Sunday, 8 October 2017

मना सज्जना भक्तीपंथेची जावे....

श्लोक क्र २ 

मना सज्जना भक्तिपंथेचि जावे | तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ||
जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे | जनी वंद्य ते सर्व भावे करावे ||२||

 मना सज्जना भक्तिपंथेचि जावे-  हे सज्जन मना! असं मनाला उद्देशून म्हटलं आहे समर्थांनी! समर्थ रामदास हे मानसशास्त्राचे जाणते आहेत. ते मानवी मनाला उत्तम प्रकारे ओळखतात. त्यांना माहितेय की मन हे अतिशय चंचल आहे, खोडकर आहे, आळशी आहे, विकारांकडे धाव घेणारं आहे असे अनेक दूर्गुण मनाला चिकटलेले आहेत तरीही समर्थ त्याला सज्जन का बरं म्हणत असतील बरं ? याचा विचार केल्यावर असं जाणवलं की वर्गात खोड्या करणारा एखादा विद्यार्थी समजवण्यासाठी किंवा त्याच समूपदेशन करण्यासाठी आणला जातो तेव्हा उत्तम शिक्षक त्याला पहिल्याच वाक्यात आपलंस करुन घेतो. ते म्हणजे -"तु इतका चांगला मुलगा आहेस आणि असा का वागतोस?" इथं त्या मुलाला जाणिव करुन दिली जाते की तु चांगला आहेस आणि तु चांगलं वागू शकतोस. अशा बोलण्याने त्या मुलालाही आपण पण चांगलेच आहोत असा विश्वास वाटून पुढे केला जाणारा उपदेश स्वीकारायला त्याचं मन तयार होतं. ज्ञानेश्वरांनी सुद्धा "तया सत्कर्मी रती वाढो" असं म्हटलं आहे. रती रुजो असं मूळीच म्हटलेलं नाही. कारण प्रत्येकाला चांगल्या कामाची मू आवड असतेच फक्त वाईट गोष्टींकडचा ओढा कमी होऊन,चांगल्या गोष्टींकडचा कल *वाढला* की प्रत्येक व्यक्ती ही सज्जन आहे आणि माऊलींना अशा व्यक्ती स्वीकार्य आहेत.
अगदी हीच मेख समर्थांनी ओळखली! आणि मनाला सांगितलंय की तू अतिशय सज्जनच आहेस तुला भक्तीच्या पंथाने म्हणजे भक्ती मार्गानेच जायचे आहे. भक्तीमार्गच का? तर ही भगवंताकडे जाण्याची पायवाट आहे. पायवाटेने मनुष्य लवकर आपल्या इप्सित ठिकाणी पोहोचतो. कलीयुगात बाकीच्या मार्गांपेक्षा भक्तीमार्ग हा सहज सोपा आहे. तो कुणालाही आचरता येण्यासारखा आहे. तो मार्ग कसा आचरता येईल? तर ते ही उत्तर आहे.
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ।
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ।।
(श्रवण, कीर्तन, भगवंतांचे स्मरण, चरणसेवा, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि
आत्मनिवेदन)
अशी ९ प्रकारची भक्ती गीतेत सांगितली आहे. भगवंताने भक्तीमार्गात सुद्धा विविधता उपलब्ध करुन दिली आहे. तुम्हाला हवं ते, आवडेल ते, जमेल ते साधन निवडा!  ज्याला ज्या पद्धतीने शक्य होईल ते त्याने करावे!

१)श्रवण भक्ती- मनुष्याला अशी अवस्था नक्की येते फक्त तिचा काळ प्रत्येकाच्या बाबतीत भिन्न असतो. त्यावेळी बाकी सर्व गोष्टींचा कंटाळा आलेला असतो. आणि केवळ भगवंतांचे गुणवर्णन श्रवण करणेच कानाला गोड वाटू लागते. राजा परीक्षित याचे उत्तम उदाहरण आहे. कलीने ग्रासलेला मुकूट धारण करुन वनात शिकारीसाठी गेल्यावर तहानेने व्याकूळ होऊन एका आश्रमात पोहोचला. पण ऋषींनी ध्यानस्थ ऋषींनी पाणीसुद्धा विचारले नाही म्हणून त्यांच्या गळ्यात मेलेला साप टाकणारा राजा परीक्षित शुकदेव जेव्हा त्याला भागवत कथा सांगत होते तेव्हा ८ दिवस पाण्याचा एकही थेंब न घेता तल्लीन होऊन श्रवण करीत होता. आठव्या दिवशी शुकदेव जेव्हा कथा संपवून निघून गेले तेव्हा कथेच्या वियोगात त्याचे प्राण पंचत्वात विलीन झाले. असा हा श्रवण भक्तीचा महिमा. उच्चारण करणे शक्य नसेल तर भगवंताच्या लीला आणि त्यांचे गुणवर्णन ऐकणे हा सुद्धा भक्तीचाच प्रकार आहे. आणि हा देखील भगवंताला आवडतो.

२)कीर्तन- हा नवविधा भक्तीतील दुसरा प्रकार आहे. भगवंत लवकर संतुष्ट कशाने होतो तर तो भक्तीने त्यातही लवकरात लवकर कशाने तर कीर्तनाने! याच कीर्तनाच्या जोरावर तुकोबा सदेह वैकूंठाला गेले.
फुटो हे मस्तक तुटो हे शरीर। नामाचा गजर सोडु नये ।।
नाशवंत देह झाला जरी भंग। तरी कीर्तनरंग सोडु नये ।।
ह्या भक्तीचा महिमा असा की याच्या द्वारे भगवंतांच्या नामाची गोडी ही आपल्या वाणीला येते. वाचा शुद्ध होते. प्रवाही होते. इतरांच्या हृदयाचा ठाव घेणारी होते. ऐकणाऱ्याला ऐकतच रहावे वाटते. म्हणजे श्रवण भक्ती करणारा आणि कीर्तन भक्ती करणारा दोघेही यात रंगून जातात.आणि मग नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।। अशी अवस्था प्राप्त होते. आपल्याला कीर्तन म्हटल्या बरोब्बर जरी नारदमुनी आठवत असले तरी शुकदेव हे कीर्तन भक्तीचं आदर्श उदाहरण मानले जातात.

३)स्मरण भक्ती- स्मरण म्हणजे सतत भगवंताची आठवण काढणे. याचं सर्वांना माहित असणारं उदाहरण म्हणजे भक्त प्रह्लाद होय. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र त्याचे अस्तित्व मान्य करून प्रत्येक गोष्टीत त्याला पाहणे आणि त्या ठिकाणी त्याचेच स्मरण करणे होय. प्रह्लादाने हेच केलं. कितीही कठीण प्रसंग आले तरी स्मरण सोडलं नाही. ज्यावेळी वैतागून बापानेच विचारलं कुठेय तुझा नारायण? या खांबात आहे का? तेव्हा ज्या आत्मविश्वासाने त्याने उत्तर दिलं ती त्याच्या स्मरण भक्तीची पराकोटीची अवस्था होती. आणि इतकी की त्याच्या भक्तीची लाज राखण्यासाठी भगवंताला खांबातून प्रकट व्हावं लागलं. “भक्ताची लाज राखण्याची भगवंताची जुनी सवय आहे हे वाक्य माझ्या गुरुदेवांनी वारंवार सांगितलं आहे.

४)पाद सेवनम् – आपल्याकडे जी गुरुपरंपरा आहे त्यात चरणांना खूप महत्व आहे. त्यामुळे जिथे गुरूपरंपरा सुरु असते तिथे पादुका स्थापन करण्याची पद्धत आहे. उदा. गाणगापूर, नृसिंहवाडी, अहमदनगर अशा गुरुस्वरुपांच्या  ठिकाणी पादुका स्थापन करून त्यांची पूजा होताना दिसते.
शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसाम् | गुरुपादोदकं सम्यक् संसारार्णवतारकम् ||
( श्रीगुरुचरणतीर्थ पापरूपी चिखल सुकविणारे, ज्ञानदीप अधिक प्रज्वलित करणारे आणि हा संसारसागर तरून नेणारे आहे.)  ह्या चरणांच्या सेवेतच कित्येकांनी धन्यता मानली. भरताने श्रीरामांचे राज्य हे त्याच्या पादुका सिंहासनावर स्थापन करूनच सांभाळले होते. अजून एक गोष्ट जी लक्ष्मी चंचल आहे म्हणणाऱ्या लोकांसाठी. आपण बस मध्ये बसण्यासाठी बसस्थानकावर जातो. रस्त्यावर धावणारी बस कधीच पकडत नाही. तसं लक्ष्मी जिथे स्थिर आहे त्या विष्णूंच्या चरणांशी जाण्याची बुद्धी कशी काय होत नाही? ही आश्चर्याची गोष्ट म्हणावी लागेल. ती विष्णूंची चरणसेवा करण्यात रमलेली आहे. जिथे स्वतः लक्ष्मी स्थित आहे तिथे आपले मन का स्थिर होऊ नये?

५)अर्चन- काया, वाणीने आणि कर्माने पवित्र साधन सामुग्रीने भगवंतांच्या चरणांची पूजा करणे. ध्रुवाच्या वंशातील पृथु राजा या भक्तीचे उदाहरण म्हणून सांगितले जाते. तो अर्चन भक्तीत श्रेष्ठ होता. त्याच्या शासनकाळात प्रजा सुखी आणि समाधानी होती. त्याने अश्वमेध यज्ञ पण केला होता. या यज्ञात घोडा सर्वत्र फिरवला जातो. कुणी अडवला नाही किंवा बांधून ठेवला नाही तर त्याचा बळी यज्ञात देतात. अर्थात घोडा हा वासनेचे प्रतिक आहे. तो कोणत्याही विषय वासनेत अडकला नाही तर तो आत्मरुपात लीन होतो. अडकला तर युद्ध करून तो सोडवावा लागतो.

६)वंदन- अभिवादन शीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः | चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्यायशोबलम् || हा सर्वांना परिचित श्लोक आहे. आपल्या संस्कृतीत देवाची मूर्ती, पादुका, आई-वडील, गुरु, आचरण शुद्ध ब्राह्मण, वयोवृद्ध इत्यादींना वंदन करावे असे संस्कार आहेत. हे देखील भक्तीचेच रूप आहे. या सर्वांमध्ये भगवंतांचा अंश आहे असे मानून ही वंदन भक्ती करावी.

७)दास्य- दास्य भक्ती वर्णन करण्यासाठी एकच नाव पुरेसे ते म्हणजे भक्तश्रेष्ठ हनुमान! भगवंतच आपले स्वामी आहेत. तेच आपला चरितार्थ चालवतात आणि त्यांच्याच प्रेरणेने आणि कृपेने आपण कार्य करतो व ती यशस्वी होतात हा भाव असणं म्हणजे दास्य भक्ती.

८)सख्य- अर्जुन हा या भक्तीचे उदाहरण. भगवंत हा आपला मित्रच आहे असे मानून त्याची भक्ती करणं.

९)आत्मनिवेदन- आपल्या आयुष्यात येणारे सर्व बरे वाईट प्रसंग हे भगवंताला सांगणे म्हणजे आत्मनिवेदन होय. सद्य स्थितीत या भक्तीच्या अभावाने फेसबुक आणि वोट्स अप सारखी माध्यमे जोर धरून आहेत. मनमोकळं करणं ही माणसाची नैसर्गिक सवय आहे. ती संवेदनशीलतेचा एक भाग आहे. पण ती चुकीच्या ठिकाणी व्यक्त होते. आणि मग पुढे अनेक समस्या उभ्या राहतात.

तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे- भक्तावर प्रसन्न होणं हा भगवंताचा स्वभावच आहे. तो त्याच्या भक्तावर हमखास प्रसन्न होईलच. पण त्यासाठी भक्तीची कास धरायला हवी.

जनी निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे- इथे जनी याचा अर्थ जनसामान्य नव्हे. तर जे लोक भगवंताची भक्ती करतात ते लोक होय. त्यांनी ज्याची निंदा केली आहे ते सर्व सोडून द्यावे. त्याज्य मानावे.

जनी वंद्य ते सर्व भावे करावे- आणि ज्याला त्यांनी वंदिले आहे अर्थात ज्याचे कौतुक त्यांनी केले आहे त्या मार्गाचा अवलंब करावा. थोडक्यात संताच्या मार्गानेच जावे.
जर जनी याचा अर्थ सर्व सामान्य लोक असा घेतला तर मात्र अनर्थ होईल. आज समाजात जनी निंद्य ते सर्व भावे करावे आणि जनी वंद्य ते सर्व सोडोनी द्यावे अशी अवस्था पाहायला मिळते.
समर्थ अतिशय चलाखीने मनाला संताच्या मार्गावर आणण्याच्या पर्यटनात आहेत. लहान मुलाला कडू औषध आई कसं गोड बोलून देते तसं. मनाच्या दृष्टीने कडवट असणारं हे नवविधा भक्तीचं औषध! त्याची पहिली मात्रा समर्थांनी व्यवस्थित दिली आहे.  


  ||श्रीरामचंद्रार्पणमस्तु ||   
-“श्रीरामकृष्ण”चरणरज 9763776339


Monday, 2 October 2017

गणाधीश जो ईश

श्लोक १

 गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा । गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥

गणपती हा तिन्ही म्हणजे देव मनुष्य आणि राक्षस यांच्यावर अधिराज्य गाजवणारा. समस्त विघ्नांचा नाश करणारा,आणि सकल कार्य निर्विघ्न करणारा म्हणून ग्रंथारंभी त्याला आवाहन आणि नमन हे अगत्याचे. समर्थ रामभक्त असले तरी प्रघात त्यांनी मोडलेला नाही. कारण तो ओंकार स्वरूप आहे. हे विश्व ओंकारातूनच निर्माण झालेलं आहे. त्यामुळे सगुण साकार आणि निर्गुण निराकार या दोन्हींचा आरंभ तोच आहे. तोच गुरुस्वरुपही आहे.

 नमूं शारदा मूळ चत्वार वाचा । - त्यानंतर वाग्देवता शारदा! शारदा म्हणजे सरस्वती असा एक जनमानसात आहे. पण शारदा म्हणजे सरस्वती नाही. कारण सरस्वतीला हंस किंवा मोर अशी वाहने आहेत. पण शारदेचे कोणतेही वाहन असल्याचे ज्ञात नाही. मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यात मैहर तालुक्यात त्रिकुट पर्वतावर शारदादेवीचे एकुलते एक मंदिर असावे. महाराष्ट्रात शारदेला गणेशाची पत्नी समजतात. म्हणून पुण्यातील मंडईतल्या गणेशोत्सवात गणपतीजवळ शारदेची मूर्ती असते.  शारदा ही वाणीची देवता! वाणी चार प्रकारची आहे. 
१) परा २) पश्यंती ३) मध्यमा आणि ४) वैखरी 
१) परा म्हणजे नाभीतील अव्यक्त वाणी ! 

शब्देवीण संवादू दुजेवीण अनुवादु | हे तव कैसेनि गमे |
परेहि परते बोलणे खुंटले| वैखरी कैसेनि सांगे ||
हा परा वाणीमधला संवाद ज्ञानेश्वरांनी त्यांच्या “कानडा वो विठ्ठलू” या रचनेत सांगितला आहे. ह्या वाणीत संवाद चालतो पण तो शब्दांशिवाय ! लौकीकातील उदाहरणच घ्यायचं झालं तर मनापासून प्रेम असणाऱ्या व्यक्तींच्या हृदयातील नाद हा एकमेकांच्या हृदयात प्रतिध्वनित होत असतो. ते शरीराने कुठेही असोत पण एकमेकांच्या मनाशी अद्वैत स्थापन झाल्याने आपल्या जोडीदाराला नेमकं काय हवंय हे शब्दांच्या माध्यमाशिवाय कळतं. तेच मातेचं बालकाबाबत. ही वाणी म्हणजे परा! भगवंताशी एकरूपता साधलेल्या भक्ताचा संवाद हा या वाणीतूनच होतो.

२) पश्यंती – ही हृदयातून उच्चारली जाणारी वाणी. ही गहन, निर्मल, निष्कपट आणि रहस्यमय असते. सिद्धपुरुष या वाणीतून संवाद साधतात म्हणून त्यांची वाणी ऐकणाऱ्याच्या हृदयाचा ठाव घेते.

३)मध्यमा- बोलण्यापूर्वी काय बोलायचे हा विचार करून या वाणी द्वारे संवाद साधला जातो. कोणत्याही प्रश्नाचे अथवा समस्येचे समाधान यावर विचार करून दिलेली प्रतिक्रिया ही या वाणीत असते.

४)वैखरी- ही आपल्या दैनंदिन संवादाची भाषा. कोणताही विचार न करता सहज बोलली जाणारी ही वाणी. 

गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ - गमू म्हणजे अनुसरुया. या सर्वांना वंदन करून मग आपण आपल्या “ राघवाच्या मार्गावरून मार्गक्रमण सुरु करूया” माझ्या गुरुदेवांनी मार्गदर्शन करताना एकेठिकाणी असं सांगितलं आहे की कलियुगात चिंतन हे भगवान श्रीकृष्णांचे आणि आचरण श्रीरामांचे करावे. कलीचा त्रास बहुतांशी कमी होतो. श्रीराम हे मर्यादापुरुषोत्तम! एक वचनी! एक पत्नी ! एका बाणात सर्वस्व संपवण्याचे सामर्थ्य असणारे! त्यांचे चरित्र अगदी सरळ आहे. कृष्णाचे त्यामानाने गुंतागुंतीचे. जितके समजून घ्यावे तितके अधिक व्यापक होत जाणारे ! आणि सध्याची समाजाची बौद्धिक पातळी पाहता त्यांच्या कृतीचा अभ्यास करणे आणि त्या कृतीचा योग्य अर्थ लावणे सहज शक्य नाही. 
समर्थ रामदास हे श्रीराम भक्तच होते. संपूर्ण आयुष्य त्यांनी रामाचीच भक्ती केली, रामाचेच गोडवे गायले आहेत. समर्थांचे दाखले आपल्याला हळूहळू एकेका श्लोकातून उलगडत जातीलच. 

||श्रीरामचंद्रार्पणमस्तु ||   
-“श्रीरामकृष्ण”चरणरज 9763776339
मना सज्जना

|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः |
गुरुःसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ||

ज्यांच्या कृपेने शब्दांना सामर्थ्य प्राप्त होतं, ज्यांच्या कृपेनेच लेखनाची प्रेरणा होते असे माझे सद्गुरू परमपूज्य श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराज यांना वंदन करून ह्या नवीन उपक्रमाला प्रारंभ करीत आहे.
चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम् |

 तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ||  श्रीमद्भगवद्गीता अध्याय ६ श्लोक ३४

अर्जुनाने श्रीकृष्णाला अत्यंत कळकळीने आपली व्यथा सांगितली जी आपणा सर्वांचीच आहे. हे कृष्णा! मन हे अत्यंत चंचल, उच्छृंखलहटवादी आणि बलवान आहे. त्याला वश करणे हे वाऱ्याला वश करण्यापेक्षा कठीण काम वाटते. थोडक्यात कळतंय पण वळत नाही अशी स्थिती. समर्थ रामदास हे उत्तम मानसोपचार तज्ज्ञ होते म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांनी मानवी मनाची स्थिती बरोब्बर ओळखली आणि त्याला एकदा सवय लावली की बाकी गोष्टी आपोआप सुरळीत होतात हे तत्त्व जाणले आणि मुळावरच घाव घातला.
मन हे अतिशय चंचल असल्याने त्याला अनेक प्रयत्नांती स्थिर करावे लागते. उधळलेल्या घोड्याला ताब्यात आणण्यापेक्षा महाभयंकर प्रयत्न याला ताब्यात ठेवण्यासाठी करावे लागतात. यावरच रामबाण उपाय म्हणजे “एखादी गोष्ट मनाला परत परत सांगणे” जाहिरातवाले हेच तंत्र वापरतात. जी वस्तू विकायची त्याची किंवा जे गाणे लोकप्रिय करायचे त्याची टेप सारखी सारखी लोकांच्या कानीकपाळी वाजवायची म्हणजे ती लोकांना खरी वाटते.
समर्थांनी नेमकी हीच मेख ओळखली होती. बलोपासना तर महत्वाची आहेच पण ही बलोपासना तेव्हाच कामास येईल जेव्हा त्यापाठीशी अत्यंत बलिष्ठ मन उभं असेल. थोडक्यात हार्डवेअर कितीही भक्कम असो सॉफ्टवेअर सुद्धा तितकच कार्यक्षम हवं तेव्हा कार्य सुरळीत चालेल. “मनाची धाव विकारांकडे तर बुद्धीची धाव ही विकासाकडे असते, त्यामुळे मनावर बुद्धीने नियंत्रण ठेवावे लागते” असं माझ्या गुरुदेवांनी सुद्धा वारंवार मार्गदर्शन केलं आहे. पण अध्यात्मात प्रगती करण्यासाठी मन स्थिर करणं जास्त महत्वाचं असतं. जरी ते विकारांकडे धावत असेल तरी त्याला तिथून ओढून आणून विकासाच्या मार्गाला लावावे लागते. हे प्रयत्न पुन्हा पुन्हा करावे लागतात. चांगल्या सवयी या लावाव्या लागतात. वाईट आपोआप लागतात. शिव्या आणि ओव्या यांच्यातील अक्षरे तीच असतात. मात्र ओव्या वारंवार घोकून पाठ कराव्या लागतात तर शिव्या मात्र एकपाठी शिष्याप्रमाणे तत्क्षणी स्मरणात राहतात. एवढा विचार कधी कुणी केला असेल की नाही ही देखील स्वतंत्र विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
मनाचे श्लोक हे आपणास यावर मात करण्यासाठी उत्तम औषध आहे. शरीर निरोगी रहाव, स्वच्छ राहावं म्हणून नित्य स्नानाची पद्धत आपल्याकडे आहे. शरीर सुंदर दिसव म्हणून त्याला विविध प्रकारे सजवण्याची साधने उपलब्ध आहेत. तसेच आजारी शरीराचा रोग बरा करणारी किंवा रोग होऊच नये म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधे आहेत. पण मन स्वच्छ राहावं, निरोगी राहावं, त्यात शुद्ध विचार असावेत यासाठी कुणी प्रयत्न करताना दिसत नाही किंबहुना मनाच्या स्वच्छतेकडे कुणाचं लक्षच नसतं. मनाचे श्लोक हे कार्य उत्तम पार पाडतात. मनाला एकप्रकारे सूचना देण्याचं काम हे श्लोक करतात. बालपणीच बोबड्या बोलांना हे श्लोक शिकवायची पद्धत होती. आताचे बोबडे बोल काय बोलतात हे न बोललेलं बरं. मनाचे श्लोक हा मनावरील एक संस्कार आहे. तो मनावर आणि वाणीवर उत्तम संस्कार करतो. काय बोलावे, काय बोलू नये याचा विवेक या श्लोकांनी येतो. तोंडातून वाईट शब्द बाहेर पडला की १० मनाचे श्लोक म्हणायला लावायचे हीच शिक्षा होती. आजकाल शाळांमध्ये थोडेसे कान उघडे ठेवले तर विद्यार्थ्याला दिवसभर मनाचे श्लोक म्हणायला लावावे लागतील इतकी परिस्थिती खालावली आहे. या परिस्थितीत तरणोपाय म्हणजे एकच “मनाचे श्लोक”
यातील श्लोकांचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न यथाशक्ती करणार आहे. यातील काही उणीवा असतील त्या मानवी मर्यादेमुळे माझ्या असतील पण जे मनाला भावेल ती सद्गुरू कृपा असेल.

|| श्रीरामचंद्रार्पणमस्तु ||   
- “श्रीरामकृष्ण”चरणरज 9763776339

Thursday, 27 October 2016

कर्णाचे उदात्तीकरण आणि वास्तव


वाईट गोष्टींचे उदात्तीकरण करायचे आणि ती प्रथा म्हणून रूढ करायची हा आता जणू प्रघातच पडलाय.. “सारी नाईट बेशर्मी की हाईट”, “बेबी डॉल मै..” ही सध्या तरुणाईच्या ओठांवरची फेमस गाणी... ज्या गोष्टीच्या नैतिकतेवर संस्कृती आधारलेली आहे त्याच गोष्टी देशोधडीला लावून.. चार उघडे नागडे सीन दाखवून कामुकता कसली वाढवता? वैचारिक संक्रमांच्या काळात “विवेकानंदांच्या राष्ट्रप्रेमी, अध्यात्मिक विचारांची बैठक जिथे हवी त्या बैठकीत सनी लिओन नाचते ती ही विवस्त्र? म्हणजे हे तर द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वर झालं.. आणि हे आज नाही फार पूर्वी पासून चालत आलंय.. खलापात्रांचे उदात्तीकरण करा इतिहासाच्या विरुद्ध मतप्रवाह तयार करणाऱ्या कादंबऱ्या लिहा आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवा ही जणू प्रथाच पडत चाललीय..
                      आज जरा कर्णा विषयी बोलूया.. उदात्तीकरण केलेल्या आणि बहुतेक तरुण वाचक वर्गामध्ये अत्यंत सहानुभूती असलेला,अतोनात अन्याय सहन केलेला माणूस म्हणजे “कर्ण“! अत्यंत बेजाबदारपणे, अत्यंत खोट्या पद्धतीने कर्णाचा शूरपणा रंगवण्यात आला आहे..तो अर्जुनापेक्षा शूर होता हे खोटंच रंगवण्यात आलंय.. कर्ण किती भित्रा आणि पळपुटा होता त्याचे काही संदर्भ देत आहे जरूर वाचावेत आणि प्रतिक्रिया द्याव्यात. सदर प्रसंग मूळ महाभारतातले आहेत.. कोणतीही तिरकस प्रतिक्रिया देण्याआधी एकदा महाभारत जरूर वाचून पहावे..
प्रसंग १) “द्रोणाचार्यांना गुरूदक्षिणा”.. द्रोणाचार्यांचा पूर्वी द्रुपद राजाच्या राजसभेत अपमान झालेला होता. भर राजसभेत-“अरे भिकारड्या चालायला लाग फार तर तुला आज रात्रीच जेवण देईन..बाकी काही इथे मिळणार नाही” अशा शब्दात अवहेलना करून हाकलून दिले होते. तेव्हा गुरुदक्षिणा म्हणून कौरव आणि पांडवांना द्रुपदाला बंदी करून समोर आणण्याची आज्ञा केली.पांडवांचे श्रेय लाटण्यासाठी कौरवांनी द्रुपदावर चाल प्रथम केली.. तेव्हा शकुनी, इतर कौरवांसह दुर्योधनाचा आणि कर्णाचा दारुण पराभव द्रुपदाने केला
प्रसंग २) द्रौपदी स्वयंवर –“मी सुतपुत्राला वरणार नाही” असं द्रौपदीचं विधान महाभारतात कुठेही नाही...स्वयंवर मांडले असल्याने नाकारण्याचा तिला हक्कच नव्हता..जो पण जिंकेल त्याच्या गळ्यात वरमाला घालावी लागणार होती...कर्णाने प्रयत्न केला पण त्याला लक्ष्यभेद करता आला नाही म्हणून तो संतापून जागेवर जाऊन बसला. संदर्भ- भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळाने काढलेल्या शुद्धीत महाभारतात (१७८,१७९ अध्याय)
प्रसंग ३-“घोषयात्रा” पांडव वनवासात असताना त्यांची चेष्टा करुया, आपले वैभव दाखवूया म्हणून कौरव  गेले आणि चित्ररथ गंधर्वाच्या तावडीत सापडले. त्याच्याशी झालेल्या युद्धात सर्वजण पराभूत झाले..पळून गेले. चित्ररथाने दुर्योधनाला पकडले..त्यावेळी गंधर्वाने चोपला म्हणून दुर्योधनाला सोडून कर्ण पळून गेला..हे भीमाला समजलं तेव्हा भीम म्हणाला जाऊ दे आयता कट निघाला तेव्हा नंतर युधिष्ठिराच्या आज्ञा मानून( आज्ञा-आपल्यात भांडताना आपण ५ ते १०० पण परक्यांशी भांडताना आपण १०५आहोत ) तेव्हा भीम आणि अर्जुनाने चित्ररथाचा सहज पराभव केला..त्याला जीवदान दिले. त्यावेळी कृतज्ञता म्हणून गंधर्वाने चाक्षुष्मती विद्या आपणाहून अर्जुनाला दिली.
प्रसंग ४- उत्तर गोरहण –विरत राजाच्या गाई कौरवांनी पळवल्या.. त्यावेळी पांडवांचा वनवास नुकताच संपला होता. विराटाचा पुत्र .उत्तर बायकांमध्ये बडबडला “कोण उन्मत्त आहे त्याला पाहतोच मी? असं म्हणून निघाला पण त्याला सारथी नव्हता. तेव्हा कंकाच्या वेशात असणऱ्या युधिष्ठिराने बृहन्नडा वेशातील अर्जुनाला सारथी म्हणून पाठवले..कौरवांची सेना पाहून उत्तर पळून जाऊ लागला तेव्हा अर्जुनाने पकडून त्याला सारथ्य करायला लावले व स्वतः लढला भीष्म द्रोण दुर्योधन,कर्ण ह्या सगळ्यांना पराभूत केलं..अक्षरशःसर्वजण पळून गेले. वरच्या सर्व प्रसंगात अर्जुनाने कृष्णाच्या मदतीशिवाय कर्ण व इतरांचा पराभव केला होता. हे आवर्जून सांगाव वाटतं. इतकं सगळं स्पष्ट असूनही करणा बद्दल खोटा इतिहास का रंगवला जातो त्याचा सुगावा काही केल्या लागत नाही. महर्षी व्यासांची वाक्ये कशी खोटी मानावीत.? “अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे विचारांचा स्वैराचार नाही “ आपल्या प्रतिभा पणाला लावताना तरुण पिढ्या ह्या नको त्या व्यक्तींना आपला आदर्श मानणार नाहीत. ह्याची खबरदारी नवोदित लेखकांनी घ्यावी. कर्णप्रमाणेच अजून बरीच पात्रे माझ्या रडारवर आहेत. यथावकाश समाचार घेईनच... आता सद्यस्थितीत दिलेल्या खऱ्या गोष्टींना खरे मानून आधीची भासमान प्रतिमा पुसण्याचे औदार्य कितीजण दाखवतील? हा “सूर्य आणि हा जयद्रथ” इतकं हे स्पष्ट आहे..
विनंती इतकीच की काल्पनिक कथा कादंबऱ्यांवर विश्वास ठेवण्याआधी आपण वाचत आहोत ते कितपत खर आहे हे मूळ ग्रंथ उघडून निश्चित खात्री करून पहावं आणि मग आपलं मत बनवावं..
आपल्या प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

Monday, 18 July 2016

।। तस्मै श्री गुरवे नमः ।।

।।श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू: गुरुर्देवो महेश्वर:।
गुरु:साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ।।

हा सर्वज्ञात, सुपरीचित आणि बहूतेक मुखोद्गत असा श्लोक! पण गुरुपरंपरा हा कदाचित नवपरिचित अथवा प्रथमच वाचनी आलेला शब्द असू शकेल. या श्लोकाचा आणि या शब्दाचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे,याची कल्पना फार कमी जणांना असेल. जे या परंपरेशी निगडीत आहेत. त्यांच्या दृष्टीने हा परिचयाचा असू शकतो.परंतु *एकेकाळी समग्र जीवन व्यापलेल्या आणि केवळ आयुष्य नव्हे तर मनुष्य जन्मात अत्यंत महत्वाचे असलेले गुरुस्थान आणि त्यांची अव्याहत सुरु असणारी गुरुपरंपरा* याचा समाजास विसर पडलेला दिसतो.
आज व्यासपौर्णिमा अर्थातच गुरुपौर्णिमा! गुरुंना वंदन करण्याचा, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस़! पण मूळात गुरुंची गरज काय? दैनंदिन जीवनात गुरु असण्याचा फायदा काय? शाळा,महाविद्यालये आणि इतर अनेक शाखांची शिक्षणे देणा-या अद्ययावत आणि अगणित संस्था असताना तसेच संपर्काची व माहितीचा प्रचंड स्फोट करणारी अत्याधुनिक साधने असताना गुरुंची गरज काय? असा सर्वसामान्य प्रश्न पडणे साहजिकच आहे. नव्हे तो पडलाच पाहिजे. तरच गुरु का असावेत? याचं उत्तर शोधता येईल.
मनुष्य जीवनाला दोन बाजू असतात - एक श्रेयसाची आणि दुसरी प्रेयसाची! श्रेयस् आणि प्रेयस्  हे शब्द जरी नवीन वाटत असले आणि अर्थ जरी उमगत नसला तरीही दैनंदिन जीवन आपण या दोनच गोष्टींसाठी व्यतीत करतो. आणि ह्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी दोन मार्ग आहेत! एक भोगाचा आणि दुसरा त्यागाचा! श्रेयसाची इच्छा करणारे त्यागाचा मार्ग अवलंबतात तर प्रेयसाची इच्छा करणारे भोगाचा मार्ग पत्करतात.भारत ही अध्यात्मप्रधान भूमी! अध्यात्म हाच या भूमीचा आत्मा! ज्ञान आणि त्यातून जन्म घेणारे विज्ञान यांचा समतोल धार्मिक संस्कारात साधून विवेकी जीवन व्यतीत करणा-या लोकांचा हा देश! त्यामुळे ज्ञानोपासना हा या देशवासियांचा मूळ पिंड! कितीही आक्रमणे झाली कितीही पाश्चात्य संस्कृतींचे आक्रमण झाले तरी " श्रेयसाची" कास धरणारा हा समाज आहे.

८४ लक्ष योनींचा प्रवास करुन आत्मा मनुष्यदेहात ठराविक कालावधीसाठी पृथ्वीतलावर येतो. यात त्याला श्रेयसाची आणि प्रेयसाची सांगड घालून मोक्षाकडे वाटचाल करायची असते. म्हणून तो चरितार्थासाठी नोकरी/ व्यवसाय करतो तर वैयक्तिक जीवनात  नित्य उपासना करीत असतो. म्हणजेच एका बाजूला तो अध्यात्म आचरुन श्रेयसाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करत असतो तर चरितार्थाद्वारे इच्छित उपभोग्य वस्तु आणि जीवनावश्यक गरजांची पूर्तता करत असतो. म्हणजेच आता श्रेयस् आणि प्रेयसाची थोडीफार कल्पना आपणास आली असेल.
आपला धर्मच पुनर्जन्माच्या वास्तवतेवर आधारलेला आहे. त्यामुळे *आत्मा* हा नित्य, सनातन आणि शाश्वत आहे हे ओघाने आलेच! हे सत्य नाकारणा-याच्या वाट्याला सुद्धा हे वास्तव येतेच हे वेगळे सांगावयास नको! कारण सूर्य उगवला म्हणजे सर्वांनाच तो दिसतो पण काही लोक डोळे बंद करुन घेतील तर काही जन्मतःच अंध असतील अशांना ह्या सूर्याचे दर्शन होत नाही. याचा अर्थ त्या व्यक्तींनी सूर्यच नाही किंवा तो उगवतच नाही असा काढला तर ज्याप्रमाणे  त्यांना मूर्खात काढले जाईल किंवा हसे होईल. त्याचप्रमाणे पुनर्जन्म आणि आत्मा ह्या संकल्पना नाकारणा-यांचे !
इथेच श्रेयस् आणि प्रेयसाच्या द्वैताला प्रारंभ होतो. श्रेयसाची उपासना करणारा आयुष्यभर नित्य आणि शाश्वत गोष्टी मिळवण्यातच धन्यता मानतो तर प्रेयसाची इच्छा करणारा नश्वर गोष्टींमधे गुंतून पडतो. कर्मसिद्धांत हा कोणासही चूकलेला नाही. आजचे आपले कर्म हे उद्याचे प्रारब्ध असते याचा विसर मनुष्याला काळाच्या ओघात व यशाच्या धुंदीत पडतो.तो विसरतो की सत्ता,संपत्ती, जमीन-जुमला, नोकर-चाकर इत्यादी सर्व गोष्टी इतकंच काय पण स्वतःचा देह देखील क्षणिक आणि नित्य परिवर्तनशील आहे. मनुष्याला जन्म होण्याआधी ९ महिने अगोदरच कल्पना मिळते मात्र मृत्यूची नाही. कोणाचा मृत्यू कधी,कुठे,कसा होणार याची सुतराम कल्पना मनुष्याला नसते. जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत तो आपण अमर आहोत अशा आविर्भावात जगत असतो. ह्या धुंदीत तो हे विसरतो की ज्या (प्रेयस)गोष्टी तो अथक परिश्रम करुन लालसेपोटी मिळवतो आहे, मग तो पैसा असो,घर असो, सत्ता असो,पद असो वा नातेवाईक असो ! मृत्यू आल्याक्षणी हे सारं काही त्याच क्षणाला इथेच या जगात सोडून जायचं आहे. जे माझं माझं म्हणून कमवलं त्यातलं काहीच सोबत येणारं नाही! अंगावरील वस्त्रे सुद्धा लोक अंतिमक्षणी काढून घेणार आहेत . गतप्राण देहाला *प्रेयसाची* सोबत फार तर चितेपर्यंतच! एकदा देह हा अग्नीच्या स्वाधीन केला की मग तिथून पुढचा प्रवास केवळ आपले धर्माचरण आणि आपले सत्कर्मासह! अर्थातच *श्रेयस्कर* वाटचाल
जीवनात झालेली योग्य गुरुंची भेट हा *श्रेयसाबद्दलचा* विवेक जागृत ठेवते. अनंत जन्मांच्या प्रवासाने मानवी मनांवर अनेक दोषांची आवरणे आणि पशु जन्मातील संस्कार झालेले असतात. हे संस्कार पुन्हा पुन्हा उफाळून वर येतात. मनुष्य योनीव्यतिरिक्त इतर योनी या भोग योनी आहेत. केवळ इंद्रिय तृप्ती, उदरभरण आणि प्रजनन हेच पशुंचे गुण आहेत. विवेक हा एकमेव सद्गुण मनुष्याला इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ ठरवतो. आणि हा “विवेक” केवळ श्रीगुरुंच्या सत्संगातुनच येतो. तेव्हा आपल्या सत्संगाने नराचा नारायण करण्याची किमया गुरु करतात. जीवनात सद्गुरुंची भेट हा त्या व्यक्तीच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण ठरतो. हजारो वर्षांपासून ही गुरुपरंपरा आजतागायत अव्याहत सुरु आहे. याची जाणीव कलीच्या प्रभावाने होत नाही. हा कली ओळखावा कसा? आणि त्यापासून आत्मसंरक्षण कसे करावे याचे यथार्थ मार्गदर्शन आणि मार्गदर्शनाप्रमाणे आचरण करण्याचे सामर्थ्य केवळ गुरुचऱणीच प्राप्त होईल. आधी ज्ञान मग विज्ञान अशी वस्तुस्तिथी ही फार अनादि कालापासून अव्याहत आहे. अर्थातच ही *अतिप्राचीन गुरुपरंपरा  ज्ञानोपासनेवर* आधारलेली आहे. ज्ञान,त्याग वैराग्य हे या परंपरेचे मूळ वैशिष्ट्य! 
खरं पाहिलं तर अज्ञान,असत्य आणि अंधार ह्या अस्तित्वहीन गोष्टी ! कारण यांना स्वतःचं स्वतंत्र अस्तित्वंच नाही! एखाद्या अंधःकारमय खोलीत दीप प्रज्वलित केला की अंधार आपोआप दूर होतो,सत्य कळल्यावर असत्याचा आपोआप नाश होतो तद्वत ज्ञान झाले की अज्ञानाचा नाश आपोआप होतो. अंधार,अज्ञान व असत़्य यांना दूर करण्याच्या वेगळ्या प्रक्रिया नाहीत! 
त्यामुळे *शिष्याचे सर्वप्रकारे अज्ञान दूर करुन त्याला आत्मोन्नतीच्या मार्गाला लावण्याचे कार्य* ही *गुरुपरंपरा* करत आली आहे. *मनुष्य ही निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती!त्याला *मन,बुद्धी,वाचा आणि विवेक* दिला आहे.ज्यामुळे तो *इतर प्राण्यांपेक्षा वेगळा* ठरतो.तरीही तो हळू हळू शिकणारा प्राणी आहे. षड्रिपू (काम,क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सर) हे त्याच्या देहासोबतच येतात. त्यामुळे तो अज्ञानाच्या अंधारात चाचपडत राहतो.मायामय अशा या जगात सत्ता,संपत्ती,खोटी प्रसिद्धी,शारीरिक सुखासिनता यांनाच तो सर्वस्व मानू लागतो. या सर्वातून मार्ग दाखविण्यासाठीच व हे शाश्वत सुख नसून मधूर सुखाच्या यातना आहेत याचा अनुभव देण्यासाठी परमेश्वर स्वतः "गुरुस्वरुपात" अवतार घेतो. 
"शिवं ज्ञानोपदेष्टारं विष्णूं धर्मोपदेशकं विधी वेदप्रवक्तारं। अशी त्रैमूर्तींची परंपरा आहे. म्हणून गुरु हे ब्रह्मा विष्णू व महेश्वर स्वरुपी मानले जातात! या तीनही देवतांची शक्ती गुरुंच्या ठिकाणी एकवटलेली आहे म्हणून देवतांच्याही आधी श्रीगुरुंना वंदन करण्याचे महत्वं आहे.
गुरु गोविंद दोऊ खडे काके लागुं पांय।
बलिहारी गुरु आपने, गोविंद दियो बताय ।। असं कबीरांनी सार्थ वर्णिलं आहे.
खुद्द भगवंतानेच या परंपरेचा आदर्श घालून दिला आहे. श्रीराम अवतारात त्याने महर्षी वसिष्ठांना गुरु केलं तर भगवान श्रीकृष्णावतारात त्याने महर्षी सांदीपनींना गुरु केलं आणि या परंपरेचं महत्वं स्वतः आचरणातून या भूमीत रुजवलं.ही परंपरा कुचकामी विचारांवर आधारलेली नाही. आजकाल समाजात दांभिक गुरुंचे पीक आलेले दिसते. हे लोक सामान्य माणसाच्या अज्ञानाचा किंबहूना भाबड्या श्रद्धेचा फायदा घेऊन त्यांना लुबाडताना दिसतात. पण खरे गुरुस्वरुप हे कधीही नश्वर गोष्टींची अपेक्षा ठेवत नाहीत. त्यांची या सर्व विषयातील आसक्ती संपल्यामुळेच ते या पदावर पोहोचलेले असतात.
गुरु हे जन्मालाच यावे लागतात.* म्हणूनच अशा गुरुंना वयाच्या दहाव्यावर्षापर्यंत ईश्वरी साक्षात्कार झालेला असतो. त्यामुळे भौतिक सुखांबद्दल ते उदासीन असतात. म्हणूनच ते निःस्पृह आणि त्यागीवृत्तीचे असतात. दयाळू वृत्तीमुळे सर्वच जीवांना समान दृष्टीने ते पाहू शकतात. अर्थातच जातीभेद, वर्णभेद व धर्मभेद अशा गुरुंच्या ठिकाणी दिसत नाही.*(*समाजातील अवतारी पुरुष, सत्पुरुष तसेच संत ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे अधिकारी व्यक्तींना कोणतेही व्यंग नसते व ते कधीही प्रसिद्धीच्या मागे नसतात* - परमपूज्य श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराज {अमृतकण क्रमांक-२०३, पृष्ठ क्रमांक-६, दि-१५/१२/१९९६})
परंपरेतील गुरुंचे आणखी एक विशिष्ट्य म्हणजे ते आपल्या शिष्यांनामार्गी लावून सोडून देत नाहीत तर त्यांच्याकडून कर्तव्य करुन घेतात.अशा प्रकारच्या मार्गदर्शनामुळे भक्त अध्यात्म आचरणातून श्रेयसाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतो. व जीवन गुरुसेवेत व्यतीत करण्यातच धन्यता मानतो आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने यावर चिंतन जरुर व्हावे. आपणास जीवनात सद्गुरुंचा लाभ झाला आहे काय? झाला असल्यास त्याचा आपणांस आजवर काय फायदा झाला? गुरु हे परीसासारखे असतात. सत्संगतीत येणा-या प्रत्येकाचे ते सुवर्ण करतच असतात. पण आपले सुवर्ण होण्यासाठी आपणही लोखंड असणे गरजेचे असते. आजचे युग हे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे युग आहे. माहिती ही सहज कुठेही उपलब्ध होऊ शकते. ती कुणीही कधीही,कुठेही,कुणालाही देऊ शकतो.पण ज्ञानाचे तसे नाही. ते अनुभवातूनच प्राप्त होईल. आणि कोणतीही कृत्रिम साधने ही ज्ञान देण्यास असमर्थ आहेत.त्यामुळे खरे ज्ञान जर कुठे प्राप्त होईल तर ते केवळ श्रीगुरुंच्या चरणीच!. भारत हा ज्ञानोपासनेचा देव्हारा आहे. याच्या गाभा-यात अखंड तेजोमय असणा-या गुरुमूर्तीची प्रत्येक भारतीयाच्या हृदयात प्रतिष्ठापना झाल्यासच हा देश तरुन जाईल.

।। श्रीगुरुदेव दत्त ।।
-“श्रीरामकृष्ण”चरणरज
९७६३७७६३३९