Thursday, 27 October 2016

कर्णाचे उदात्तीकरण आणि वास्तव


वाईट गोष्टींचे उदात्तीकरण करायचे आणि ती प्रथा म्हणून रूढ करायची हा आता जणू प्रघातच पडलाय.. “सारी नाईट बेशर्मी की हाईट”, “बेबी डॉल मै..” ही सध्या तरुणाईच्या ओठांवरची फेमस गाणी... ज्या गोष्टीच्या नैतिकतेवर संस्कृती आधारलेली आहे त्याच गोष्टी देशोधडीला लावून.. चार उघडे नागडे सीन दाखवून कामुकता कसली वाढवता? वैचारिक संक्रमांच्या काळात “विवेकानंदांच्या राष्ट्रप्रेमी, अध्यात्मिक विचारांची बैठक जिथे हवी त्या बैठकीत सनी लिओन नाचते ती ही विवस्त्र? म्हणजे हे तर द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वर झालं.. आणि हे आज नाही फार पूर्वी पासून चालत आलंय.. खलापात्रांचे उदात्तीकरण करा इतिहासाच्या विरुद्ध मतप्रवाह तयार करणाऱ्या कादंबऱ्या लिहा आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवा ही जणू प्रथाच पडत चाललीय..
                      आज जरा कर्णा विषयी बोलूया.. उदात्तीकरण केलेल्या आणि बहुतेक तरुण वाचक वर्गामध्ये अत्यंत सहानुभूती असलेला,अतोनात अन्याय सहन केलेला माणूस म्हणजे “कर्ण“! अत्यंत बेजाबदारपणे, अत्यंत खोट्या पद्धतीने कर्णाचा शूरपणा रंगवण्यात आला आहे..तो अर्जुनापेक्षा शूर होता हे खोटंच रंगवण्यात आलंय.. कर्ण किती भित्रा आणि पळपुटा होता त्याचे काही संदर्भ देत आहे जरूर वाचावेत आणि प्रतिक्रिया द्याव्यात. सदर प्रसंग मूळ महाभारतातले आहेत.. कोणतीही तिरकस प्रतिक्रिया देण्याआधी एकदा महाभारत जरूर वाचून पहावे..
प्रसंग १) “द्रोणाचार्यांना गुरूदक्षिणा”.. द्रोणाचार्यांचा पूर्वी द्रुपद राजाच्या राजसभेत अपमान झालेला होता. भर राजसभेत-“अरे भिकारड्या चालायला लाग फार तर तुला आज रात्रीच जेवण देईन..बाकी काही इथे मिळणार नाही” अशा शब्दात अवहेलना करून हाकलून दिले होते. तेव्हा गुरुदक्षिणा म्हणून कौरव आणि पांडवांना द्रुपदाला बंदी करून समोर आणण्याची आज्ञा केली.पांडवांचे श्रेय लाटण्यासाठी कौरवांनी द्रुपदावर चाल प्रथम केली.. तेव्हा शकुनी, इतर कौरवांसह दुर्योधनाचा आणि कर्णाचा दारुण पराभव द्रुपदाने केला
प्रसंग २) द्रौपदी स्वयंवर –“मी सुतपुत्राला वरणार नाही” असं द्रौपदीचं विधान महाभारतात कुठेही नाही...स्वयंवर मांडले असल्याने नाकारण्याचा तिला हक्कच नव्हता..जो पण जिंकेल त्याच्या गळ्यात वरमाला घालावी लागणार होती...कर्णाने प्रयत्न केला पण त्याला लक्ष्यभेद करता आला नाही म्हणून तो संतापून जागेवर जाऊन बसला. संदर्भ- भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळाने काढलेल्या शुद्धीत महाभारतात (१७८,१७९ अध्याय)
प्रसंग ३-“घोषयात्रा” पांडव वनवासात असताना त्यांची चेष्टा करुया, आपले वैभव दाखवूया म्हणून कौरव  गेले आणि चित्ररथ गंधर्वाच्या तावडीत सापडले. त्याच्याशी झालेल्या युद्धात सर्वजण पराभूत झाले..पळून गेले. चित्ररथाने दुर्योधनाला पकडले..त्यावेळी गंधर्वाने चोपला म्हणून दुर्योधनाला सोडून कर्ण पळून गेला..हे भीमाला समजलं तेव्हा भीम म्हणाला जाऊ दे आयता कट निघाला तेव्हा नंतर युधिष्ठिराच्या आज्ञा मानून( आज्ञा-आपल्यात भांडताना आपण ५ ते १०० पण परक्यांशी भांडताना आपण १०५आहोत ) तेव्हा भीम आणि अर्जुनाने चित्ररथाचा सहज पराभव केला..त्याला जीवदान दिले. त्यावेळी कृतज्ञता म्हणून गंधर्वाने चाक्षुष्मती विद्या आपणाहून अर्जुनाला दिली.
प्रसंग ४- उत्तर गोरहण –विरत राजाच्या गाई कौरवांनी पळवल्या.. त्यावेळी पांडवांचा वनवास नुकताच संपला होता. विराटाचा पुत्र .उत्तर बायकांमध्ये बडबडला “कोण उन्मत्त आहे त्याला पाहतोच मी? असं म्हणून निघाला पण त्याला सारथी नव्हता. तेव्हा कंकाच्या वेशात असणऱ्या युधिष्ठिराने बृहन्नडा वेशातील अर्जुनाला सारथी म्हणून पाठवले..कौरवांची सेना पाहून उत्तर पळून जाऊ लागला तेव्हा अर्जुनाने पकडून त्याला सारथ्य करायला लावले व स्वतः लढला भीष्म द्रोण दुर्योधन,कर्ण ह्या सगळ्यांना पराभूत केलं..अक्षरशःसर्वजण पळून गेले. वरच्या सर्व प्रसंगात अर्जुनाने कृष्णाच्या मदतीशिवाय कर्ण व इतरांचा पराभव केला होता. हे आवर्जून सांगाव वाटतं. इतकं सगळं स्पष्ट असूनही करणा बद्दल खोटा इतिहास का रंगवला जातो त्याचा सुगावा काही केल्या लागत नाही. महर्षी व्यासांची वाक्ये कशी खोटी मानावीत.? “अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे विचारांचा स्वैराचार नाही “ आपल्या प्रतिभा पणाला लावताना तरुण पिढ्या ह्या नको त्या व्यक्तींना आपला आदर्श मानणार नाहीत. ह्याची खबरदारी नवोदित लेखकांनी घ्यावी. कर्णप्रमाणेच अजून बरीच पात्रे माझ्या रडारवर आहेत. यथावकाश समाचार घेईनच... आता सद्यस्थितीत दिलेल्या खऱ्या गोष्टींना खरे मानून आधीची भासमान प्रतिमा पुसण्याचे औदार्य कितीजण दाखवतील? हा “सूर्य आणि हा जयद्रथ” इतकं हे स्पष्ट आहे..
विनंती इतकीच की काल्पनिक कथा कादंबऱ्यांवर विश्वास ठेवण्याआधी आपण वाचत आहोत ते कितपत खर आहे हे मूळ ग्रंथ उघडून निश्चित खात्री करून पहावं आणि मग आपलं मत बनवावं..
आपल्या प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

Monday, 18 July 2016

।। तस्मै श्री गुरवे नमः ।।

।।श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू: गुरुर्देवो महेश्वर:।
गुरु:साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ।।

हा सर्वज्ञात, सुपरीचित आणि बहूतेक मुखोद्गत असा श्लोक! पण गुरुपरंपरा हा कदाचित नवपरिचित अथवा प्रथमच वाचनी आलेला शब्द असू शकेल. या श्लोकाचा आणि या शब्दाचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे,याची कल्पना फार कमी जणांना असेल. जे या परंपरेशी निगडीत आहेत. त्यांच्या दृष्टीने हा परिचयाचा असू शकतो.परंतु *एकेकाळी समग्र जीवन व्यापलेल्या आणि केवळ आयुष्य नव्हे तर मनुष्य जन्मात अत्यंत महत्वाचे असलेले गुरुस्थान आणि त्यांची अव्याहत सुरु असणारी गुरुपरंपरा* याचा समाजास विसर पडलेला दिसतो.
आज व्यासपौर्णिमा अर्थातच गुरुपौर्णिमा! गुरुंना वंदन करण्याचा, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस़! पण मूळात गुरुंची गरज काय? दैनंदिन जीवनात गुरु असण्याचा फायदा काय? शाळा,महाविद्यालये आणि इतर अनेक शाखांची शिक्षणे देणा-या अद्ययावत आणि अगणित संस्था असताना तसेच संपर्काची व माहितीचा प्रचंड स्फोट करणारी अत्याधुनिक साधने असताना गुरुंची गरज काय? असा सर्वसामान्य प्रश्न पडणे साहजिकच आहे. नव्हे तो पडलाच पाहिजे. तरच गुरु का असावेत? याचं उत्तर शोधता येईल.
मनुष्य जीवनाला दोन बाजू असतात - एक श्रेयसाची आणि दुसरी प्रेयसाची! श्रेयस् आणि प्रेयस्  हे शब्द जरी नवीन वाटत असले आणि अर्थ जरी उमगत नसला तरीही दैनंदिन जीवन आपण या दोनच गोष्टींसाठी व्यतीत करतो. आणि ह्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी दोन मार्ग आहेत! एक भोगाचा आणि दुसरा त्यागाचा! श्रेयसाची इच्छा करणारे त्यागाचा मार्ग अवलंबतात तर प्रेयसाची इच्छा करणारे भोगाचा मार्ग पत्करतात.भारत ही अध्यात्मप्रधान भूमी! अध्यात्म हाच या भूमीचा आत्मा! ज्ञान आणि त्यातून जन्म घेणारे विज्ञान यांचा समतोल धार्मिक संस्कारात साधून विवेकी जीवन व्यतीत करणा-या लोकांचा हा देश! त्यामुळे ज्ञानोपासना हा या देशवासियांचा मूळ पिंड! कितीही आक्रमणे झाली कितीही पाश्चात्य संस्कृतींचे आक्रमण झाले तरी " श्रेयसाची" कास धरणारा हा समाज आहे.

८४ लक्ष योनींचा प्रवास करुन आत्मा मनुष्यदेहात ठराविक कालावधीसाठी पृथ्वीतलावर येतो. यात त्याला श्रेयसाची आणि प्रेयसाची सांगड घालून मोक्षाकडे वाटचाल करायची असते. म्हणून तो चरितार्थासाठी नोकरी/ व्यवसाय करतो तर वैयक्तिक जीवनात  नित्य उपासना करीत असतो. म्हणजेच एका बाजूला तो अध्यात्म आचरुन श्रेयसाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करत असतो तर चरितार्थाद्वारे इच्छित उपभोग्य वस्तु आणि जीवनावश्यक गरजांची पूर्तता करत असतो. म्हणजेच आता श्रेयस् आणि प्रेयसाची थोडीफार कल्पना आपणास आली असेल.
आपला धर्मच पुनर्जन्माच्या वास्तवतेवर आधारलेला आहे. त्यामुळे *आत्मा* हा नित्य, सनातन आणि शाश्वत आहे हे ओघाने आलेच! हे सत्य नाकारणा-याच्या वाट्याला सुद्धा हे वास्तव येतेच हे वेगळे सांगावयास नको! कारण सूर्य उगवला म्हणजे सर्वांनाच तो दिसतो पण काही लोक डोळे बंद करुन घेतील तर काही जन्मतःच अंध असतील अशांना ह्या सूर्याचे दर्शन होत नाही. याचा अर्थ त्या व्यक्तींनी सूर्यच नाही किंवा तो उगवतच नाही असा काढला तर ज्याप्रमाणे  त्यांना मूर्खात काढले जाईल किंवा हसे होईल. त्याचप्रमाणे पुनर्जन्म आणि आत्मा ह्या संकल्पना नाकारणा-यांचे !
इथेच श्रेयस् आणि प्रेयसाच्या द्वैताला प्रारंभ होतो. श्रेयसाची उपासना करणारा आयुष्यभर नित्य आणि शाश्वत गोष्टी मिळवण्यातच धन्यता मानतो तर प्रेयसाची इच्छा करणारा नश्वर गोष्टींमधे गुंतून पडतो. कर्मसिद्धांत हा कोणासही चूकलेला नाही. आजचे आपले कर्म हे उद्याचे प्रारब्ध असते याचा विसर मनुष्याला काळाच्या ओघात व यशाच्या धुंदीत पडतो.तो विसरतो की सत्ता,संपत्ती, जमीन-जुमला, नोकर-चाकर इत्यादी सर्व गोष्टी इतकंच काय पण स्वतःचा देह देखील क्षणिक आणि नित्य परिवर्तनशील आहे. मनुष्याला जन्म होण्याआधी ९ महिने अगोदरच कल्पना मिळते मात्र मृत्यूची नाही. कोणाचा मृत्यू कधी,कुठे,कसा होणार याची सुतराम कल्पना मनुष्याला नसते. जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत तो आपण अमर आहोत अशा आविर्भावात जगत असतो. ह्या धुंदीत तो हे विसरतो की ज्या (प्रेयस)गोष्टी तो अथक परिश्रम करुन लालसेपोटी मिळवतो आहे, मग तो पैसा असो,घर असो, सत्ता असो,पद असो वा नातेवाईक असो ! मृत्यू आल्याक्षणी हे सारं काही त्याच क्षणाला इथेच या जगात सोडून जायचं आहे. जे माझं माझं म्हणून कमवलं त्यातलं काहीच सोबत येणारं नाही! अंगावरील वस्त्रे सुद्धा लोक अंतिमक्षणी काढून घेणार आहेत . गतप्राण देहाला *प्रेयसाची* सोबत फार तर चितेपर्यंतच! एकदा देह हा अग्नीच्या स्वाधीन केला की मग तिथून पुढचा प्रवास केवळ आपले धर्माचरण आणि आपले सत्कर्मासह! अर्थातच *श्रेयस्कर* वाटचाल
जीवनात झालेली योग्य गुरुंची भेट हा *श्रेयसाबद्दलचा* विवेक जागृत ठेवते. अनंत जन्मांच्या प्रवासाने मानवी मनांवर अनेक दोषांची आवरणे आणि पशु जन्मातील संस्कार झालेले असतात. हे संस्कार पुन्हा पुन्हा उफाळून वर येतात. मनुष्य योनीव्यतिरिक्त इतर योनी या भोग योनी आहेत. केवळ इंद्रिय तृप्ती, उदरभरण आणि प्रजनन हेच पशुंचे गुण आहेत. विवेक हा एकमेव सद्गुण मनुष्याला इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ ठरवतो. आणि हा “विवेक” केवळ श्रीगुरुंच्या सत्संगातुनच येतो. तेव्हा आपल्या सत्संगाने नराचा नारायण करण्याची किमया गुरु करतात. जीवनात सद्गुरुंची भेट हा त्या व्यक्तीच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण ठरतो. हजारो वर्षांपासून ही गुरुपरंपरा आजतागायत अव्याहत सुरु आहे. याची जाणीव कलीच्या प्रभावाने होत नाही. हा कली ओळखावा कसा? आणि त्यापासून आत्मसंरक्षण कसे करावे याचे यथार्थ मार्गदर्शन आणि मार्गदर्शनाप्रमाणे आचरण करण्याचे सामर्थ्य केवळ गुरुचऱणीच प्राप्त होईल. आधी ज्ञान मग विज्ञान अशी वस्तुस्तिथी ही फार अनादि कालापासून अव्याहत आहे. अर्थातच ही *अतिप्राचीन गुरुपरंपरा  ज्ञानोपासनेवर* आधारलेली आहे. ज्ञान,त्याग वैराग्य हे या परंपरेचे मूळ वैशिष्ट्य! 
खरं पाहिलं तर अज्ञान,असत्य आणि अंधार ह्या अस्तित्वहीन गोष्टी ! कारण यांना स्वतःचं स्वतंत्र अस्तित्वंच नाही! एखाद्या अंधःकारमय खोलीत दीप प्रज्वलित केला की अंधार आपोआप दूर होतो,सत्य कळल्यावर असत्याचा आपोआप नाश होतो तद्वत ज्ञान झाले की अज्ञानाचा नाश आपोआप होतो. अंधार,अज्ञान व असत़्य यांना दूर करण्याच्या वेगळ्या प्रक्रिया नाहीत! 
त्यामुळे *शिष्याचे सर्वप्रकारे अज्ञान दूर करुन त्याला आत्मोन्नतीच्या मार्गाला लावण्याचे कार्य* ही *गुरुपरंपरा* करत आली आहे. *मनुष्य ही निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती!त्याला *मन,बुद्धी,वाचा आणि विवेक* दिला आहे.ज्यामुळे तो *इतर प्राण्यांपेक्षा वेगळा* ठरतो.तरीही तो हळू हळू शिकणारा प्राणी आहे. षड्रिपू (काम,क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सर) हे त्याच्या देहासोबतच येतात. त्यामुळे तो अज्ञानाच्या अंधारात चाचपडत राहतो.मायामय अशा या जगात सत्ता,संपत्ती,खोटी प्रसिद्धी,शारीरिक सुखासिनता यांनाच तो सर्वस्व मानू लागतो. या सर्वातून मार्ग दाखविण्यासाठीच व हे शाश्वत सुख नसून मधूर सुखाच्या यातना आहेत याचा अनुभव देण्यासाठी परमेश्वर स्वतः "गुरुस्वरुपात" अवतार घेतो. 
"शिवं ज्ञानोपदेष्टारं विष्णूं धर्मोपदेशकं विधी वेदप्रवक्तारं। अशी त्रैमूर्तींची परंपरा आहे. म्हणून गुरु हे ब्रह्मा विष्णू व महेश्वर स्वरुपी मानले जातात! या तीनही देवतांची शक्ती गुरुंच्या ठिकाणी एकवटलेली आहे म्हणून देवतांच्याही आधी श्रीगुरुंना वंदन करण्याचे महत्वं आहे.
गुरु गोविंद दोऊ खडे काके लागुं पांय।
बलिहारी गुरु आपने, गोविंद दियो बताय ।। असं कबीरांनी सार्थ वर्णिलं आहे.
खुद्द भगवंतानेच या परंपरेचा आदर्श घालून दिला आहे. श्रीराम अवतारात त्याने महर्षी वसिष्ठांना गुरु केलं तर भगवान श्रीकृष्णावतारात त्याने महर्षी सांदीपनींना गुरु केलं आणि या परंपरेचं महत्वं स्वतः आचरणातून या भूमीत रुजवलं.ही परंपरा कुचकामी विचारांवर आधारलेली नाही. आजकाल समाजात दांभिक गुरुंचे पीक आलेले दिसते. हे लोक सामान्य माणसाच्या अज्ञानाचा किंबहूना भाबड्या श्रद्धेचा फायदा घेऊन त्यांना लुबाडताना दिसतात. पण खरे गुरुस्वरुप हे कधीही नश्वर गोष्टींची अपेक्षा ठेवत नाहीत. त्यांची या सर्व विषयातील आसक्ती संपल्यामुळेच ते या पदावर पोहोचलेले असतात.
गुरु हे जन्मालाच यावे लागतात.* म्हणूनच अशा गुरुंना वयाच्या दहाव्यावर्षापर्यंत ईश्वरी साक्षात्कार झालेला असतो. त्यामुळे भौतिक सुखांबद्दल ते उदासीन असतात. म्हणूनच ते निःस्पृह आणि त्यागीवृत्तीचे असतात. दयाळू वृत्तीमुळे सर्वच जीवांना समान दृष्टीने ते पाहू शकतात. अर्थातच जातीभेद, वर्णभेद व धर्मभेद अशा गुरुंच्या ठिकाणी दिसत नाही.*(*समाजातील अवतारी पुरुष, सत्पुरुष तसेच संत ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे अधिकारी व्यक्तींना कोणतेही व्यंग नसते व ते कधीही प्रसिद्धीच्या मागे नसतात* - परमपूज्य श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराज {अमृतकण क्रमांक-२०३, पृष्ठ क्रमांक-६, दि-१५/१२/१९९६})
परंपरेतील गुरुंचे आणखी एक विशिष्ट्य म्हणजे ते आपल्या शिष्यांनामार्गी लावून सोडून देत नाहीत तर त्यांच्याकडून कर्तव्य करुन घेतात.अशा प्रकारच्या मार्गदर्शनामुळे भक्त अध्यात्म आचरणातून श्रेयसाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतो. व जीवन गुरुसेवेत व्यतीत करण्यातच धन्यता मानतो आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने यावर चिंतन जरुर व्हावे. आपणास जीवनात सद्गुरुंचा लाभ झाला आहे काय? झाला असल्यास त्याचा आपणांस आजवर काय फायदा झाला? गुरु हे परीसासारखे असतात. सत्संगतीत येणा-या प्रत्येकाचे ते सुवर्ण करतच असतात. पण आपले सुवर्ण होण्यासाठी आपणही लोखंड असणे गरजेचे असते. आजचे युग हे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे युग आहे. माहिती ही सहज कुठेही उपलब्ध होऊ शकते. ती कुणीही कधीही,कुठेही,कुणालाही देऊ शकतो.पण ज्ञानाचे तसे नाही. ते अनुभवातूनच प्राप्त होईल. आणि कोणतीही कृत्रिम साधने ही ज्ञान देण्यास असमर्थ आहेत.त्यामुळे खरे ज्ञान जर कुठे प्राप्त होईल तर ते केवळ श्रीगुरुंच्या चरणीच!. भारत हा ज्ञानोपासनेचा देव्हारा आहे. याच्या गाभा-यात अखंड तेजोमय असणा-या गुरुमूर्तीची प्रत्येक भारतीयाच्या हृदयात प्रतिष्ठापना झाल्यासच हा देश तरुन जाईल.

।। श्रीगुरुदेव दत्त ।।
-“श्रीरामकृष्ण”चरणरज
९७६३७७६३३९

Saturday, 9 July 2016

*कर्णपिशाच्चाची बाधा*


रविवारच्या रात्रीचा तो प्रसंग ! वेळ साधारण रात्री १०:३० / १०:४५ ची. भावाला सोडायला एस.टी स्टँडवर गेलो होतो. आरक्षण केलेेले प्रवासी सोडले तर फारशी वर्दळ नव्हती. गाडीला अजून १०-१५ मिनीटांचा अवधी बाकी होता म्हणून वाट पहात थांबलो होतो. आणि समोरुन एक २०-२२ वर्षांचा तरुण स्वतःशीच बडबडत आमच्या समोरुन गेला. प्राथमिक अवस्थेत डोक्यावरुन घातलेली कानटोपी,ब्रँडेड टी शर्ट तशीच पँट! खांद्यावर दोन्हीबाजूंनी अडकवलेली सॅक आणि चांगल्या कंपनीचे शूज यातलं सर्वकाही तो चांगल्या घरातला असल्याचे सांगत होते. मनातले प्रश्न अजून तेव्हा वाढले जेव्हा हा तरुण हातवारे करुन जोरजोरात बोलू लागला! त्याचे हात जोडणे, समोर कुणीच नसताना सुद्धा व्यक्ती समोर असल्याप्रमाणेच तो बोलत होता.वेळ रात्रीची असल्याने मला भलतीच शंका आली. ह्याला कसली बाधा तर झाली नसेल ना? थोड्यावेळानंतर तो अचानक शांत झाला आणि डोक्याला हात लावून खाली बसला! आणि सगळा प्रकार लक्षात आला!
अत्याधुनिक असा मोबाईल आणि ब्लू टूथ हेडफोनवर त्याच्या गर्लफ्रेंडशी तो गप्पा मारत होता. तो घरी आल्यावर त्याची गर्लफ्रेंड त्याला डीच करुन दुस-या सोबत फिरायला गेल्याची खबर त्याला लागली होती. खोट्या वागण्याची चीड सोडाच पण उलट तिला सॉरी वगैरे म्हणून मनधरणी करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु होते आणि सरतेशेवटी सर्व प्रयत्न थकल्यावर ही स्वारी एस.टी स्टँडवर शून्यात नजर लावून खाली बसली.
हा प्रसंग काल्पनिक मुळीच नाही ! आपणा सर्वांच्या पाहण्यात कमीजास्ती प्रमाणात असे प्रकार दैनंदिन पाहण्यात येतात. आणि प्रश्न पडतो! माणूस मोबाईलसाठी की मोबाईल माणसासाठी?
सुरुवातीला जेव्हा मोबाईल आला तेव्हा त्याचा वापर पेपरवेट म्हणूनही केला जात असे. केवळ प्रवासात वा अत्यावश्यक प्रसंगी व्यक्तीच्या त्वरीत संपर्कासाठी म्हणून ही यंत्रणा बाजारात उतरवली गेली.  FM, त्यानंतर MP3 Player, पुढे VDO player असे करत करत आज कॅमेरा,टीव्ही,इंटरनेट व छोटा संगणक अशी त्याची रुपे बदलत हे मायावी कर्णपिशाच्च बहुतांशी जनांच्या कानाचा,डोळ्यांचा आणि बोटांचा ताबा घेऊन बसले आहे. त्यातल्या त्यात *शारीरिक व मानसिकदृष्टीने अपरिपक्व असे विद्यार्थी* हे याच्या मायेने लवकर बाधित होतात. आपल्या शाळेत अथवा महाविद्यालयात जाणा-या पाल्यात काही बदल वा समस्या जाणवतायत का पहा-
*१)चिडचीडेपणा वाढवलाय!२)विनाकारण साध्या साध्या गोष्टीत सुद्धा पटकन राग येतोय!३) उलट उत्तरे देण्याचे वा पटकन प्रतिक्रिया देण्याचे प्रमाण वाढले आहे ४) आत्मविश्वास कमी जास्त होतोय!५) अभ्यासात एकाग्रता होत नाही ५)एकाजागी जास्तवेळ बसण्याची क्षमता नाही ६) अभ्यास लक्षात राहत नाहीये ७) किंवा परीक्षेत पेपरच्या वेळी विस्मरण होतेय ८) निर्णय घेता येत नाही ९) तुलना वाढली आहे. १०) एकलकोंडेपणा वाढला आहे ११) आत्मकेंद्रीपणा वाढला आहे १२) रागावर ताबा राहत नाही १३) थोडक्यात सांगायच्या गोष्टींना अवास्तव लांबण लावून सांगायची सवय लागली आहे. १४) नकार पचवता येत नाही. १५)रात्री अपरात्री झोपेतून जाग येणे*
अशा एक ना अनेक समस्या केवळ मोबाईल,त्यावरील अॅप्लिकेशन्स आणि मोबाईल गेम मुळे उद्भवत आहेत. आणि ही गोष्टच कुणाच्या लक्षात येत नाहीये. दिसत नसल्यातरी या मोबाईलच्या लहरी मेंदूवर,मनावर आणि शरीरावर परिणाम करत आहेत. रात्री त़्या जास्त तीव्र असतात. त्यामुळे रात्री मोबाईल जवळ घेऊन झोपणा-यांच्या मेंदूचं रात्रभर काय होत असेल? याचा कधी तरी विचार करा!!
वॉटसअप/ हाईक यांसारखी चॅटिंग एप्लिकेशन मुलांमधे विकसित होत असलेल्या संप्रेरकांवर परिणाम करतात. यामुळेच स्मरणशक्ती,निर्णय क्षमता, संयमीवृत्ती यांसाठी आवश्यक असणा-या *संप्रेरकांची वाढ नीट होत नाही* मग वरील पैकी अनेक समस्या भेडसावू लागतात. पूर्वी पत्र पाठवल्यानंतर त्याच्या उत्तरांची वाट पाहण्यातही वेगळी मजा असायची. किंवा सुटीत भेटल्यावर सगळ्या आठवणी एकमेकांना सांगण्यात रात्रीच्या रात्री गप्पांमधे रंगायच्या! सगळं कुटूंब एकत्र गप्पा मारायचं. यातून संयम यायचा,धीर धरणे आणि वाट पाहणं व्हायचं!हे जरी बदललं असलं तरी *पटकन उत्तराची अपेक्षा ! उत्तर न दिल्यास रिप्लाय का दिला नाही म्हणून राग! चटकन रिअॅक्ट होणे! यागोष्टींची सवय या चॅटिंग अॅपमधून मेंदूला लागते व हीच सवय तो इतर ठिकाणी वापरतो आणि सुरुवात होते नवनवीन समस्यांना!*
मोबाईल गेम हे सर्वात घातक अस्त्र ! तरुणपीढी ही *हिंसक, आक्रमक, आत्मकेंद्री आणि अतिरेकी उतावीळ बनवण्यात या गेमनी मोलाची भूमिका बजावली आहे. ज्या वयात सामंजसपणा,वीरवृत्ती,संयम, देशभक्ती, मैत्री* या भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजवायच्या त्या वयात हिंसा करणे,बंदूक चालविणे,बॉम्ब स्फोट करणे,इमारती उध्वस्त करणे, ट्रॅफिकचे नियम तोडणे, बेभान होऊन वेगाने गाडी चालविणे अशा सवयी मेंदूला या गेम मधून लागतात. आणि याच सवयी आयुष्यभर कायम राहतात. म्हणजेच वेळ, पैसा तर जातोच शिवाय स्मरणशक्ती आणि संस्कारांचा सर्वनाश होतो.
चिकित्सा,जिज्ञासा तसेच संशोधकवृत्ती ज्या शालेय जीवनात रुजायला हवी ती नष्ट होऊन जाते. मेंदूला हिंसक व बेकायदेशीर वागण्याच्या सवयी लागल्यामुळे मनुष्य बेभान होऊन वागू लागतो. *चॅटिंग अॅपमुळे मुलामुलींना प्रत्यक्ष विचारायला भिती वाटते त्या या संपर्क माध्यमांचा पडदा करुन विचारल्या जातात.* मग नको त्या वयात नको त्या विचारांना खतपाणी मिळते. या गोष्टी हळूहळू उग्ररुप धारण करतात. याची फलश्रुती म्हणून लहानवयातील प्रेमप्रकरणे वाढीस लागतात. मग एकदा ह्या गोष्टीत रमलेले मन अभ्यासाकडे वळेलच कसे? शालेय विषयांबद्दल चिकित्सा जागृत होईलच कशी?
प्रत्येक मनुष्य हा स्वतंत्र जन्माला आलेला आहे. तरीही एकमेकांसारखे दिसण्याची व एकमेकांसारख्या गोष्टी मिळवण्यातच सुख मानताना तुलना सुरु होते. माझ्या मित्राकडे/मैत्रिणीकडे आहे तशीच वस्तु मला हवी असा हट्ट सुरु होतो. ह्यातून जीवघेणी स्पर्धा वाढत जाते. पराजय पचवता येत नाही. पण *ज्याची स्पर्धा स्वतःशी असते त्याला हरविणारा कोणीही नसतो.* स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्वं बनवाव! त्यासाठी नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्यात ! भरपूर चांगल्या पुस्तकांच्या वाचनाने या गोष्टी साध्य होतात. पण "" कर्णपिशाच्चाची" बाधा झालेल्यांना ह्या गोष्टी पटतीलच कशा? 
अध्ययनात एकाग्रता यावी,शरीरात चपळपणा,काटकपणा यावा, खिलाडूवृत्ती यावी याकरिता दररोज किमान थोडी ध्यानधारणा,थोडा व्यायाम आणि मैदानीखेळ हे आवश्यकच आहे!
मोबाईल वाईट आहे असं मुळीच नाही! *चाकू हा भाजी चिरण्यासाठी,ऑपरेशन करुन प्राण वाचविण्यासाठी व खून करुन एखाद्याचे प्राण घेण्यासाठी सुद्धा वापरतात. फरक असतो तो वापरातील उद्देशाचा!*
*यंत्राला विवेक नसतो,बुद्धी नसते,मन नसतं! कितीही स्मार्ट असेल तर निर्णय क्षमता नसते याचं भान ठेवण क्रमप्राप्त आहे!*
विचार करा! पटलं तर कृती करा! आणि आपल्या अमूल्य प्रॉपर्टी असलेल्या पाल्याचे / मित्रांचे/ नातेवाईकांचे जीवन उद्धस्त होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करा!
आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा !
©अमेय दीपक कानडे- 9763776339