमचा समाज याकडे मोठ्याप्रमाणात आकर्षिलेला दिसतो,तीच व्यथा मांसाहाराची ! समाजाची सात्विकता जपण्याची जबाबदारी घेऊन जन्माला आलेल्यांनीच या गोष्टींचे सेवन सुरु केल्याने तोच आदर्श त्यांचे अनुकरण करणा-यांनी घेतलाय! या शिवाय अाणखी एक कळीचा मुद्दा म्हणजे स्त्री-पुरुष समानता ! इतर पंथांच्या तुलनेत हजारो पटींनी आदर व समानतेचे स्थान हिंदू धर्माने स्त्रीयांना दिले आहे! त्यांचे श्रेष्ठत्व स्वीकारलेले आहे ! अन्यथा पुरुष प्रधान संस्कृती म्हणवणा-या जगविख्यात संस्कृतीत ज्ञानग्रहणाची सुरुवात "मातृदेवो भव ।" या उपदेशाने झाली नसती! भारतीय संस्कृतीने दिलेला मान जपणं हे प्रत्येकाचंच कर्तव्य आहे! परकीय आक्रमणांमुळे खंडित झालेली स्त्री शिक्षणाची परंपरा पुन्हा सुरु करण्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी जो त्रास सहन केला त्याचं एका काळात चिज झाल्यासारखं वाटलं खरं , पण आता स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नव्हे ! मोठ्या शहरांमधील महाविद्यालये आणि शाळांमधील उपहारगृहांमधे सर्रास धूम्रपान करणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी पाहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांना यातना होत नसतील कश्यावरुन? इतकंच काय तर स्वतः समर्थ रामदास आणि संत ज्ञानेश्वर देखील आश्चर्यचकित होतील असं आपलं स्वैराचारी आचरण आहे! मग इतरांना दोष का द्यावा?
शेवटी आपल्या सर्वांचा (यात सर्व जाती धर्म आणि पंथ आले) कृतघ्नपणा निसर्गाशी सुरु आहे! त्याने तो किती दिवस सहन करावा? धर्म आणि मानव या ही पेक्षा जो अाद्य कायदा आहे तो निसर्गाचा! त्याचे कायदे आपण सर्वप्रकारे मोडले आहेत! त्याच्या शिक्षा भविष्यात समोर दिसतायंत त्याकडे पाहिजे तितकं लक्ष आजिबात नाही! आपण निसर्गाची ना नैतिकता सांभाळली ना भौतिक सुबत्ता ! भारतासारख्या सुसंस्कृत(?) देशात मध्यंतरी समलिंगी विवाहाच्या कायद्यास मान्यता मिळावी आणि चारचौघात इतरांच्या भावना चाळवणारी "किस ऑफ लव" सारख्या गोष्टींना स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्वमान्यता मिळावी म्हणून आंदोलने आणि जनजागृती अभियाने चालवली गेली ही कोणत्या कोटीची वैचारिक दिवाळखोरी म्हणावी? निसर्गाचा कल हा समतोल राखण्याकडेच आहे ! यावर विश्वास ठेवावा! यातच जीवमात्रांचे भले आहे! अन्यथा सर्वनाश अटळ आहे!
अध्यात्म हा राजकारण वा मिडीयाचा विषय नाही यात त्यांनी पडू नये यातच त्यांचे भले आहे ! यात त्यांनी लक्ष घालणे म्हणजे "विनाशकाले विपरित बुद्धि ।" होय!

बाळकडू

“PREVENTION IS BETTER THAN CURE” रोग होऊच नये म्हणून घेतली काळजी ही बऱ्याच वेळा रोगास प्रतिबंध करते. ह्या विषयावर बोललेलं कितीजणांना आवडेल आणि कितीजणांना याचे जुलाब होतील माहित नाही. पण वास्तवतेच भान करून द्याव वाटलं,म्हणून सांगतोय. सध्या सगळीकडे याच्यावर बंदी घाला,त्याच्यावर बंदी घाला अशी बोंबाबोंब होताना दिसते. पण ही बोंबाबोंब करणाऱ्यांना खरंच काळजी असेल तर ही शुद्ध पळवाट आहे.
PORN साईट वर बंदी घाला!
SOCIAL MEDIA वर बंदी घाला.
अमुक एका पक्षावर बंदी घाला! ???????????????????????????????
हे म्हणजे असं झालं बाहेर थंडी आहे म्हणून आपण स्वेटर घालण्या ऐवजी सगळीकडे शेकोट्या पेटवण्यासारखं आहे. अरे बाहेर ऊन आहे म्हणून आपण टोपी घालतो ना? आपल्याकडे बाळकडू नावाचा एक प्रकार आहे. जो आजकाल देण्याचा प्रकार बंद झालाय कि काय? अशी शंका येते? काय खावं? किती खावं? कधी खावं? याचे काही नियम आपल्या संस्कृतीने घालून दिले आहेत. (धर्म शब्द मुद्दाम वापरत नाही तो वापरला कि बऱ्याच जणांच्या “बुडाला” खाज येते, हे ४ च लोक असतात पण आपल्याकडे याच ४ लोकांना अवास्तव महत्व आहे. ज्यांना “गोमांस भक्षणाचे समर्थन करायला “धर्मग्रंथ,पोथ्या,पुराणे चालतात आणि विज्ञान किंवा त्यांच्या “भोगवादी” जीवनशैलीला अडथळा आणणारा मुद्दा सांगितला कि तेच ग्रंथ त्यांना “अंधश्रद्धा” वाटतात. असो हे म्हणजे गांडूळाचं खरं तोंड शोधण्या सारखं आहे.) ते संस्कृतीच बाळकडू योग्यावेळी आपल्या लेकरांना पाजलं तर “पिढी”/तरुणाई वाया गेली अथवा “भोगवादी”झाली अशी ठिगळ तरुणायीला लावावी लागणार नाहीत. आपल्या घरात टी.व्ही. कोणता असावा हा ज्याचा त्याचा प्रश्न पण channel कोणते पाहावेत हा “संस्करणाचा”मुद्दा मानायला हवा. CHANNEL LOCK करायची सुविधा सुद्धा चुकीचीच! घरात बापाचा आणि आईचा धाकच तेवढा पाहिजे कि स्वप्नात सुद्धा त्याला नको त्या गोष्टी करायची आणि नको ते पहायची इच्छा झाली नाही पाहिजे! आजकाल फाजील लाड,नको इतके स्वातंत्र्य (?) हे आजच्या परिस्थितीला कारणीभूत आहे. पोरांच्या हातात किती पैसे द्यावेत हा ज्याच्या त्याच्या आई बापाच्या ऐपातीचा सवाल जरी असला तरी संध्याकाळी त्या पैशांचा हिशोब विचारून खरं खोटं तपासणं हे आई बापाचं कर्तव्य आहे. पोर बाहेर कुठेही ठेवा पण त्याला न सांगता एकदाच त्याच्या होस्टेलला दिलेली सदिच्छा भेट पुढचे प्रताप थांबवते! सगळ्यात महत्वाचं योग्य त्या ठिकाणी “नाही” म्हणायला शिका. त्यामुळे “नकार” पचवायची ताकत त्याला घरातूनच मिळेल मग फुकट जीव पंख्याला टांगायची वेळ येत नाही.
काही गोष्टी कच्या खाऊ नयेत खाल्लं तर “पोट बिघडतं” हे पण वेळीच समजावलेल उत्तम! मग कोणत्याही channel वर काहीही दाखवू द्या! इंटरनेटवर कोणत्याही साईट असू द्या तुमच्या लेकराला जर तुम्ही स्वेटर आणि कान टोपी घातली असेल तर थंडी वाजायचा प्रश्नच येत नाही. आणि हो स्वेटर आणि कान टोपी घालायची असते हे आई बापाने स्वतः आधी घालून दाखवली तरचं पोरं ती घालतील. कारण मुले ही अनुकरणशील असतात.हा नियम सर्व रोगांवरचा जालीम उपाय आहे. समझने वालों को इशारा काफी होता है।
पटलं तर घ्या!

श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व

||श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||

सध्याचे युग हे “माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे” युग म्हणून ओळखले जाते. दररोज त्याकरिता अद्ययावत साधने विकसित होत आहेत. ही मनुष्याच्या बौद्धिक विकासाची उच्चावस्था म्हणावयास हरकत नाही? पण ही माहिती ज्ञानाविना अर्धवट आहे? हे कदाचित काळाच्या विरोधात विधान असू शकेल किंवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या विरोधातही असेल कदाचित पण “भौतिक विकास आणि सुखसोयी मिळवण्याच्या प्रयत्नात मनुष्याने भौतिक प्रगती तर केली पण तो स्वतःचे मनःस्वास्थ्य मात्र गमावून बसला. याला कारण एकच “ज्ञानाचा अभाव”
“फेसबुक,WhatsApp,हाईक,आणि अजून कित्येक संवाद साधणारी साधने ही जर प्रगतीची चिह्ने असतील तर “श्रीकृष्णार्जुन संवाद “ अर्थातच “श्रीमद्भगवद्गीता” हा या भारतातील नव्हे तर पूर्ण पृथ्वीतलावरील सर्वोच्च संवाद मानवा लागेल.” ज्ञान आणि माहिती यातील नेमका फरक न कळलेली आमची अखिल भारतीय जनता ही ज्ञानाची अखंड परंपरा सोडून माहितीच्या मागे लागली आहे. भारत हा केवळ भूभाग नसून तो या समस्त जगताचा देव्हारा आहे. ती ज्ञानाची अखंड कामधेनु आहे,ही देवभूमी,आर्यभूमी आहे. “भा” म्हणजे तेज आणि “रत” म्हणजे रमतेला! अर्थात “जो तेजोपासनेत रमलेला आहे तो भारत”
पण आजची परिस्थिती या उलट आहे. “तेज” म्हणजे काय? हेच मुळात माहित नाही. कारण भासमान आणि अस्तित्व हीन अंधाराच्या सान्निध्यात निरर्थक विषयांवर निष्फळ चर्चा केल्यावर ब्राह्ममुहूर्ताचा तेजोवलय कसा काय दृष्टीस पडणार? सूर्योदयापूर्वी स्नान ही आता कालबाह्य गोष्ट होतेय? मग उपासनेचा विषय येतच नाही. फेसबुक आणि WhatsApp सारख्या माध्यमांवर आलेले देवी देवतांचे संदेश वा चित्रे एकमेकांना न वाचताच पाठवून हायटेक उपासना करणारी पिढी मनोरुग्ण होणार नाही कशावरून?
सध्या हक्क आणि कर्तव्य यावरून अत्यंत विषारी “राजकारण” जोर धरतंय. त्यात “संविधानाला” ओढलं जातंय. पण हजारो वर्षांपूर्वी केवळ “कर्मयोगाच्या” निष्ठेवर आधारलेले जे संविधान सांगितले गेले त्याकडे आज पूर्ण दुर्लक्ष झालेलं दिसतंय. हा विषय “अवघड” म्हणून शिक्का मारून तो केवळ म्हातारपणी विरंगुळा म्हणून वाचायचा ग्रंथ अशी अवहेलना केली म्हणजे आपण “आधुनिक” झालो असा काहींनी समज करून घेतलेला दिसतो. एक साधं सूत्र आहे “ज्याने त्याने त्याचे कर्तव्य म्हणजेच त्याला नेमून दिलेले काम चोख बजावले तर कोणाच्याही हक्कांवर गदा येण्याचा प्रसंगच उद्भवत नाही. आपण आपले हक्क मागताना कर्तव्य किती पार पाडली हे पहायचे सोयीस्कर टाळतो. आणि इतरांनी आपले हक्क हिरावून घेतले की अकांड तांडव करतो.
या जगात कितीही वेगवान मार्ग विकसित झाले तरी मनुष्याला भोगाच्या अथवा त्यागाच्या मार्गाची निवड करावीच लागते. ज्ञानाचा मार्ग हा त्यागाकडे तर “निराधार” माहितीचा आणि शारीरिक संवेदनांना संतुष्ट करण्याचा मार्ग हा भोगाकडे घेऊन जातो. सध्या “कलीचा” प्रभाव प्रचंड वाढल्याने मनुष्यातील “मनुष्यत्व” लुप्त होत चालले आहे. पैसा,प्रसिद्धी आणि वासना या त्रिसूत्रीवर समाज चालताना दिसून येतो. यामुळेच “पैसा” भ्रष्टाचार, जनप्रक्षोभक विधाने ही “प्रसिद्धी” तर बलात्कार आणि अंगप्रदर्शन ही “वासनेला प्रोत्साहन देताना दिसतात. यात “मिडिया” किंवा “संपर्क माध्यमांचा” काय दोष? ती बिचारी निर्जीव आहेत विवेकहीन आहेत,पराधीन आहेत पण त्यांना संचालित करणारा मनुष्य तर “विवेकी” आहे? आजन्म “ब्रह्मचारी” राहून “हिंदू धर्माची” ध्वजा जगभर दिमाखात मिरवणाऱ्या आणि “वसुधैव कुटुंबकम” ही उक्ती सार्थ करणारे “स्वामी विवेकानंद” याच मातीतले हे सांगितले तर कदाचित कुणाला तरी खरं वाटेल?
“गीता” ही स्वधर्माचा उपदेश करते.ती मोहपाशातून सोडवते,मनुष्याला सक्रीय बनवते,विवेकी बनवते. गीता हा भारतीयांचा आत्मा आहे. त्यात कोणताच वाद नाही? त्यात कुठलेच मत मांडलेले नाही आणि कुणाच्या मतांचे खंडनही केलेले नाही. तो एक संवाद आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी न कधी तो एकदा का होईना अर्जुन होतोच. कर्तव्य आणि भावना यांच्या जाळ्यात तो सापडतोच. मग पुढे काय? हा प्रश्न त्याला पडल्याशिवाय राहत नाही. जीवनातील “योग्य” सद्गुरूंची भेट आयुष्यातील “विसंवादाकडून” सुसंवादाकडे आणते. तोच त्याचा निर्णायक क्षण असतो.
दुर्बलांचे आणि अज्ञानी लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांचे रक्त पिणारी गोचीडे ही सरकारी कार्यालयापासून “अध्यात्मिक” ठिकाणांपर्यंत असंख्य दिसतील. तरीही आपण या परिस्थितीत आजीबात डगमगता कामा नये. आपली आपल्या कार्यावरील निष्ठा ढळता कामा नये. या सृष्टीचा एक नियम आहे “जो जे पेरतो तेच उगवते” म्हणजे बाभळीचे बी पेरले तर भविष्यात बाभळीची झाडे तर आंब्याच्या कोयी पेरल्या तर आंबे उगवणारच! मनुष्य अनैसर्गिक वागला तरी निसर्ग त्याचा धर्म सोडीत नाही. कितीही कार्बन डायऑकसाइड वाढला तरी झाडे ही ओक्सिजनच मुक्त करतात. या भूतलावर केवळ मनुष्यच आपले कर्तव्य विसरलेला दिसतो. अन्यथा ग्लोबल वॉर्मिंग ची कृत्रिम समस्या मनुष्य कर्तव्यापासून दूर पळाल्याचा पुरावा घेऊन त्याच्या समोर उभी ठाकली नसती. आपली मानसिकता इतक्या नीच थराला गेलीय की आपल्याच हव्यासामुळे निर्माण झालेला दुष्काळ दूर करण्याचे प्रयत्न सोडून त्याचे राजकारण करून गेलेली सत्ता मिळवण्याकडे आपला कल आहे.
आजची “गीता जयंती” ही खरोखरच अंतर्मुख करायला लावणारी आहे. सभोवतालची परिस्थिती ही कुणा राजकीय पक्षामुळे वा अतिरेकी संघटनेमुळे निर्माण झालेली नसून ती आपणच केलेल्या कर्तव्यातील कसुरीने निर्माण झालेली आहे. त्याला कोणताही व्यक्ती समूह अथवा कोणताही एकटा धर्म जबाबदार नाही. तर सर्वच धर्मातील लोकांनी “मनुष्यधर्म” सोडल्याने निर्माण झालेली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. “मनुष्यधर्म” अंगीकारायला हा सुयोग्य मुहूर्त आहे आणि गीता उत्तम मनुष्यधर्माचे मार्गदर्शन करते. आजच्या “गीता जयंतीच्या” प्रसंगी “गीताव्रती” होण्याचा संकल्प करूया. आता हा संकल्प कोणाच्या तरी “मन की बात” होण्याची वाट पाहू नका.
"श्री गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा"
||श्रीगुरुदेवदत्त||
-“श्रीरामकृष्ण”चरणरज
९७६३७७६३३९

पसायदान संपूर्ण अर्थासह ....

आता विश्वात्मके देवे। येणे वाग्यज्ञे तोषावे॥ तोषोनि मज द्यावे। पसायदान हे॥१८.१७९३॥

"आता" म्हणजे कधी? तर हा आपल्या गुरुकृपाप्रसादाने अर्थात् श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने आरंभिलेला ९००० ओव्यांचा हा वाग्यज्ञ पूर्णत्वास गेल्यानंतर! आता विश्वात्मक देवाने "तोषावे" म्हणजे संतुष्ट व्हावं आणि ह्या विश्वाच्या अंत:करणाच्या प्रसन्नतेच दान मला द्यावं.हे दान सुद्धा ज्ञानेश्वरांनी त्याच विश्वात्मक देवाकडे मागितलयं ज्याला अभिवादन करुन त्यांनी ह्या ऐतिहासिक वाग्यज्ञाला प्रारंभ केला होता.
ॐ नमोजि आद्या ।वेदप्रतिपाद्या॥ जयजय स्वसंवेद्या ।आत्मरुपा॥ कसं आहे विश्वात्मक देवाचं स्वरुप? ते आद्य तत्त्व आहे विश्वाच्या अणूरेणूंमध्ये ओतप्रोत भरलेलं! वेदांनी ज्याचं प्रतिपादन केलं आहे. ते स्वसंवेद्य आहे म्हणजे त्याची अनुभुती फक्त स्वत:लाच होते इतरांना करुन देता येत नाही.अशा प्रकारचं जे स्वरुप आहे तेच आत्मरुप आहे. ते आपणा सर्वांमध्ये आहे फक्त आपणाला त्याची जाणीव नाही,संवेदना नाही. असं जे अविनाशी तत्त्वं आहे त्यालाच वंदन करुन आपल्या वाग्यज्ञाला आरंभही केला अन् ह्या सर्व चराचर सृष्टीतील प्राणिमात्रांच्या अंतःकरणाचं दान सुद्धा मागितलं.पसायदान हे केवळ विश्वात्मक देवाकडे मागितलेलं दान नसून ते ज्ञानेश्वरांच्या विशाल अंतःकरणाचं प्रतिकसुद्धा आहे.

दुरितांचे तिमिर जावो | विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ||
जो जे वांछील तो ते लाहो | प्राणीजात|| १८.१७९५

“सर्व प्राणी मात्रांमध्ये जर मैत्रभाव निर्माण व्हायचा असेल तर सर्वात आधी काय हवं? तर अज्ञानाचा अंधकार नाहीसा व्हायला हवा.कसा बर होईल नाहीसा तो? ज्ञानेश्वरांनी तत्कालीन समाज व्यवस्थेचा खूप बारकाईने अभ्यास केलेला आहे. आपसात मैत्र वाढीस कसे लागेल हे सांगताना ते म्हणतात -

“दुरितांचे तिमिर जावो”

“दुरित” म्हणजे पाप
“तिमिर” म्हणजे अंधार पापाचा अंधार नाहींसा होवो, आणि

“विश्व स्वधर्म सूर्ये पाहो||”

“आपल्याकडे धर्म ह्या शब्दाने खूप गोंधळ घातलेला आहे. पण माऊलीने हा शब्द "स्वतःची कर्तव्ये" ह्या अर्थी वापरला आहे. प्रत्येकाने त्याची कर्तव्ये कशी पार पाडावीत तर सूर्य जसा निरपेक्षपणे त्याच काम करतो ना अगदी त्या प्रमाणे! प्रत्येकाने त्याचा स्वधर्म पाळला म्हणजेच स्वतःची कर्तव्ये हि व्यवस्थित पार पडली कि मग कोणतीही अडचण राहत नाही. म्हणजे विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळवत असताना इतर कोणताही मोह बाळगणे हे त्याच्या कर्तव्यापासून दूर गेल्यासारख होईल. स्त्री हि नेहमी स्त्री च असते जेव्हा ती आई होते तेव्हा तेव्हा तिच्या मध्ये मातृधर्म प्रकट होतो तेव्हा तो सोडून तिला इतर कोणताही मोह होणे हा स्वधर्मापासून परावृत्त झाल्यासारखे असेल. राजाला त्याच्या प्रजेचे हित पाहण्याचे सोडून इतर कोणताही मोह झाल्यास त्याला पापाचरण म्हणता येईल.आणि ह्याच पापाचा अंधार माऊलींना नष्ट व्हावा असे वाटते.आणि जेव्हा प्रत्येकाला स्वधर्माचे द्न्यान होईल,तेव्हा प्रत्येक जण एकमेकांच्या सुखासाठी प्रयत्न करू लागेल,दुसऱ्याला झालेला आनंद तो स्वतःचाच मानू लागेल आणि मग
“जो जे वांछील तो ते लाहो | प्राणीजात ||”
ज्याला जे हव ते मिळू दे.कारण कुणीही त्यावेळी कोणत्याही गोष्टीची इच्छा स्वार्थभावनेने करणारच नाही. मग केवळ मनुष्य मात्र नव्हे तर अखिल प्राणी जातीच्या सुखासाठी झटू लागेल. आणि खऱ्या अर्थाने स्वधर्माचा सूर्योदय होईल. आणि प्रत्येकाचे मागणे हे एकमेकांच्या हितासाठी असल्याने माऊली विश्वात्मक देवाजवळ प्रार्थना करते कि समस्त प्राणी जातीला जे इच्छा करतील ते प्राप्त होऊ दे. माणसाच्या मूळ माणूसपणावर ज्ञानेश्वरांचा किती प्रगाढ विश्वास आहे हे इथे दिसून येतंय!

वर्षत सकळ-मंगळी| ईश्वरनिष्ठांची मांदियाळी |
अनवरत भूमंडळी | भेट तू भूता||१८.१७९६||

“सत्संगती सदा घडो,सुजन वाक्य कानी पडो|
कलंक मातीचा झडो, विषय सर्वथा नावडो ||”

सर्व परिचित आणि सर्वज्ञात असे हे बोल याच चालत बोलत उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर माऊली! जेव्हा भगवंताला सृष्टीची उत्पत्ती करण्याची इच्छा झाली तेव्हा प्रथम त्याने सूर्य,चंद्र आणि ग्रह तारे निर्माण केले,त्यामध्ये पृथ्वी हा असा एकच ग्रह असा आहे,कि जिथे हजारो वर्षांपासून जीवसृष्टी अस्तित्वात आहे.ह्या पृथ्वीवरील भारतभूमी इतर भूभागांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.हि भूमी देवभूमी आहे,तपोभूमी आहे,हि आर्यभूमी तेजस्वी पुत्रांना जन्म देणारी आहे.ह्याच पवित्र भूमीवरून गंगा,सिंधू,ब्रह्मपुत्रा आदि पवित्र नद्या वाहतात.ह्या नद्यांच्या तीरावरील अनेक तीर्थक्षेत्र ह्या भूमीच्या समृद्ध आणि सांस्कृतिक वारश्याची साक्ष देतात.ह्याच भूमीवर भगवंताने दशावतार घेऊन जीव सृष्टीचा विकास केला.परमेश्वराने अनुकरणीय श्रीराम आणि चिंतनीय श्रीकृष्ण म्हणून नरदेहात जन्म घेतला.ह्याच भूमीवर चराचरांना मार्गदर्शन करण्यासाठी वैदिक धर्माची स्थापना साक्षात् परमेश्वराने केली.भगवान श्रीकृष्ण ह्या पूर्णावतारानंतर मात्र भगवंताला वाटल कि आपण मानवाची सर्वोत्तम प्राणी म्हणून उत्पत्ती तर केली,त्याला देह बरोबर मन आणि बुद्धी दिली,विवेक दिला.पण तो हळू हळू शिकणारा प्राणी आहे.षड्रिपू हे त्याच्या देहाबरोबरच येतात,ह्या षड्रिपूशी कसा सामना करायचा?ते त्याला कोण शिकवणार? त्याला आधार कोण देणार?त्याला आत्मोन्नतीचा मार्ग कोण दाखवणार?त्याला सनातन म्हणजे नित्य नवीन असणाऱ्या वैदिक धर्माचे रक्षण करण्याची शिकवण कोण देणार? भगवंताला जेव्हा समस्त मानवजातीची दया येते तेव्हा तो गुरुस्वरुपात,संत सत्पुरुषांच्या स्वरूपात जन्म घेतो.
“वर्षत सकळ-मंगळी| ईश्वरनिष्ठांची मांदियाळी |”

वर्षत म्हणजे वर्षाव व्हावा, ओघ लागून राहावा.
सकळ-मंगळी|- म्हणजे सर्व प्राणी मात्रांना! कुणाचा?
तर ईश्वरनिष्ठ लोकांचा!
माऊली म्हणते कि अशा स्वरूपातील व्यक्तींच्या जन्माचा ओघ ह्या पृथ्वीतलावर अखंड अविरत लागून राहिला पाहिजे.आणि हे लोक कसे असतात तर “ईश्वरनिष्ठ”! आपण मात्र नश्वरनिष्ठ असतो.माहित असत कि हे संपणार आहे,अशाश्वत आहे,नाश होणार आहे तरीही त्याच्या प्राप्ती साठी आयुष्यभर जीव टाकतो आणि जे नित्य चिरंतन अविनाशी तत्व आहे त्याकडे आपल लक्षच नसत.आयुष्यभर आपण सत्ता संपत्ती ह्या नश्वर गोष्टीनकरिता झगडत राहतो. आपल्याला वाटत असत कि सत्ता संपत्ती आणि शस्त्र ह्या तिन्ही पैकी एखादी जरी गोष्ट मला प्राप्त झाली तरी मी जगावर राज्य करू शकेन. पण ह्या तिन्ही गोष्टी अत्यंत बेभरवशासाठी प्रसिद्ध! सत्ता आज आहे उद्या नाही,संपत्ती हि तर चंचलपणासाठी प्रसिद्ध! आणि शस्त्र,शस्त्र तर इतक बेभरवश्याच कि विकत घेणाऱ्याच्या संरक्षणाची हमी ते देऊ शकत नाही. शस्त्राला मन नसत,बुद्धी नसते,विवेक नसतो.असत तर त्याला कळल असत कि आपल्याला विकत घ्यायला आलेला मनुष्य हा वाईट आहे,त्याच्याच अंगावर ते उडाल असत. ह्या सर्व गोष्टी करताना आपणाला भगवतांच्या भक्तीची आठवण, त्याच्या कडे जाण्याचा मार्ग दाखवणाऱ्या व्यक्तीची पराकोटीची गरज असते. म्हणून ज्ञानेश्वर विश्वात्मक देवाजवळ मागण मागतायत-
अनवरत भूमंडळी | भेट तू भूता||१८.१७९६||
अनवरत-म्हणजे अखंड अविरतपणे
भूमंडळी- भूतलावर
भेट तू भूता||-
तू अखंड अविरतपणे संतांच्या,सज्जनांच्या,सत्पुरुषांच्या आणि गुरुस्वरुपातील व्यक्तींच्या माध्यमातून ह्या समस्त मानव जातीला भेटत राहा. मार्गदर्शन करत राहा,पृथ्वीवरील अज्ञान तिमिराने ग्रासलेल्यांना ज्ञानाचा प्रकाश दाखव. आणि त्यांचा उद्धार कर.
“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत|
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम||
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् |
धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे ||”
(जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल,तेव्हा तेव्हा मी स्वतः जन्म घेईन आणि धर्माच अभूत्थान घडवून आणेन. जी दुष्कृत्ये आहेत त्यांचा नाश करेन आणि सज्जनांचा उद्धार करेन “) ह्या भगवंतवचनाची आठवण ते त्यालाच करून देतायत. आणि पुनःपुन्हा जन्म घेण्याचा आग्रह करतायत. आज सभोवताली पाहता खरच परिस्थिती खूप गंभीर आहे! ईश्वरनिष्ठ लोकांचे मेळावे ओसरले आहेत आणि नश्वरनिष्ठ लोक पावलोपावली भेटतायत.ह्या सर्व गोंधळात एक प्रश्न खरोखर विचार करण्यासारखा आहे- आपण खरोखरच ईश्वरनिष्ठ आहोत का?..

चला कल्पतरूंचे आरव | चेतना चिंतामणीचें गाव|
बोलते जे अर्णव पीयूषांचे||१८.१७९७||
चंद्रमे जे अलांछन| मार्तंड जे तापहीन |
ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतु||१८.१७९८ ||

विश्वात्मक देवाजवळ मागण मागताना माऊली सर्व प्राणीमात्रांना सत्पुरुषांच्या रुपाने भेटणाऱ्या लोकांचे वर्णन करताना म्हणते- हे लोक कसे असतात बर? तर “चला कल्पतरूंचे आरव”! म्हणजे काय ?तर चालती बोलती कल्पतरूंची अरण्येच! जंगलामध्ये एखादाच कल्पतरू सापडतो,तो शोधावा लागतो मग त्या खाली बसून ज्याची इचा करावी ते अगदी विनासायास मिळत.पण इथे मात्र वेगळीच परिस्थिती आहे.इथे प्रत्येक व्यक्ती हि कल्पतरूच आहे.त्यांच्या सावलीत गेलं कि काही मागावं लागत नाही आपोआपच सर्व मिळत जात. आणि मने?
“चेतना चिंतामणीचें गाव”
त्यांची मने म्हणजे तर चिंतामणी रत्नांची गावेच जणू! चिंतामणी नावच रत्न आपल्या चिंता हरत अस म्हणतात, हे सत्पुरुष सुद्धा आपल्या चिंता तत्काळ हरण करतात, इतरांचा त्रास ते स्वतःचा समजतात.वाचा तर इतकी गोड कि “बोलते जे अर्णव| पीयूषांचे” चालते बोलते अमृताचे समुद्रच! समुद्राला तरी भरती ओहोटी असते परंतु ह्यांच्या अमृत मधुर वाणीला मुळीच भरती ओहोटी नसते. अखंडित ,अव्याहतपणे ह्यांचे अमृत सिंचनाचे कार्य चालूच असते! ह्यांचे केवळ बोल ऐकताच मनाला शांतता व स्थिरता लाभते. दुःखाचा विसर पडतो.आणि मनुष्याचे मन ईश्वर चरणी रमू लागते!
पुढे ज्ञानेश्वर वर्णन करतात- “चंद्रमे जे अलांछन| मार्तंड जे तापहीन “
हे सत्पुरुष चंद्राप्रमाणे आहेत पण निष्कलंक!कोणतेही लांच्छन त्यांना नसते, हे सूर्याप्रमाणे तेजस्वी असतात मात्र त्यांचा दाह होत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे
“ते सर्वही सदा सज्जन| सोयरे होतु”
ते सर्वांनाच,नेहमीच सज्जन आणि सोयरेच असतात. सोयरा म्हणजे नातेवाईक! आपला नित्य अनुभव असा आहे कि जो सज्जन असतो तो आपला सोयरा नसतो आणि जो सोयरा असतो तो सज्जन नसतो. परंतु ह्यांच्या ठिकाणी मात्र आप-पर भाव दिसून येत नाही. ते सर्वांवर सारखेच प्रेम करतात. एकूणच काय तर चंद्र,सूर्य, महासागर,चिंतामणी आणि कल्पतरू ह्यांना मर्यादा आहेत मात्र हे सत्पुरुष मात्र अमर्याद आहेत.त्यांच्या निस्वार्थी प्रेमाला मर्यादा नाही.कुठेही खोटेपणा नाही,सद्य परिस्थिती पाहता अश्या व्यक्ती मिळणे जरा अवघडच आहे,पण अशी व्यक्ती भेटल्यावर एकच म्हणणे असेल-
“धन्य आजि दिन संत दर्शनाचा| अनंत जन्मीचा शीण गेला.”

किंबहुना सर्व सुखी| पूर्ण होऊनी तिन्ही लोकी |
भजिजो आदिपुरुखी | अखंडित ||१८.१७९९

आता मागण्या सारख फार काही उरलंच नाहीये! साऱ्या जगासाठी एकच मागण मागता येईल कि ह्या जगातील सर्व जीवमात्र हे सर्वार्थाने सुखी व्हावेत. त्यांच अद्न्यान गळून पडू दे आणि ज्ञानाचा सूर्योदय प्रत्येकाच्या आयुषात येऊ दे. मग सर्वचजण भगवंताच्या उपासनेला लागतील आणि एकदा का ते ह्या मार्गाला लागले कि,ह्या जगात कुणालाच दुःख शिल्लकच राहणार नाही. कारण कितीही झालं तरी “ओम् नमोजी आद्या “ हे विसरून कसं बर चालेल?

आणि ग्रंथोपजीविये| विशेषी लोकी इये|
दृष्टादृष्टविजये | होआवे जी||१७.१८००
सर्व जग सुखी व्हाव हे जरी खरं असल तरी ते नेमक्या कोणत्या अर्थाने सुखी व्हावेत बर? तर जे ग्रंथाभ्यास करतील,भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथांच वाचन आणि आचरण करणाऱ्यांना दृष्ट आणि अदृष्टावर विजय मिळवा. दृष्ट म्हणजे शरीर आणि अदुष्ट म्हणजे मन! तस पाहता ह्या शब्दांचे अनेक अर्थ आहेत,पण अगदी खोलात न जाता “सुख आणि मधुर सुखाच्या यातना” ह्यातील फरक कळला कि झालं. फार फार तर अस म्हणता येईल कि तिमिराकडून तेजाकडे,अज्ञानाकडून ज्ञानाकडे,मुर्तातून अमुर्ताकडे,व्यक्तातून अव्यक्ताकडे, आणि सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा मार्ग सापडावा.

येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो| हा होईल दानपसावो|
येणे वरे ज्ञानदेवो|सुखिया झाला||१८.१८०१||
ज्ञानेश्वर शेवटी म्हणतात मी हे विश्वात्मक देवाजवळ मागितलेलं हे दान खरंच फळाला येईल का? हा जो ९००० ओव्यांचा अखंड वाग्यज्ञ केला ततो खरोखर यशस्वी होईल का? आणि मग विश्वात्मक-देवाच्यावतीने निवृत्तीनाथांनी उत्तर दिलं- हो निश्चित होईल. आणि मग ज्ञानेश्वर “सुखिया झाला”

||श्रीरामकृष्णार्पणमस्तु||
शब्दांकन - अमेय दीपक कानडे ९७६३७७६३३९